इंटरनेटच्या दुनियेत ऑनलाईन खरेदीविक्रीची प्रक्रिया एकदम सहज आणि सोपी झाली. अॅपवर जाऊन आवडीच्या वस्तूवर क्लिक करायचे, पैसे भरायचे की दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या घरी येत. पण या सहज आणि सोप्या प्रक्रियेमुळेच यातून फसवणुकीचे प्रकार वाढू लागलेत. यात शिकले सवरलेले आणि सुशिक्षित लोक ही अडकत आहेत. पण महिला आणि वृद्धांना फसवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
अशीच ऑनलाईन फसवणुकीचे दोन प्रकार मुंबईत आढळून आले. एका महिलेने ऑनलाईन पुस्तकाच्या वेबसाईटवरून काही पुस्तके मागवली. समोरच्या व्यक्तीने ती पुस्तके असल्याचे सांगून त्याचे 1740 रूपयांचे बिल पाठवले. बिल भरल्याशिवाय पुस्तके पाठवता येणार नाही, असे त्या व्यक्तीने सांगितल्याने संबंधित महिलेने पैसे भरण्याची तयारी दाखवली. त्यानुसार त्याने एक क्यूआर कोड पाठवला. तो कोड स्कॅन करताच महिलेच्या खात्यातून पैसे कट झाले. त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा एक कोड पाठवते. तो कोड स्कॅन झाल्यानंतर पुन्हा महिलेच्या खात्यातून 19 हजार रूपये कट होतात. असे किमान 3 ते 4 वेळा कोड स्कॅन केल्यामुळे त्या महिलेच्या खात्यातून 70 हजार रूपये काढून घेण्यात आले. दुसऱ्या एका प्रकरणात एका महिलेला खजूरविक्री चांगलीच महागात पडली. एका भामट्या सैनिकाने 8 हजार किलो खजुरांची ऑर्डर देऊन त्याचे 15 हजार रूपये ऑनलाईन पाठविण्याच्या बहाण्याने त्या महिलेच्या खात्यातून क्यूआर कोडच्या माध्यमातून 8 लाख रूपये काढून घेतले.
इंटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाईल अॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पेटीएम केवायसी किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने लोकांना टेक्स्ट किंवा व्हॉट्सअॅप मेसेज पाठविले जातात. काही वेळेस थेट मोबाईलवर फोन करून पेटीएम किंवा बँकेमधून बोलत असल्याचे भासवून संपर्क साधतात व पुढील कार्यवाहीसाठी लिंक किंवा क्यूआर कोड पाठवतात. त्यातील लिंक ओपन केल्यानंतर किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, यूपीआय पिन व बँक खात्याची माहिती, पासवर्ड आदी भरण्यास भाग पाडले जाते आणि थोड्यावेळाने नकळत बँक खात्यातून पैसे काढून घेत असल्याचे दिसून येत आहे.
मोबाईल बॅंकिंग आणि ऑनलाईन पेमेंटचा वापर करताना अशी काळजी घ्या
सार्वजनिक ठिकाणी मिळणारे फ्री वाय-फाय वापरणे टाळा.
स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अद्ययावत करा.
अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. क्यूआर कोड स्कॅन करू नका.
सर्व प्रकारचे पासवर्ड नियमितपणे बदलत रहा.
इतरांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून नेट-बँकिंगचे व्यवहार करू नका.
इंटरनेट ब्राउझ करताना वेबसाइटच्या यूआरएलची सुरूवात सुरक्षिततेसाठी "https" ने असेल तरच ओपन करा.
वैयक्तिक बँक अकाऊंट नंबर, डेबिट/ क्रेडिट कार्ड नंबर आणि पिन कोणालाही सांगू नका.
नेट-बँकिंग किंवा ऑनलाइन खरेदी सुरक्षित करण्यासाठी डिजिटल साक्षर बना.
आपल्या खात्यात ऑनलाईन पैसे घेण्यासाठी यूपीआय पिन देण्याची किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नसते.