रिजर्व बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी एक निवेदन जाहीर करत यापुढे 2000 च्या नोटांना व्यवहारातून काढून घेणार असल्याचे सांगितले. 2000 च्या नोटा व्यवहारातून जरी काढून टाकल्या जात असल्या तरी त्यांना कायदेशीर चलनाचा दर्जा कायम राहणार आहे असे देखील आरबीआयने स्पष्ट केले होते. उद्यापासून, म्हणजेच 23 मेपासून देशभरातल्या बँकांमध्ये जाऊन सामान्य नागरिक 2000 च्या नोटा बदलू शकतात किंवा त्यांच्या खात्यात जमा करू शकतात. अशातच आरबीआयच्या या निर्णयाबाबत वेगवगेळ्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत आता खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीच माध्यमांना माहिती दिली आहे.
नोटा बदलण्यासाठी घाई करू नका
मागील नोटबंदीच्या वेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा थेट चलनातून रद्द केल्या गेल्या होत्या. तसेच देशातील बँक एटीएम देखील काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे बँकांमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मात्र आरबीआयने विचारपूर्वक 2000 च्या नोटांच्या बाबतीत निर्णय घेतला आहे.
आरबीआयने देशभरातील बँकांना पत्र लिहून सामान्य नागरिकांना नोटा बदलण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना पैसे बदलता येणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नागरिकांना केले आहे.
VIDEO | "The circulation of Rs 2,000 currency notes has come down from its peak of Rs 6,73,000 crore to about Rs 3,62,000 crore, i.e. by about 50 per cent," says RBI Governor Shaktikanta Das. pic.twitter.com/z5Q1ojEJEm
— Press Trust of India (@PTI_News) May 22, 2023
30 सप्टेंबरनंतरही 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर
नागरिकांना त्यांच्या 2000 च्या नोटा बदलण्यासाठी जवळपास 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत बँकाच्या वेळापत्रकानुसार नागरिकांना नोटा बदलणे किंवा खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. सध्या सोशल मिडीयावर नोटबंदीबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. 2000 च्या नोटा चलनातून बाद झाल्या तर त्या कुणीही घेणार नाही आणि आपले पैसे वाया जातील असे नागरिकांना वाटत आहे. यावर स्पष्टीकरण देताना शक्तिकांत दास म्हणाले की, 30 सप्टेंबरनंतरही 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील.
याचाच अर्थ असा की, सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटा कायदेशीर टेंडर्स राहतील पण चलनात नसतील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
सर्व प्रक्रियेवर आरबीआय लक्ष ठेऊन
या प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींवर सातत्याने आरबीआय लक्ष ठेऊन असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. आरबीआयच्या या निर्णयापूर्वी देशातील छोटे दुकानदार 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारताना आढेवेढे घेत. आता तर या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. यावर वेळोवेळी आरबीआय तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अधिकाधिक नोटा बँकांमध्ये जमा होण्याचा अंदाज आहे. परंतु त्यानंतर देखील 2000 रुपयांच्या नोटा चलनात राहिल्या तर त्यावर काय निर्णय घ्यायचा याची माहिती पुढे दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.