Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR तर भरलाय! पण आयकर विभागाकडून नोटीस आल्यावर काय कराल; नोटिशीचे प्रकार किती?

ITR file

Image Source : www.coverfox.com

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास निश्चिंत झाले असाल तर थांबा! आयकर विभागाकडून नोटीस आल्यास काय कराल याचा विचार केलाय का? ऐनवेळी गोंधळून जाण्यापेक्षा नोटीस आल्यावर काय करावे, नोटिशीचे प्रकार किती असतात? ते जाणून घ्या.

Type of Income Tax Notice: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आलीय. ज्यांनी अद्यापही रिटर्न फाइल केला नाही त्यांची धावपळ सुरू आहे. 31 जुलै नंतर ITR फाइल करत असाल तर 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरायला तयार राहा. 

रिटर्न तर भरलाय. मात्र, आयकर विभागाकडून नोटीस आल्यानंतर घाबरगुंडी उडू शकते. मात्र, एक ध्यानात प्रत्येक नोटीस ही कर चुकवेगिरीबद्दल किंवा दंडाबद्दल नसते. या लेखात जाणून घेऊया नोटीस आल्यानंतर काय करावे आणि नोटिशीचे प्रकार किती?

सर्वप्रथम काय कराल?

आयकर विभागाकडून नोटीस आल्यानंतर सर्वप्रथम ती कशासंदर्भात आहे हे समजून घ्या. अनेक वेळा रिटर्न फाइल करताना तुम्ही जी माहिती भरलेली असते त्याचा पुरावा आयकर विभागाकडून मागितला जातो. समजा, घरभाडे तुम्ही 2 लाख रुपये नमूद केले असेल तर घरभाडे पावत्या आयकर विभागाकडून मागितल्या जाऊ शकतात. तसेच इतर कोणत्याही गुंतवणुकीचे पुरावे सुद्धा मागितले जाऊ शकतात.

ठरवून दिलेल्या कालवधीत उत्तर द्या

तुम्ही जर स्वत: आयकर रिटर्न फाइल केला असेल आणि नोटीस समजत नसेल तर CA ची मदत घ्या. जर तुम्ही रिटर्न CA कडून भरून घेतला असेल तर ही नोटीस त्यांना दाखवा. टॅक्स एक्स्पर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. स्वत: नीट माहिती समजली नसताना नोटिशीला उत्तर देऊ नका.

प्रत्येक नोटिशीला उत्तर देण्याची मुदत असते. तुम्हाला या कालावधीतच उत्तर द्यावे लागेल.    (Notice from Income tax dept) जर तुम्ही नोटिशीला वेळेत उत्तर दिले नाही तर मग मात्र, दंड आणि कारवाई होण्याची शक्यता असते. कर चुकवेगिरीची नोटीस असेल तर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. ITR मधील माहितीमध्ये तफावत असेल तर दुरूस्ती करून नव्याने आयटीआर फाइल करू शकता.

आयकर विभागाकडून येणाऱ्या नोटिशीचे प्रकार

माहितीची विनंती - आयकर विभागाला करदात्याकडून रिटर्नसंबंधी अतिरिक्त माहिती हवी असेल तर ही नोटीस येते. 

ऑडिट नोटिफिकेशन - जर आयकर विभाग तुमच्या रिटर्नचे ऑडिट करणार असेल तर ही नोटीस पाठवली जाते. उद्योग, व्यवसाय असेल तर अशी नोटीस येण्याची शक्यता जास्त असते.

दंडाची नोटीस - आयकर कायद्यानुसार तुम्ही कर बुडवला असेल. माहिती लपवली असेल किंवा खोटी माहिती सादर केली असेल तर तुम्हाला दंडाची नोटीस येते. 

अतिरिक्त करभरणा नोटीस - उत्पन्नाच्या प्रमाणानुसार तुम्हाला अतिरिक्त कर भरावा लागणार असेल तर आयकर विभागाकडून अतिरिक्त करभरणा नोटीस पाठवली जाते.

व्याजसंदर्भात नोटीस- जर तुम्ही कर जमा केला नसेल तर या करावर व्याज आकारले जाते. हे व्याज भरण्यासाठी वेगळी नोटीस येते.

फौजदारी कारवाईची नोटीस - आयकर विभागाकडून वेळोवेळी आलेल्या नोटिशींना जर तुम्ही उत्तर दिले नाही तर फौजदारी कारवाईची नोटीस येते.