Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Mantra: नवीन वर्षात स्मार्ट गुंतवणुकीचा मंत्र; 'या' गोष्टींवर ध्यान द्या

investment mantra in 2023

नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकजण काहीतरी संकल्प करत असतो. कोणी घर घेण्याचा तर कोणी कार घेण्याचा संकल्प करते. मात्र, त्यासाठी पैशांचे योग्य व्यवस्थापन आणि स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक अत्यंत गरजेची आहे. त्याशिवाय तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाहीत.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकजण काहीतरी संकल्प करत असतो. कोणी घर घेण्याचा तर कोणी गाडी घेण्याचा किंवा अनेक प्रकारचे संकल्प करतात. मात्र, त्यासाठी पैशांचे योग्य व्यवस्थापन आणि स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे फक्त पैसे बचत न करता योग्य आर्थिक पर्यायांमध्ये गुंतवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. फायनान्शिअल लिटरसी ही काळाची गरज आहे. अनेक तरुण मुलं-मुली नुकतेच नोकरीला लागले असतील तर त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे धडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. बाजारात अस्थिरता असतानाही जोखमीचा अंदाज घेत प्रत्येकाने गुंतवणूक करायला हवी.

गुंतवणुकीचे पर्याय

विविध प्रकारचे म्युच्युअल फंड बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी, लार्ज कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप आणि काँट्रा फंड योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. या फंडातील गुंतवणूक योजनांचा सखोल अभ्यास करून तुम्ही काही पैसे एसआयपी सुरू करू शकता. जागतिक मंदीचे सावट समोर ठाकले असतानाही भारतातील कंपन्यांनी कामगिरी चांगली असेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

स्मार्ट गोल कसे सेट कराल?

कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी तुमचे ध्येय निश्चित करून घ्या. दीर्घ काळ किंवा अल्प काळामध्ये तुमच्या गरजा काय आहेत याचा विचार करा. घरखरेदी, मुलांचे शिक्षण, आरोग्य, व्यवसाय सुरूवात करण्यासारख्या गोष्टींसाठी तुम्हाला पैशांची गरज पडणार असेल तर योग्य नियोजनाशिवाय तुमचे ध्येय पूर्ण होणार नाही. दीर्घ काळाच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. महागाईचा दर विचारात घेऊन स्मार्ट गोल ठरवा.

जोखीम व्यवस्थापन

जीवनामध्ये तुमच्या स्वत:वर आणि कुटुंबावर येणाऱ्या जोखमींपासून सुरक्षा मिळवण्यासाठी आधीच नियोजन करा. 6 ते 12 महिन्याचा जेवढा खर्च लागतो, त्यासाठीची तरतूद तुम्ही करून ठेवावी. यासाठीचे पैसे लगेच वापरता येतील अशा पर्यायांमध्ये गुंतवा. अल्प काळासाठीच्या मुदत ठेवी योजना, बचत खाते, लिक्विड फंड योजना, पोस्टाच्या अल्प बचतीच्या योजना अशा पर्यायांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. सोबतच तुम्हाला आणि कुटुंबाला वैद्यकीय खर्चापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसा आरोग्य विमा खरेदी करा. त्याद्वारे तुमचे कुटुंबीय सुरक्षित राहील आणि तुम्हाला बचतीमधून पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. कुटुंबातील तुम्ही कर्ते सदस्य असाल तर जीवन विमा पॉलिसीही अत्यंत गरजेची आहे. तुमच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक चणचणीपासून सुरक्षा मिळेल.

विविध पर्यायांमध्ये गुंतवणुकीचे फायदे

एकाच योजनेत तुमचे सर्व पैसे गुंतवण्याचे टाळा. त्यामध्ये जोखीम जास्त असते. ही जोखीम कमी करण्यासाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोने, एफडी, सरकारच्या बचत योजना यामध्ये तुमच्या क्षमतेनुसार बचत करा. तुम्ही किती जोखीम घेऊ शकता, त्यानुसार योग्य पर्याय निवडा. बाजारातील बदलत्या स्थितीनुसार तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय बदलू शकता.