गुंतवणुकीच्या विविध पर्यायांपैकी एक पर्याय म्हणून डिबेंचर्स ओळखले जातात. बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने मुदत ठेवी (Fixed Deposit-FD) ठेवल्या जातात. अगदी त्याचप्रमाणे डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केली जाते. डिबेंचर हा एक दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ज्याद्वारे गुंतवणूकदाराला विशिष्ट कालावधीसाठी निश्चित असे व्याज दिले जाते. डिबेंचर्सचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कन्व्हर्टीबल डिबेंचर्स (Convertible Debenture) आणि दुसरा म्हणजे नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स (Non-Convertible Debenture).
नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्सचे शेअर्स किंवा इक्विटीमध्ये रुपांतर होत नाही. याचा व्याजदर कंपनी किती एनसीडी (Non-Convertible Debenture) इश्यू करते, त्यावर आधारित असतो. एनसीडीमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार, बँकिंग कंपन्या, कॉर्पोरेट आणि नॉन-कॉर्पोरेट सेक्टरमधील संस्था आणि डिलर्स गुंतवणूक करू शकतात.
एनसीडी सुरक्षित गुंतवणूक पर्याय
तुम्ही जर सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि परतावाही चांगला हवा असेल तर तुमच्यासाठी नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स हा एक योग्य पर्यय ठरू शकतो. मागील काही वर्षांपासून कंपन्यांद्वारे एनएसडीद्वारे पैसे उभारण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. यामध्ये सरकारी कंपन्यासुद्धा उतरल्या आहेत. मागच्या वर्षी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा InvIT (Infrastructure Investment Trust) शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात आला होता. यामधील गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना 8.05 टक्के व्याज दिला गेला. ही गुंतवणूक विश्वासार्ह आणि सुरक्षित मानली जाते. पण यामध्ये गुंतवणू करण्यापूर्वी त्याची फायदे काय आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स म्हणजे काय?
नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स हा कंपन्यांसाठी ओपन मार्केटमधून पैसे उभारण्याचे एक अधिकृत माध्यम आहे. काही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून पैसे गोळा करतात. अगदी त्याचप्रमाणे कंपन्या एनसीडीमधून पैसे गोळा करतात. आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाते. पण एनसीडीमध्ये शेअर्स दिले जात नाहीत. तर त्याबदल्यात गुंतवणूकदारांना एका ठराविक कालावधीसाठी निश्चित असा व्याजदर दिला जातो. कालावधी पूर्ण झाला की, मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज दिले जाते.
व्याजदर आणि कालावधी काय?
एनसीडीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा मिळतो. अर्थात तो प्रत्येक कंपनीच्या धोरणानुसार ठरत असतो. पण कंपन्या नक्कीच एफडीपेक्षा जास्त व्याजदर देतात. एनसीडीवरील व्याज प्रत्येक महिन्याला, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी, वर्षानी किंवा कालावधी पूर्ण झाल्यावर एकत्रित देण्याची सुविधा आहे. गुंतवणूकदाराला यातील एक पर्याय निवडायचा असतो. तसेच एनसीडीवर मिळणारे वार्षिक व्याज 5 हजारांपर्यंत असेल तर त्यावर टीडीएस (TDS) कापला जात नाही. 5 हजारापेक्षा जास्त व्याजावर टीडीएस कापला जातो.