• 04 Oct, 2022 16:27

मोबाईल बँकिंग म्हणजे काय? What is Mobile Banking?

mobile banking

मोबाईल बँकिंगचा (Mobile Banking) शोध लागल्यापासून नागरिकांना बँकेच्या रांगेपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापासून, रक्कम भरण्यासाठी लोकांना बँकेत रांगा लावण्याची गरज नाही. कारण आता बँक लोकांच्या हातात आहे.

पूर्वी, छोट्या-मोठ्या खरेदीसाठी किंवा व्यवहारांसाठी रोख रक्कम हातात असणे आवश्यक होते. पण आता मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking) एक रुपयापासून एक लाखापर्यंतचे व्यवहार काही क्षणात करता येतात. मोबाईल बँकिंगने लोकांचे जीवन सोपे केले आहे. पैसे पाठवणे, पैसे घेणे, खात्यातील शिल्लक तपासणे, बिल भरणे इत्यादी कामे मोबाईल  बँकिंगच्या माध्यमातून सहज करता येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँका मोबाईल बँकिंग सेवा (Mobile Banking Service) मोफत देतात. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, सर्व बँकांकडे स्वतःचे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन आहे, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे व्यवहार करू शकता. ते सुद्धा कोणत्याही अडचणींशिवाय.

मोबाईल बँकिंगसाठी आवश्यक असणारी सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्लिकेशन्स

UPI (युनिफाईड पेमेंट इंटरफेस)

मोबाईल बँकिंगची युपीआय (UPI) ही प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केली आहे. हे एक मोबाईल अ‍ॅप आहे; ज्याद्वारे ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही प्रणाली वापरण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट सुविधा असलेला स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. सध्या सुमारे 52 बँका या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना मोबाईल बँकिंगची सुविधा पुरवत आहेत. बँकेच्या वेबसाईटवरून हे अ‍ॅप डाउनलोड करून युपीआय सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल.

मोबाईल वॉलेट (Mobile Wallet)

मोबाईलवरून पेमेंट करण्याचे हे सर्वात नवीन तंत्रज्ञान आहे. हे एका पाकीटासारखे आहे; ज्यात पैसे साठवले जातात आणि हवे असतील तेव्हा वापरता येतात. सध्या अनेक वॉलेट अ‍ॅप उपलब्ध आहेत. यात पेटीएम हे एक मोबाईल वॉलेट आहे. इतर बँकांनीही मोबाईल वॉलेट बाजारात आणली आहेत. या वॉलेटचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नसते. त्यात आधी पैसे टाकावे लागतात, म्हणजेच ते रिचार्ज करावे लागते. जितके जास्त पैसे तुम्ही त्यात टाकता, तितके तुम्ही खर्च करू शकता. मोबाईल वॉलेट हे लहान खर्च आणि पेमेंटसाठी सर्वात योग्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

वॅप मोबाईल बॅंकिंग (WAP Mobile Banking) 

ग्राहक संबंधित बँकेचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन त्यांच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करू शकतात आणि नंतर बँकेने दिलेल्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी त्याचा वापर करू शकतात. त्यांना मोबाईल बँकिंगसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागते आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्यासाठी त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल मिळवणे आवश्यक आहे. बहुतेक बँका आयओएस (iOS) आणि अ‍ॅड्रॉईड (Android) साठी मोबाइल अ‍ॅप देतात. काही बँका वेगवेगळ्या बँकिंग सेवांसाठी वेगवेगळी मोबाईल अ‍ॅप्स देतात.

एसएमएस मोबाईल बँकिंग (SMS Banking)

बहुतेक बँका एसएमएसवरून मोबाईल बँकिंग सेवा देतात. SMS बँकिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सेवेसाठी ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर नोंदणी करून साईन-अप करणे आवश्यक असते. त्यानंतर, ते त्यांच्या खात्यातील शिल्लक, खात्याचे मिनी स्टेटमेंट इत्यादी जाणून घेण्यासाठी बँकेला एसएमएस पाठवू शकतात. त्यानंतर ग्राहकाने विनंती केलेली माहिती असलेल्या एसएमएसला बँक प्रतिसाद देते. एसएमएस बँकिंग सेवा घेण्यासाठी ग्राहकांना स्मार्टफोन किंवा इंटरनेटचा वापर करण्याची आवश्यकता नाही. या सेवेचा लाभ घेण्यासाठी बँकेकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि एसएमएस पाठवण्यासाठी तुम्ही वापरलेला मोबाईल क्रमांक सारखा असणे आवश्यक आहे

अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंट्री सर्विस डेटा (USSD)

मोबाईल बँकिंगचा हा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. यासाठी, तुमच्याकडे फक्त एक मोबाईल फोन आणि सिमकार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी स्मार्टफोन किंवा इंटरनेट असणे गरजेचे नसते. मोबाईल बँकिंगच्या या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही कोणत्याही बँक खात्यात पैसे पाठवू शकता. तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता आणि चार ते पाच बँकांमधील व्यवहाराचे तपशील मिळवू शकता.

 

मोबाईल बँकिंगचे फायदे

  • बँकेत न जाता पासबुक, क्रेडिट कार्ड, चेकबुक, डेबिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • कोणत्याही वेळी, कधीही, कुठूनही अगदी बँक बंद झाल्यानंतरही मोबाईल बँकिंगच्या मदतीने व्यवहार करू शकतो.
  • मोबाईल बॅंकिंगमध्ये क्रेडिट/डेबिट अलर्ट, बॅलन्स चेक, ट्रान्झॅक्शन, फंड ट्रान्सफर सुविधा, मिनिमम बॅलन्स अलर्ट इत्यादी सुविधा मिळतात.
  • ग्राहक आणि लाभार्थी एकाच बँकेचे खातेधारक असतील, तर पैशाचा व्यवहार जलद होतो.
  • मोबाईल बँकिंगच्या मदतीने अनेक प्रकारची बिले घरी बसून भरता येतात.

 

मोबाईल बँकिंगचा वापर करून तुम्ही तुमचा बँकेच्या कामासाठी वापरला जाणारा वेळ वाचवू शकता. तसेच भारतातील अनेक ग्रामीण भागात इंटरनेट सेवेचा अभाव असणाऱ्या ठिकाणी मोबाईल बँकिंगचा फायदा होऊ शकतो.