Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

झटपट पैसे कमविण्याचा नादात कोट्यावधी रुपयांची फसवणूक, Zerodha च्या सीईओंनी ‘या’ स्कॅमबाबत केले सावध

Pig Butchering Scam

Image Source : https://www.freepik.com/

ऑनलाइन स्टॉक ब्रोकर प्लॅटफॉर्म Zerodha चे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी Pig Butchering Scam बाबत लोकांना सावध केले आहे.

झटपट पैसे कमविण्याच्या नादात आपण कोणत्याही गोष्टींवर सहज विश्वास ठेऊन पैसे गुंतवतो. मात्र, आकर्षक ऑफर, भरपूर परतावा, परदेशात नोकरी मिळविण्याच्या आमिषाला बळी पडल्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. 

ऑनलाइन स्टॉक ब्रोकर प्लॅटफॉर्म Zerodha चे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी अशाच एका मोठ्या स्कॅमबाबत लोकांना माहिती देत यापासून सावध राहण्यास सांगितले आहे. कामथ यांनी या फसवणुकीला ‘Pig Butchering Scam’ म्हटले आहे. हा स्कॅम नक्की काय आहे व यापासून वाचण्यासाठी काय करायला हवे, त्याबाबत जाणून घेऊया. 

Pig Butchering Scam काय आहे?

पिग बुचरिंग स्कॅम ही काही केवळ एकाच प्रकारे होणारी फसवणूक नसून, यात वेगवेगळ्या स्कॅमच्या माध्यमातून लोकांना लुटले जाते. या स्कॅममध्ये आधी लोकांचा विश्वास संपादन केला जातो व त्यानंतर त्यांची फसवणूक केली जाते. यात वेगवेगळे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळले जातात.

कशाप्रकारे होते फसवणूक?

कामथ यांनी या स्कॅमची माहिती देताना सांगितले की, स्कॅमर्स प्रेम व मैत्रीच्या नावाखाली बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून विश्वास संपादन करतात. त्यानंतर नोकरी व जास्त परतावा देण्याच्या नावाखाली पैसे मागतात. अनेकदा परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे मागितले जातात. मात्र, परदेशात गेल्यावर त्यांनाच बंदी बनवून इतर भारतीयांची फसवणूक करण्यास सांगितले जाते. 

या स्कॅमपासून वाचण्यासाठी काय करायला हवे?

नितीन कामथ यांनी अशा स्कॅमपासून स्वतःला वाचविण्यासाठी काही टिप्स देखील शेअर केल्या आहेत. 

  • व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि डेटिंग अ‍ॅप्सवर अनोळखी व्यक्तीच्या मेसेजला उत्तर देऊ नका.
    जर एखादी व्यक्ती तुम्हाला नवीन अ‍ॅप्स डाउनलोड करण्यास सांगत असेल अथवा लिंक ओपन करण्यास सांगत असेल तर त्वरित सावध व्हा. 
  • भावनेच्या भरात जाऊन गडबडीत कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका.
  • अनेकजण घाबरून अशा फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
  • कोणतीही शंका असल्यास त्वरित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा. तसेच, जर कोणीही नोकरी देण्याच्या नावाखाली पैसे मागत असल्यास अथवा कमी कालावधीमध्ये जास्त परतावा मिळेल असा दावा करत असल्यास त्वरित सतर्क व्हा.
  • आधार, पासपोर्ट, गुंतवणूक व बँक खात्याशी संबंधित खासगी माहिती कोणत्याही व्यक्तीशी शेअर करू नका. 

कामथ यांनी अनेक भारतीय परदेशात नोकरी मिळविण्याच्या व झटपट पैसे कमविण्याच्या नादात फसवणुकीला बळी पडत असल्याचे देखील म्हटले. तसेच, सरकार सायबरक्राइम विभागाच्या माध्यमातून अशा स्कॅमपासून वाचण्यासाठी लोकांना मदत करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.