बदलत्या काळात आपण कामं ऑनलाईन करतोय, एखादा अभ्यासक्रमही ऑनलाईन पूर्ण करून डिग्री घेतोय, अशावेळी केलेल्या कामाची गुणवत्ता किंवा शिक्षणातली आपली तयारी जोखण्यासाठी ऑनलाईन टूल तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कर्मचारी बहुतेक करून घरून काम करत असेल तर त्यांची कार्यक्षमता नेमकी किती आहे, त्यांच्यात प्रगती होतेय की नाही, हे तपासण्यासाठी कंपन्या अधून मधून असं ऑनलाईन टूल वापरून याचा अंदाज घेत असतात. आणि अशा ऑनलाईन परीक्षांच्या दिव्यातून कर्मचारी आणि विद्यार्थी अशा दोघांनाही जावं लागतं. यालाच ऑनलाईन असेसमेंट असं म्हणतात. किंवा ऑनलाईन गुणवत्ता तपासणी.
कंपन्यांसाठीही ऑनलाईन असेसमेंट कमी खर्चाची, तसंच एकाचवेळी शेकडो लोकांची परीक्षा घेता येत असल्यामुळे सोयीची प्रणाली झाली आहे.
कॉर्पोरेट कंपन्या कशी करतात ऑनलाईन असेसमेंट How Corporates Do Online Assessment
महत्त्वाचं म्हणजे अलीकडे बहुतेक कंपन्या ऑनलाईन मुलाखतींनाच पसंती देत आहेत. त्यामुळे प्रवासाचा आणि साधनांचा खर्चही कमी होतो. अगदी IITमध्ये झालेल्या कॅम्पस मुलाखतींच्या वेळीही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हाच मार्ग पत्करला.
ऑनलाईन मुलाखतींचं प्रमाण हल्ली 45%नी वाढलंय. आणि त्यासाठी कंपन्या ऑनलाईन टूलचा वापर करत आहेत. फार्मा, माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग, मीडिया, ऑटो, रिटेल, इन्श्युरन्स अशा सगळ्याच क्षेत्रात ऑनलाईन असेसमेंटचं प्रमाण वाढत आहे.
ऑनलाईन असेसमेंटसाठी कशी तयारी करायची? How To Prepare For Online Assessment
ऑनलाईन असेसमेंट ही स्पर्धा परिक्षेसारखी आहे. त्यामुळे त्याची तयारीही वेगळी लागते. त्यामुळे नियमित अभ्यासक्रमाबरोबरच अशा असेसमेंटची वेगळी तयारी करण्याचा सल्ला शिक्षण तज्ज्ञ देतात.
तसंच यात साधारणपणे तीन प्रकारच्या चाचण्या असतात. व्यक्तिमत्व चाचणी, कामगिरीची चाचणी आणि ज्ञानाची चाचणी. या तीनही प्रकारांचा सराव करावा लागतो. निदान ऑनलाईन प्रणालीचा सराव असणं महत्त्वाचं आहे. आणि सरावाचे अनेक स्क्रीनकास्ट व्हीडिओ ऑनलाईन उपलब्ध आहेत.
ही असेसमेंट ऑनलाईन द्यायची असल्यामुळे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो साधनाचा. यातल्या अनेक चाचण्या मोबाईल किंवा टॅबवरूनही देता येतात. पण, त्या व्यतिरिक्त काही साधनांची गरज असेल तर HRकडून माहिती करून ध्या.
आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आत्मविश्वास. परिक्षेचं दडपण सगळ्यांनाच असतं. पण, ते स्वीकारून आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचं आव्हान प्रत्येकासमोर असतं.