सोशल मीडियामुळे (Social media) आता जागरुकता वाढलीय. आर्थिक साक्षरतेत वाढ होतेय. विविध तज्ज्ञ आर्थिक विषयक बाबींवर मार्गदर्शन करत असतात. या माध्यमातून गुंतवणुकीच्या योजना (Investment schemes) तर माहीत होतात, मात्र आपल्यासाठी योग्य कोणती याबद्दल प्रत्यक्ष गुंतवणूकदारालाच निर्णय घ्यायचा असतो. अधिकाधिक परतावा त्याचप्रमाणे कमी जोखीम आणि उज्ज्वल भविष्यकाळ हे काही निकष असतात. याच आधारावर आम्ही तुम्हाला सरकारी टॉप 7 गुंतवणुकीच्या योजना सांगणार आहोत.
Table of contents [Show]
व्याज दरात वाढ
केंद्र सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये आपल्याला मासिक, अर्धवार्षिक म्हणजेच सहामाही आणि वार्षिक अशाप्रकारची गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध होतात. जुन्या कर प्रणालीनुसार या योजनांमध्ये करात सवलतही मिळू शकते. छोट्या बचत योजनांसाठी सरकारनं एप्रिल-जून 2023 तिमाहीसाठीचे व्याज दर 70 बीपीएसपर्यंत (बेसिक पॉइंट्स) वाढवले आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र अशा काही सरकारी योजना आहेत. यात हे लाभ मिळू शकतात. अशाच काही योजनांची थोडक्यात माहिती, व्याज दर यावर एक नजर टाकू...
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या (SCSS) माध्यमातून वाढलेल्या व्याजदराचा आनंद गुंतवणूकदार घेऊ शकतो. सध्या या योजनेमध्ये 8.2 टक्के दर मिळतो. आधी तो 8 टक्के होता.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत आता 7.7 टक्के व्याजदर मिळतो. आधी तो 7 टक्के होता. पहिल्यापेक्षा काही अंशानं यात वाढ झालीय.
किसान विकास पत्र (KVP)
किसान विकास पत्र या योजनेत मागच्या 120 महिन्यांच्या तुलनेत 115 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.2 इतका व्याजाचा दर होता. तो आता वाढवण्यात आला असून 7.5 टक्के व्याज दर निश्चित करण्यात आलाय.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरातदेखील वाढ करण्यात आलीय. आता 8 टक्के दर दिला जातोय. आधी तो 7.6 टक्के होता.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS)
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद चांगला मिळतो. या योजनेतल्या व्याजदरात जास्त नाही मात्र अंशत: वाढ करण्यात आलीय. 7.4 टक्के व्याज यात दिलं जातंय. आधी हाच व्याज दर 7.1 टक्के होता.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTD)
पोस्टाची ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेतल्या व्याज दरातही वाढ झालीय. 1 वर्षाच्या ठेवीवर आता 6.8 टक्के व्याज दिलं जातंय. आधी ते 6.6 टक्के होतं. 2 वर्षांच्या ठेवीवर 6.9 टक्के व्याज दिलं जातं. आधी ते 6.8 टक्के होतं. 3 वर्षांच्या ठेवीवर 7 टक्के दर दिला जातोय जो आधी 6.9 टक्के होता. तर 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के इतका व्याज दर दिला जातो जो आधी 7 टक्के होता.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सध्या 7.1 टक्के व्याज दर देत आहे. इतर योजनांच्या तुलनेत हा व्याज दर कमी आहे. मात्र पारंपरिक गुंतवणूकदार या योजनेला पसंती देतात.