Systematic Deposit Plan: आतापर्यंत तुम्ही SIP बद्दल भरपूर ऐकले असेल, वाचले किंवा त्यात गुंतवणूक देखील केली असेल. पण तुम्हाला SDP माहित आहे का? ते कसे काम करते? चला तर मग जाणून घेऊया सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅन म्हणजेच एसडीपीबद्दल.
म्युच्युअल फंड आणि एसआयपी हे जणू काही गुंतवणुकीचे समीकरणच बनले आहे. या पद्धतशीर गुंतवणूक पद्धतीत इतर संस्थाही संधी शोधत आहेत. ज्यातून गुंतवणूकदारांना निश्चित असा परतावा देता येऊ शकतो. असाच एक प्रयत्न बजाज फायनान्स कंपनीने केला असून, त्यांनी सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅन (Systematic Deposit Plan-SDP) मागील वर्षी आणला आहे. या प्लॅन अंतर्गत गुंतवणूकदार एकदम रक्कम गुंतवण्याऐवजी प्रत्येक महिन्याला पैसे गुंतवू शकतात.
एसआयपी आणि एसडीपी ही दोन्ही नावे सारखी असली तरी यांचे कार्य वेगळेवेगळे आहे. एसडीपी ही बँकेतील आणि पोस्ट ऑफिसच्या योजनेतील आवर्ती मुदत ठेव योजने (Recurring Deposit-RD) प्रमाणे आहे.
एसडीपीचे फायदे (Benefits of SDP)
आरडी आणि एसआयपी (RD & SIP) प्रमाणे, एसडीपी म्हणजे सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅनद्वारे गुंतवणूकदारांना मासिक पातळीवर गुंतवणूक करण्याची संधी देते. गुंतवणूकदाराला एकाच वेळी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्यास, एसडीपी सातत्याने आणि नियमित गुंतवणूक करण्याची परवानगी देते.
एसडीपी विरुद्ध एसआयपी (SDP Vs SIP)
एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमधील इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा मुख्य उद्देश हा रुपी कॉस्ट एव्हरजिंग (Rupee Cost Averaging) हा आहे. जिथे गुंतवणूकदार समान रक्कम गुंतवून बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेतात. एसआयपीमुळे गुंतवणूकदाराला मार्केट कोणत्याही दिशेला असले तरी त्यात नियमितपणे गुंतवणूक करता येते. त्याचा फायदा एसआयपीतून मिळत असल्याचे दिसते.
मार्केट वर गेले की एनएव्ही ची किंमत वाढते आणि गुंतवणूकदाराला कमी युनिट्स मिळतात. मार्केट डाऊन झाले की, एनएव्हीची किंमत पडते आणि गुंतवणूकदाराला जास्त युनिट्स मिळतात. नेमका याचाच फायदा गुंतवणूकदाराला दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळतो.
पण एसडीपीमध्ये गुंतवणुकीच्या काळात सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅनमधून असा कोणताही फायदा गुंतवणूकदाराला मिळत नाही. यामध्ये गुंतवणूकदाराला फक्त एकरकमी रक्कम भरण्याऐवजी ती टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत मिळते. याचा व्याजदर फिक्सड् आणि समान असतो. त्यामुळे एसडीपी गुंतवणूकदारांना विशेष असे कोणते फायदे देत नाही. फक्त ज्यांच्याकडे एकत्रित पैसे भरण्याची क्षमता नाही. त्यांना प्रत्येक महिन्याला पैसे भरण्याची संधी मिळते.
अशाप्रकारे एसडीपी आणि एसआयपी यांची थेट तुलना होऊच शकत नाही. एसडीपीची वैशिष्ट्ये ही थोड्याफार प्रमाणात बँक आणि पोस्ट ऑफिसमधील आरडी योजनेप्रमाणे आहेत.