सध्याच्या काळात योग्य व आवडीची नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. करिअरमध्ये प्रगती होईल व सोबतच चांगला पगार मिळेल, यासाठी योग्य शिक्षण घेणे गरजेचे आहे. तुमचे करिअर व पगार हे बहुतांश वेळा कोणत्या क्षेत्रात शिक्षण कोणते घेतले आहे, यावर अवलंबून असते.
मात्र, अनेकदा काही वर्षांनी तुम्ही घेतलेले शिक्षण फारसे उपयोग ठरत नाही व त्या क्षेत्रातील नोकरीच्या संधी देखील कमी होतात. त्यामुळे भविष्यात कोणत्या क्षेत्रात अधिक संधी निर्माण होतील, हे लक्षात घेऊन शिक्षणाचा मार्ग निवडणे गरजेचे आहे.
कोणत्या विषयात अथवा क्षेत्रात पदवी घेतल्यास भविष्यात नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते, त्याविषयी जाणून घेऊयात.
2024 नंतरही या क्षेत्रात मिळतील नोकरीच्या भरपूर संधी
तंत्रज्ञान | सध्याच्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी पाहायला मिळतात. तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सारख्या क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. आज प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रात पदवी घेतल्यास तुम्हाला जास्त पगाराची नोकरी नक्कीच मिळू शकते. |
आर्थिक क्षेत्र | तुम्ही जगातील कोणत्या कोपऱ्यात जा, प्रत्येकाचा पैशांशी संबंध येतो. त्यामुळे तुम्ही जर आर्थिक क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेतल्यास करिअरच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल. तुम्ही बीकॉम, एमकॉम, एमए (अर्थशास्त्र), एमबीएचे शिक्षण घेऊ शकता. आर्थिक क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेतल्यास तुम्हाला अकाउंटंट, आर्थिक सल्लागार, आर्थिक विश्लेषक म्हणून नोकरी मिळेल. याशिवाय, बँकिंग क्षेत्रात देखील काम करण्याची संधी मिळू शकते. |
व्यवसाय व व्यवस्थापन | कॉर्पोरेट जगतात करिअर करायचे असल्यास तुम्ही व्यवसाय व व्यवसापन संबंधित क्षेत्रातील पदवी घेऊ शकता. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, मार्केटिंग आणि मॅनेजमेंट संबंधित क्षेत्रातील पदवी घेतल्यास अनेक नोकऱ्या मिळतील. |
आरोग्य | आरोग्य सेवा हे अशा ठराविक क्षेत्रांपैकी एक आहे, ज्यात तुम्हाला नेहमीच नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. वाढत्या लोकसंख्येबरोबरच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी देखील वाढत चालली आहे. प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये चांगल्या कर्मचाऱ्यांची गरज असते. फार्मसी, नर्सिंग आणि मेडिसिनशी संबंधित शिक्षण घेतल्यास नोकरीच्या अनेक संधी मिळतात. MBBS, BDS, BSc नर्सिंगचे शिक्षण घेऊन तुम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करू शकता किंवा स्वतःचे हॉस्पिटल देखील सुरू करता येईल. |
कौशल्य शिका
कोणत्याही क्षेत्रातील पदवीपेक्षा तुमच्याकडे कौशल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. पदवीमुळे तुम्हाला नोकरी तर मिळेल, मात्र करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असणे देखील गरजेचे आहे. या कौशल्याच्या जोरावरच तुम्हाला जास्त उत्पन्न देखील मिळेल. विशेष म्हणजे कौशल्य हे कधीच वाया जात नसते.
डिजिटल मार्केटिंग, वेबसाइट डेव्हलपमेंट, सोशल मीडिया मॅनेजमेंट, कॉन्टेंट क्रिएशन, इलेक्ट्रिशिएन, लॅपटॉप-मोबाइल रिपेअरिंग, व्हीडिओ एडिटिंग सारखी कौशल्य आत्मसात केल्यास नक्कीच नवीन संधी मिळतील.