लोक अनेकवेळा टीडीएस (TDS) आणि टीसीएस (TCS) याबद्दल संभ्रमात असतात. या दोन्हींमधला फरक अनेकांच्या लक्षात येत नाही. कर वसूल करण्याच्या खरं तर या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स तर टीसीएस म्हणजे टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स. या दोन्ही प्रकारामध्ये कर भरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. नवीन माणसाला हा फरक लवकर लक्षात येत नाही. मात्र दोन्ही बाबतीत रिटर्न (Return) भरणं गरजेचं आहे. काय नेमका फरक आहे, जाणून घेऊ...
Table of contents [Show]
टीडीएस म्हणजे काय?
व्यक्तीच्या कोणत्याही उत्पन्नातून कर वजा करून उर्वरित रक्कम दिली जाते. अशाप्रकारच्या कराच्या माध्यमातून कापल्या जाणाऱ्या रकमेला टीडीएस म्हणजेच टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स असं म्हणतात. या टीडीएसच्या माध्यमातून सरकार कर वसूल करत असतं. विविध प्रकारे उत्पन्न लोक मिळवत असतात. त्याचे स्त्रोत विविध असतात. जसं की पगार, गुंतवणुकीवर मिळणारं कमिशन, व्याज याचा यात समावेश होतो. ही टीडीएस म्हणून ठराविक रक्कम पैसे भरणाऱ्या संस्थेमार्फत कापली जात असते. प्रत्येक आर्थिक वर्षापूर्वी कोणत्या प्रकारच्या पेमेंटवर किती टीडीएस कापला जाणार याची घोषणा सरकार आधीच करत असतं. ज्यांच्यामार्फत कर कापला जातो, त्यांना डिडक्टर (Deductor) म्हणतात. तर ज्यांचा टीडीएस कापला जातो त्यांना डिडक्टी (Deductee) म्हटलं जातं.
कसा कापला जातो टीडीएस?
एका उदाहरणाच्या माध्यमातून पाहू. एखाद्याला समजा 10 लाख रुपयांची लॉटरी लागली असेल. नियमानुसार जिंकलेल्या रकमेवर 30 टक्के टीडीएस कापण्याचा नियम आहे. म्हणजे टीडीएस कापून उरलेली रक्कम तुम्हाला मिळणार. 10 लाख रुपयांतून 30 टक्के वजा केल्यास उरलेली रक्कम तुम्हाला मिळेल. म्हणजे 3 लाख रुपये कापून उरलेले 7 लाख तुम्हाला मिळतील. तर कुठूनही प्रोफेशनल फीस तुम्हाला मिळत असेल तर 30,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक वार्षिक पेमेंट केल्यास 10 टक्के टीडीएस कापला जातो.
टीसीएस म्हणजे काय?
उत्पन्नाच्या स्त्रोतावर टीसीएस कापला जातो. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंच्या व्यवहारावर हा कर लावला जातो. जसं की दारू, तेंदूपत्ता, लाकूड, भंगार, खनिजं अशा मालाची किंमत घेताना त्यात कराचा पैसाही जोडून सरकारकडे जमा केला जात असतो. खरेदीदाराकडून टीसीएस गोळा करून तो सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी ही संबंधित मालाची विक्री करणाऱ्या व्यक्तीची असते. म्हणजेच त्या विक्रेत्याची जबाबदारी असते. आयकर कायद्याच्या कलम 206C (1) नुसार, व्यावसायिक कारणांसाठी काही वस्तूंच्या विक्रीवरच हा कर कापण्याचा नियम आहे. वस्तू वैयक्तिक उपभोगासाठी असतील तर कर लागत नाही.
कसा कापला जातो टीसीएस?
एखाद्या व्यक्तीनं जर एका कंपनीला एक लाख रुपये किंमतीचं भंगार विकलं. भंगारावर 1 टक्का टीसीएसचा नियम आहे. एक लाख रुपयांचा 1 टक्के म्हणजे 1000 रुपये होय. अशाप्रकारे कंपनीकडून एकूण एक लाख एक हजार रुपये घेतले जाणार आहेत. अशा प्रकारे जमा झालेल्या 1000 रुपयांचा टीसीएस आयकर विभागाकडे जमा करावा लागेल. वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळा दर असणार आहे. वरील वस्तू पाहिल्यास त्यातल्या तेंदूपत्त्यावर कमाल पाच टक्के, दारूवर 2.5 टक्के असा भिन्न दर आहे.