Tax Saving FD: मुदत ठेवी ही गुंतवणुकीची अशी एक योजना आहे; ज्याद्वारे एक ठराविक रक्कम निश्चित कालावधीसाठी निश्चित व्याजदराने बॅंकेत जमा केली जाते. मुदत ठेवीचा शब्दश: अर्थ जर पाहिला तर आपल्या लक्षात येते की, एका ठराविक मुदतीसाठी जमा केलेली पुंजी. या पुंजीवर बॅंका जे व्याज देतात. ते बहुतांशवेळा फिक्स असते. म्हणूनच त्याला फिक्स डिपॉझिट किंवा एफडी म्हटले जाते. टॅक्स वाचवण्यासाठी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. ज्या मुदत ठेवींमधून कर सवलतीचा लाभ घेता येतो. त्या मुदत ठेवींना टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवी म्हणतात.
फिक्स डिपॉझिट ही मागील काही वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली गुंतवणूक योजना आहे. कारण या योजनेत जमा केलेले पैसे सुरक्षित राहतात आणि त्यातून निश्चित परतावा मिळतो. तसेच या योजनेवर शेअर मार्केटमधील चढ-उताराचा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागासह ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घ्यायची नाही. अशा गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेव हा सर्वांत सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक पर्याय राहिला आहे. मुदत ठेवींमध्ये गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीसाठी एक रकमी रक्कम जमा करावी लागते. या जमा केलेल्या रकमेवर संबंधित बॅंक/संस्थेकडून त्यावर निर्धारित व्याज दिले जाते.
मुदत ठेवी कोठे ठेवता येतात?
मुदत ठेवी या वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये ठेवता येतात. जसे की, पोस्ट ऑफिस, सरकारी बॅंका आणि नॉन-बॅंकिंग वित्तीय कंपन्यांमध्येही मुदत ठेवी ठेवता येतात. या प्रत्येक संस्थांचे / बॅंकांचे व्याजदर वेगवेगळे असतात. तसेच मुदत ठेवींमध्ये जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. मुदत ठेवींचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात नियमित मुदत ठेवी, ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, एनआरआय ठेवी, कॉर्पोरेट मुदत ठेवी, त्याचप्रमाणे टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवीसुद्धा असतात.
नियमित मुदत ठेवीवर कर सवलत मिळत नाही. पण टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवींवर कर सवलत मिळते. टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवींवरील गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर वजावटीचा लाभ घेता येतो. याची एका आर्थिक वर्षातील मर्यादा 1.50 लाख रुपये आहे.
टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवीची वैशिष्ट्ये
- नियमित मुदत ठेवी आणि टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवींवर सेव्हिंग खात्यापेक्षा जास्त व्याज मिळते.
- टॅक्स सेव्हिंग आणि नियमित मुदत ठेवींवर मिळणारे व्याजदर हे थोड्याफार प्रमाणात समान असते.
- नियमित मुदत ठेवींवर कर सवलत मिळत नाही; पण टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवींवर कर सवलत मिळते.
- मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लागू शकतो. टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवींनाही हा नियम लागू आहे.
- मुदत ठेवींमधून मिळणारे व्याज संबंधित व्यक्तीच्या एकूण उत्पन्नामध्ये जमा होते.
- टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवींचा लॉक-इन कालावधी 5 वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकतो.
- मुदत ठेवींवरील व्याज 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि वर्षानुसार मिळण्याची सोय आहे.