पगार सुधारणा म्हणजेच सॅलरी करेक्शन होय. तुम्ही जेव्हा कुठली कंपनी जॉईन करता तेव्हा जर तुम्हाला देऊ केलेला पगार काही कारणांमुळे जर कमी किंवा जास्त असेल तर त्यावेळी पगार सुधारणा केली जाते. याद्वारे ज्या विसंगतीमुळे पगार कमी किंवा जास्त झाला असेल, त्याची देखील पाहाणी केली जाते आणि मार्केटच्या हिशोबाने आणि तुमची काम करण्याची गुणवत्ता लक्षात घेता पगारात सुधारणा कली जाते.
कधीकधी कुठल्या तरी महिन्यात तुमचे पैसे कापले जातात, त्याची विचारणा जोवर तुम्ही करत नाही तोवार तुम्हांला त्याचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे Salary Slip मध्ये नमूद केलेल्या गोष्टींचे देखील स्पष्टीकरण तुम्ही कंपनीकडे मागू शकता. यामुळे तुम्हांला तुमचे नेमके पैसे किती कापले गेले आणि कोणत्या कारणासाठी कापले गेले याची कल्पना येईल. जर चुकीची वजावट तुमच्या पगारातून झाली असेल तर त्याची भरपाई देखील तुम्ही मागू शकता.
हे झालं एका महिन्याच्या पगाराविषयी. मात्र अनेकदा तुमची कामाची गुणवत्ता अधिक असते, तुम्हांला कामाच्या ठिकाणी पद देखील मोठे असते, मात्र पगार काही त्या पदाला साजेसा नसतो. तुमच्याच पदावर काम करणारा तुमचा मित्र तुमच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट पगार घेत असेल तर तुमच्या गुणवत्तेशी अन्याय असतो असे मानायला हरकत नाही. अशावेळी तुम्ही काय कराल? कंपनी सोडायचा विचार कराल? की आहे त्याच कंपनीत पगार वाढवून घ्याल? यातला सोयीस्कर आणि फायद्याचा विकल्प तुम्ही स्वतःच ठरवायचा आहे, आम्ही केवळ सॅलरी करेक्शन कसे करून घ्यायचे याची माहिती तुम्हांला येथे देणार आहोत.
तुम्ही ज्या कंपनीत कामाला आहात, त्या कंपनीच्या HR कडे लेखी स्वरूपात तुम्ही तुमचे म्हणणे मांडले पाहिजे. त्याआधी तुम्हांला काही मुद्द्यांचा अभ्यास करावा लागेल. काही मुद्दे खालीलप्रमाणे:
स्वतःचे बाजारमूल्य जाणून घ्या: सर्वात आधी तुम्ही स्वतःची गुणवत्ता, अनुभव, कार्यशैली याच्या आधारे स्वतःचे मुल्यांकन करा. तुमच्या वयाचे, अनुभवाचे आणि तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावरील कर्मचारी किती पगार घेतात याचा अंदाज घ्या. जर पगारात तफावत दिसत असेल तर तुम्ही लागलीच त्याबद्दल कंपनीला कळवले पाहिजे. स्वतःचे बाजारमूल्य काय आहे हे समजून घेतल्यास पगार सुधारणेची मागणी करताना अडचण येणार नाही.
कंपनीला दिलेले योगदान अधोरेखित करा: तुम्ही आजवर कंपनीच्या विकासासाठी दिलेले योगदान अधोरेखित करायला विसरू नका. तुम्ही कंपनीसाठी किती महत्त्वपूर्ण आहात याची यादीच तुमच्याकडे असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तेव्हा साहजिकच पगारवाढ करून घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे कारण असेल.
कंपनीतील सद्यस्थिती सांगा: वर्तमानकाळात तुम्ही कंपनीसाठी काय काम करत आहात आणि त्यातून कंपनीला काय फायदा होतो आहे हे सांगायला विसरू नका. तुम्ही प्रामाणिकपणे कंपनीच्या उत्कर्षासाठी मेहनत घेत आहात आणि ही मेहनत दृश्य स्वरूपात दिसते सुद्धा आहे हे कंपनीला पटवून देता यायला हवे.
आत्मविश्वास बाळगा: हा अतिशय महत्वाचा असा विषय आहे. तुम्ही तुमच्या कर्तुत्वावर जोवर विश्वास ठेवणार नाही तोवर कंपनी देखील तुमच्यावर विश्वास दाखवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आजवर केलेल्या कामाचा आणि वर्तमानात करत असलेल्या कामाचा लेखाजोका मांडणात आत्मविश्वास बाळगा. तुमचा आत्मविश्वासच तुम्हांला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, हे विसरू नका.
आता तुम्ही विचाराल, की पगार सुधारणेची मागणी कधी करायला हवी? तुम्ही काम करत असलेली कंपनी जर सुस्थितीत असेल तर तुम्ही कधीही सॅलरी करेक्शनची मागणी करू शकता. परंतु कंपनी आर्थिक अडचणीत असताना जर तुम्ही मागणी करत असाल तर ही मागणी फेटाळली जाण्याची शक्यता अधिक आहे. अशावेळी तुम्ही कंपनी बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. अनेक कर्मचाऱ्यांना पगार सुधारणेची प्रक्रिया माहित नसते, त्यामुळे गुणवत्ता असूनही आर्थिक नुकसान त्यांना सहन करावे लागते. त्यामुळे आता या लेखात सांगितलेली प्रक्रिया वापरून तुम्ही देखील पगारवाढीसाठी पात्र आहात का याची माहिती करून घ्या.