Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan App Fraud : सावधान, अ‍ॅपच्या माध्यमातून लोन घेणं ठरू शकत जीवघेणं

Loan App Fraud : सावधान, अ‍ॅपच्या माध्यमातून लोन घेणं ठरू शकत जीवघेणं

एका क्लिकवर लोन मिळणार अशी जाहिरात समोर दिसली तर सावधान! अशा लोन अ‍ॅपवर किंवा लोन देणाऱ्या संकेतस्थळांवर विश्वास ठेऊ नका. कारण या अ‍ॅपमधील कर्जाच्या हप्त्यापेक्षा या अ‍ॅपचा मानसिक छळ जीवघेणा ठरतोय.

सध्या बाजारात झटपट लोन देणारी अनेक अ‍ॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. सोशल मीडियावरही झटपट कर्ज देणाऱ्या जाहिराती आपण पाहतो. पण असं झटपट कर्ज घेण्यामुळे, तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा होऊ शकतो. हे कर्ज तुमच्याकडून अधिक पैसे उकळण्याकरीता तुमची समाजात बदनामी करणारं माध्यम ठरू शकतं. या ॲप्सद्वारे कर्ज देणाऱ्या लोकांकडून कर्ज वसुलीची जीवघेणी अनेक उदाहरणं समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे अ‍ॅपद्वारे फक्त आधार क्रमांक देऊन लोन देणाऱ्यांपासून सावधान राहाणं गरजेचं आहे.

मोबाईल अ‍ॅपद्वारे लोन घेणे किती धोकादायक

पैशाची गरज असते तेव्हा आधी फक्त बँक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच कर्ज मिळत असे. पण सध्या मोबाईलच्या माध्यमातून एका क्लिकवर कर्ज मिळत आहे. जे लोक सुशिक्षित आहेत आणि मोबाईल हातळण्याची त्यांना बऱ्यापैकी जाण आहे, असे लोक पैशांची गरज भागवण्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेत आहेत. लगेच कर्ज मिळत असल्याने कर्ज घेणारे त्या अ‍ॅपची फारशी माहिती ही घेत नाहीत. आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याने संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती (नाव, राहण्याचे ठिकाण, आधार क्रमांक, पॅन क्रमांक) मिळते. या माहितीचा गैरवापर करून लोकांना आर्थिकदृष्ट्या फसवले जात आहे. मोबाईल अ‍ॅपच्या सर्व नोटीफिकेशनला परवानगी दिल्या जात असल्याने मोबाईलमधील सर्व माहिती चोरली जाऊ शकते. तसेच हे कर्ज वेळेत फेडलं गेले नाही की, या कंपन्या ग्राहकांचा प्रचंड मानसिक छळ करतात. या छळातून सुटका करून घेण्यासाठी काही जण आपले जीवन संपवत आहेत.

कर्ज घेणाऱ्यांना कशाप्रकारे मानसिक त्रास दिला जात आहे...

  • कर्ज फेडण्यास उशीर झाल्यास, किंवा कर्जाची शेवटची तारीख असते त्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून अ‍ॅपच्या कॉल सेंटर मधून कॉल येण्यास सुरुवात होते. त्यात तुम्ही काही करून आजच हफ्ता भरा, अशी धमकीच दिली जाते. 
  • तसेच तुम्ही फोन उचलला नाही तर तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना फोन करून आता तुम्ही हे कर्ज फेडा, असे सांगितले जाते. तसेच त्यांना शिवीगाळ केली जाते.
  • मोबाईलवर खोट्या लीगल नोटिसा पाठवल्या जातात. तसेच कर्ज फेडलं नाही तर कायदेशीर कारवाई करण्याची कोर्टात हजर राहण्याची धमकी दिली जाते.
  • कर्ज वसुलीचा शेवटचा उपाय म्हणजे ते एक व्हॉट्सअँप ग्रुप तयार करतात. यात तुमच्या नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे फोन नंबर ऍड करतात आणि कर्ज घेताना तुम्ही जो फोटो देता तो फोटो, तुमच्या नाव आणि पत्त्यासह या ग्रुपवर शेअर करत 'अमुक-अमुक व्यक्ती चिटर आहे' किंवा 'ही व्यक्ती पैसे घेऊन फरार झाली आहे', असे मेसेज टाकतात. अशा प्रकारे तुमची सामाजिक प्रतिष्ठा मालिन करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा त्रासाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केली आहे किंवा करण्याचा प्रयत्न केला आहे.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची (RBI) भूमिका आणि सूचना

रिझर्व्ह बँकेत नोंदणीकृत असणाऱ्या बँका, बँकेतर वित्तीय संस्था (non-banking fanancial organizations-NBFO) आणि वेगवेगळ्या राज्यांच्या नियमानुसार कार्यरत असणाऱ्या संस्था, यांनाच कर्जपुरवठा करण्याची अधिकृत परवानगी आहे आणि म्हणूनच अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्यांची माहिती पडताळून घेणं गरजेचं आहे. 

कुठल्याही अनोळखी संस्थेला किंवा व्यक्तीला स्वतःची ओळखपत्रं देता कामा नये. अशा कुठल्याही अँप विषयी तुम्ही पोलिसात किंवा https://sachet.rbi.org.in/ या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता.
रिझर्व्ह बँकेत नोंदणीकृत असणाऱ्या संस्था ऑनलाईन कर्ज उपलब्ध करून देत असतील तर त्यांनी रिझर्व्ह बँकेला याची पूर्वकल्पना द्यावी, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. शिवाय, रिझर्व्ह बँकेत नोंदणीकृत वित्तीय संस्थांची नावं बँकेच्या वेवसाईटवरही उपलब्ध आहे.

ऑनलाईन अ‍ॅपद्वारे कर्ज घेताना हे लक्षात ठेवा

  1. मोबाईल अ‍ॅपद्वारे कर्ज घेण्यापूर्वी कंपन्यांचे रेकॉर्ड तपासा. अशा कंपन्या ग्राहकाकडून अधिक व्याज घेतात. तसेच यामध्ये बरेच छुपे शुल्क देखील असतात. ज्याची सुरुवातीला माहिती दिलेली नसते. 
  2. तसेच आपले केवायसी कागदपत्रांची प्रत कधीही अनोळखी व्यक्ती किंवा अ‍ॅपवर अपलोड करू नये.
  3. लोन कंपन्यांकडून ऑफरची संपूर्ण माहिती घ्या.
  4. RBI च्या संकेस्थळावरून लोन कंपनीबद्दल माहिती मिळवा. RBI वर रजिस्टर असेल तर काही त्रास किंवा फसवणूक झाली तर तक्रार करणे सोपे होईल.    

अशा त्रासदायक लोन अ‍ॅपसाठी देशातील बँकिंग व्यवस्थेची नियामक संस्था असणाऱ्या RBI  ने अजून कुठलेही नियम आखलेले नाहीत. सध्यातरी अस्तित्वात असलेले वित्तीय कायदे, बँकिंग रेग्युलेशन्स, IPC, IT कायदे याच्या आधारावरच पोलीस कारवाई सुरू आहे. यामुळे झटपट कर्जाच्या मागे न लागता, बँकेत थोडा वेळ लागला तरी चालेल पण अशा प्रकारचे कर्ज न घेतलेलेच बरे.