Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

10 हजारांची गरज असताना 40 हजारांचे कर्ज घेतले आणि 2.5 लाख रूपये द्यावे लागले

banking app mobile fraud

Loan App Fraud : एका युवकाने सहा वेगवेगळ्या लोन अ‍ॅप्सवरून 40 हजार रूपयांचे कर्ज घेतले. यानंतर त्याला दररोज 31 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमक्यांचे आणि बदनामी करण्याचे फोन येऊ लागल्यानंतर त्याने मित्रांकडून आणि भावंडांकडून पैसे घेऊन या कर्जदारांना 2.5 लाख रुपये परत केले.

मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणाऱ्या 28 वर्षीय युवकाला फक्त 10 हजार रूपयांची गरज होती. पण त्याने वेगवेगळ्या लोन अ‍ॅप्सवरून 40 हजार रूपयांचे कर्ज घेतले आणि त्या बदल्यात त्याला कर्जाच्या सहापट रक्कम परत करावी लागली. नेमकं काय घडलं त्याच्यासोबत. कर्जाच्या सहापट रक्कम का परत करावी लागली, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊ.

इंडियाटाईम्स डॉट कॉमच्या वृत्तानुसार, संबंधित युवकाने मेघवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दाखल केली. संबंधित युवकाने मे महिन्यात अ‍ॅपच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज केला होता. अर्ज केल्यानतर जेमतेम त्याला आठवड्याभरातच वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून ब्लॅकमेलिंगसाठी आणि कर्जाची रक्कम परत करण्यासाठी धमक्यांचे फोन येऊ लागले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने एका अ‍ॅपवरून 10 हजार रुपयांच्या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जात म्हटले होते की, कर्जाची रक्कम तीन महिन्यात परत करावी लागेल.


मात्र, अवघ्या पाचच दिवसांनी त्याला कर्जाची रक्कम परत करण्यासाठी फोन येऊ लागले. दरम्यान, कर्ज मिळवण्यासाठी त्या अ‍ॅपला मोबाईलमधील संपर्क क्रमांकांचा प्रवेश देणे अनिवार्य असल्याने त्या युवकाने तो प्रवेश दिला होता. याचा फायदा घेत लोन अ‍ॅपवरील रिकव्हरी एजंटांनी त्याचे मॉर्फ केलेले फोटो त्याच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना शेअर करण्याची धमकी दिली आणि त्याला व्याज आकारणाऱ्या दुसऱ्या अ‍ॅपवरून पुन्हा एकदा कर्जासाठी अर्ज करण्यास भाग पाडून कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडले.

अशाप्रकारे, संबंधित युवकाने इतर पाच अ‍ॅप्समधून आणखी 30 हजार रूपयांचे कर्ज घेतले. अशाप्रकारे त्याने एकूण सहा वेगवेगळ्या लोन अ‍ॅप्सवरून 40 हजार रूपयांचे कर्ज घेतले. यानंतर त्याला दररोज 31 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमक्यांचे आणि बदनामी करण्याचे फोन येऊ लागल्यानंतर त्याने मित्रांकडून आणि भावंडांकडून पैसे घेऊन या कर्जदारांना 2.5 लाख रुपये परत केले, असे या तरूणाने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या युवकाने त्या रिकव्हरी एजंटांना आणखी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा एजंटांनी त्याचे मॉर्फ केलेले फोटो त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवले. या फोटोमध्ये त्याला बलात्कारी असे नाव देण्यात आले होते. पोलीस या 7 अ‍ॅप्सचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या अ‍ॅप्समध्ये क्रेझीबी (Crazybee), कॅश अ‍ॅडव्हान्स (Cash Advance), डव्ह कॅश (Dove Cash), ट्रॅक-ओ (TrackO), ऑनस्ट्रीम (Onstream), पापा मनी (Papa Money) आणि शटल लोन (Shuttle Loan) यांचा समावेश आहे. ही अ‍ॅप्स वेगवेगळ्या ठिकाणांहून ऑपरेट केली जात असल्याने पोलिसांना यांचे लोकेशन कॅच करण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान, अशाप्रकारे बँकेच्या नियमांचे उल्लंघन करणारी अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरवरून (Google Playstore) काढून टाकण्याचे आदेश आरबीआयने (RBI) देऊन ही ते प्लेस्टोअरवर अजून ही आहेत.

अ‍ॅपद्वारे कर्ज घेताना हे लक्षात ठेवा

  1. मोबाईल अ‍ॅपद्वारे कर्ज घेण्यापूर्वी कंपन्यांचे रेकॉर्ड तपासा. अशा कंपन्या ग्राहकाकडून अधिक व्याज घेतात. तसेच यामध्ये बरेच छुपे शुल्क देखील असतात. ज्याची सुरुवातीला माहिती दिलेली नसते. 
  2. तसेच आपले केवायसी कागदपत्रांची प्रत कधीही अनोळखी व्यक्ती किंवा अ‍ॅपवर अपलोड करू नये.
  3. लोन कंपन्यांकडून ऑफरची संपूर्ण माहिती घ्या.
  4. RBI च्या संकेस्थळावरून लोन कंपनीबद्दल माहिती मिळवा. RBI वर रजिस्टर असेल तर फसवणुकीची तक्रार करणे सोपे होईल.    


‘महामनी’चे आवाहन

सध्या मोबाईल अ‍ॅप्सद्वारे कर्ज घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक सुरू आहे. आर्थिक फसवणुकीबरोबरच संबंधितांचा मानसिक छळ केला जात आहे. त्यामुळे आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, नागरिकांनी झटपट किंवा चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या कर्जाचा मोह टाळावा. या अशाप्रकारच्या अ‍ॅप्सद्वारे कर्ज मिळवणाऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे. पण त्याचबरोबर कुटुंबाची आणि वैयक्तिक बदनामी होत असल्याने अनेक जणांनी आत्महत्त्या केली आहे. हे टाळण्यासाठी रितसर अधिकृत बॅंकांकडून कर्ज घ्यावे आणि अशाप्रकारच्या भुलथापांपासून सुरक्षित राहण्यासाठी आर्थिक साक्षर (Financial Literacy) व्हावे.