Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Trading: ट्रेडिंग म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते?

What is Trading

What is Trading: शेअर मार्केटमध्ये शेअर्सची देवाण-घेवाण होते. तर कमोडिटी मार्केटमध्ये कमोडिटीची देवाण-घेवाण केली जाते. गुंतवणुकीचा हा पर्याय अनेकांना पटल्याने या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

ट्रेडिंग म्हणजे दोन संस्था किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण. ट्रेडिंगच्या या व्याख्येत संस्था म्हणजे गुंतवणूकदार किंवा ट्रेडर असतात; जे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सची देवाणघेवाण करतात. शेअर मार्केटमध्ये कंपन्यांच्या शेअर्सची ट्रेडिंग होते. तर कमोडिटी मार्केटमध्ये कमोडिटीची ट्रेडिंग होते. गुंतवणुकीचा एक पर्याय आणि ऑनलाईन ट्रेडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे अनेकांना सोयीचे झाले आहे. 

ट्रेडिंगचा इतिहास काय आहे?

युरोपमध्ये जॉईंट-स्टॉक कंपन्यांच्या निर्मितीसह स्टॉक ट्रेडिंग अस्तित्वात आले आणि या स्टॉक ट्रेडिंगमुळे अनेक गोष्टींमध्ये बदल दिसून आले. यामुळे युरोपमधील विविध शहरांमध्ये अनौपचारिक शेअर मार्केटची वाढ होण्यास सुरुवात झाली. सार्वजनिकपणे शेअर्सचा व्यापार करणारी पहिली जॉईंट-स्टॉक कंपनी ही डच ईस्ट इंडिया कंपनी होती. ज्याने अॅमस्टरडॅम स्टॉक एक्स्चेंजद्वारे आपले शेअर्स लिस्ट केले होते.

भौगोलिक विस्तारासह आर्थिक विकासाला चालना देण्यात जॉईंट-स्टॉक कंपन्या यशस्वी ठरल्यानंतर, त्या आर्थिक जगाचा मुख्य आधार बनल्या. भारत आणि आशियातील ऑनलाईन व्यापारासाठी पहिले एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) होते. ज्याची स्थापना 1875 मध्ये झाली होती. भारतातील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही दोन मुख्य एक्सचेंजेस आहेत; जिथे स्टॉक मार्केट ट्रेडिंग होते.


स्टॉक मार्केटमधील ट्रेडिंगचे काही प्रकार

डे ट्रेडिंग / इन्ट्रा-डे ट्रेडिंग (Day/Intraday Trading)

डे ट्रेडिंग किंवा इन्ट्रा-डे ट्रेडिंगमध्ये एका दिवसासाठी शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते. शेअर मार्केटमधील एक दिवस म्हणजे सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 या दरम्यान खरेदी-विक्री केलेल्या ट्रेडिंगला डे ट्रेडिंग म्हटले जाते. डे ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार काही मिनिटे किंवा तासांसाठी शेअर्स स्वत:जवळ ठेवतात. डे ट्रेडिंग मध्ये भाग घेणाऱ्या ट्रेडर्सनी मार्केट बंद होण्यापूर्वी त्यांचे ट्रेड बंद करणे आवश्यक असते. 

स्कॅल्पिंग (Scalping)

स्कॅल्पिंगला मायक्रो-ट्रेडिंग असेही म्हणतात. स्कॅल्पिंग आणि डे-ट्रेडिंग हे दोन्ही इंट्राडे ट्रेडिंगचेच प्रकार आहेत. स्कॅल्पिंगमध्ये एका दिवसात वारंवार लहान-लहान प्रॉफिट मिळवणे शक्य असते. पण यामध्ये प्रत्येक ट्रेड मधून नफा मिळत नाही. काहीवेळा या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. यामध्ये गुंतवणूकदार जास्तीत जास्त काही मिनिटांसाठी ट्रेड घेतात आणि अपेक्षित नफा झाला की, लगेच त्यातून बाहेर पडतात. स्कॅल्पिंगसाठी मार्केटचा अनुभव, त्याच्यातील जोखीम आणि बाजारातील चढउतारांबद्दल जागरूकता असणे गरजेचे आहे. 

स्विंग ट्रेडिंग (Swing Trading)

स्विंग ट्रेडिंगचा वापर शेअर्स खरेदी केल्यानंतर काही दिवसांत नफा मिळविण्यासाठी केला जातो. साधारणपणे हा कालावधी एक ते सात दिवसांचा असू शकतो. ट्रेडर त्याने केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षित फायदा मिळवण्यासाठी मार्केटमधील वेगवेगळे पॅटर्न समजून घेऊन स्विंग ट्रेडिंग करू शकतो. यासाठी मार्केटमधील टेक्निकल अॅनालिसिस खूप गरजेचे आहे. 

मोमेंटम ट्रेडिंग (Momentum Trading)

मोमेंटम ट्रेडिंगमध्ये ट्रेडर शेअर्समधील अप-डाऊनचा फायदा घेतो, म्हणजे शअर्समध्ये वरच्या दिकिंवा खालच्या दिशेनी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यातून फायदा मिळवला जातो. शेअर्समध्ये वर जाणारा ट्रेण्ड असेल तर ट्रेडर त्याच्याकडे असलेला स्टॉक विकतो. त्यामुळे त्याला सरासरीपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात आणि ट्रेण्ड जर खालच्या दिशेने येत असेल तर त्याची किंमत वाढते. अशावेळी ट्रेडर्स मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करून ठेवतात.

पोझिशन ट्रेडिंग (Position Trading)

शॉर्ट टर्म किमतींच्या हालचालींऐवजी एखाद्या शेअर्समधील दीर्घकालीन क्षमतेचा फायदा घेण्यासाठी पोझिशन ट्रेडिंगमध्ये साधारण काही महिन्यांसाठी शेअर्स होल्ड केले जातात. ही ट्रेडिंग स्टाईल अशा व्यक्तींसाठी उत्तम आहे जे मार्केट ट्रेडर नाहीत किंवा शेअर मार्केटसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत किंवा ते मार्केटमध्ये नियमित सहभागी होऊ शकत नाहीत.