SDL Investment: राज्य सरकारे विविध लोकोपयोगी आणि कल्याणकारी कामे करण्यासाठी भांडवली बाजारातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे पैसा उभारते. बाँड म्हणजेच सरकारी रोख्यांद्वारे राज्य सरकार पैसे उभारते. स्टेट डेव्हलपमेंट लोन (SDL) हा सुद्धा एक रोख्यांचा प्रकार असून राज्य सरकार याद्वारे पैसे उभारते. यामध्ये जोखीम कमी असते.
SDL रोखे हे 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीचे असतात. (What is SDL Investment) व्याजदर वाढत असताना हे SDL गुंतवणुकीसाठी आकर्षक झाले आहेत. या गुंतवणुकीतून परतावाही चांगला मिळू शकतो.
SDL बद्दल महत्त्वाची माहिती
SDL सहसा 10 वर्षांचे असतात. मात्र, आता काही राज्ये कमी कालावधीचे रोखे सुद्धा आणत आहेत.
सरकारी सार्वभौम रोख्यांप्रमाणेच हे रोखे असतात.
आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरून हे रोखे इश्यू केले जातात.
बँक, म्युच्युअल फंड, प्रोव्हिडंड फंड यांच्यावतीने या रोख्यांची विक्री होते. लिलाव पद्धतीने आरबीआय हे रोखे वित्तसंस्थांना देते. त्यांच्याकडून या रोख्यांची विक्री केली जाते.
आरबीआयच्या इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म NDL वरुन दुय्यम बाजारात या रोख्यांची खरेदी विक्रीही होते.
SDL गुंतवणुकीतून काय मिळू शकते?
या रोख्यांना सरकारची हमी असते. कारण, आरबीआयद्वारे हे इश्यू केले जातात.
केंद्रीय रोखे, मुदत ठेवी यांच्यापेक्षा सहसा जास्त व्याजदर मिळतो.
दर सहा महिन्यांनी व्याज मिळते. तर मुद्दल रोख्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळते.
व्याजाची रक्कम करपात्र असते. हे रोखे एक वर्षांच्या आत दुय्यम बाजारात विकले तर अल्पकालीन भांडवली नफ्यावर कर लागू होतो. तर एक वर्षांनी विक्री केल्यानंतर दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कर लागू होतो.
SDL विकत घ्यावे का?
SDL अल्प जोखीम रोखे असले तरी व्याजदर आणि जोखीम राज्याच्या स्थितीनुसार बदलू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहूनच निर्णय घ्यावा.
वैयक्तिक गुंतवणुकदारांना हे रोखे खरेदी करण्यासाठी आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरुनच मिळतील. त्यामुळे खरेदी करण्याचे पर्यायही मर्यादित आहेत.
दुय्यम बाजारात रोखे विक्री करताना चांगली किंमत मिळेल याची शाश्वती नाही. (SDL bonds) कारण, व्याजदर किती आहे यावर रोख्यांचे मूल्य ठरते.
मॅच्युरिटीपर्यंत थांबण्याची तयारी असेल तर SDL चांगले ठरू शकतात. तुम्ही निश्चित परतावा देणाऱ्या एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक केली असेल तर SDL मध्ये गुंतवणूक करून तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता आणू शकता. मात्र, त्यापूर्वी आर्थिक सल्लागाराकडून मार्गदर्शन घ्यावे.