Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Of Baroda App Scam: बँक ऑफ बडोदा अ‍ॅप घोटाळा कसा झाला? टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काय केलं?

Bank of Baroda app fraud

Image Source : www.twitter.com

एकदा बनावट ग्राहकाची अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतर हे खाते पुन्हा काढून टाकण्यात येत होते. त्यानंतर पुन्हा दुसरे बनावट खाते सुरू करण्यासाठी मोबाइल नंबर वापरण्यात येत होता.

Bank Of Baroda App Scam: बँक ऑफ बडोदामध्ये नुकताच एक डिजिटल घोटाळा समोर आला आहे. विशेष म्हणजे या डिजिटल घोटाळ्यात बँकेचे कर्मचारीच सहभागी होते. त्यामुळे लाखो ग्राहकांच्या माहितीलाही धोका निर्माण झाला होता. मात्र, या प्रकाराची माहिती होताच बँकेने तत्काळ कारवाई केली. 

नक्की प्रकरण काय?

बँक ऑफ बडोदाच्या काही शाखेतील कर्मचारी मोबाइल बँकिंग अ‍ॅपवरील खाते उघडण्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी गैरप्रकार करत असल्याचे आढळून आले. मोबाइल अ‍ॅपवर ग्राहकाची नोंदणी करताना बँकेतील सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि इतर व्यक्तींचे मोबाइल नंबर लिंक करण्यात आले. खाते सुरू केल्यानंतर पुन्हा तेच नंबर अनेक वेळाही वापरण्याची शक्कल कर्मचाऱ्यांनी शोधून काढली होती. 

"Bob World" या अ‍ॅपवर लॉग इन करताना हा घोटाळा उघडकीस आला. अल जझिरा या वृत्तवाहिनीने या संबंधी सर्वप्रथम बातमी दिली होती. जुलै महिन्यात सर्वप्रथम हा प्रकार सुरू झाला होता. मात्र, त्यावरील चौकशी अद्यापही सुरू आहे.

टार्गेट पूर्ण करण्यासाठी धडपड 

प्रत्येक बँकेत नवे खाते सुरू करण्यासाठी आणि विविध सेवा ग्राहकांना विकण्याचे टार्गेट कर्मचाऱ्यांना दिले जाते. हे टार्गेट पूर्ण झाले नाही तर दबावही टाकला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी चांगल्या कामाची पावती मिळवण्यासाठी भलताच मार्ग निवडला. त्यामुळे माहिती चोरी होण्याची शक्यताही वाढली होती. 

बनावट ग्राहकांची नोंदणी 

एकदा बनावट ग्राहकाची अॅपवर नोंदणी केल्यानंतर हे खाते पुन्हा काढून टाकण्यात येत होते. त्यानंतर पुन्हा दुसरे बनावट खाते सुरू करण्यासाठी तोच नंबर वापरण्यात येत होता. त्यामुळे एकाच नंबरवरून अनेक बनावट खाती सुरू केल्याचे प्रकार बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आले. या प्रकाराची माहिती मिळताच बँकेने चौकशी सुरू केली. तसेच दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. 

अ‍ॅपमधील त्रुटी सुधारण्यासाठी प्रयत्न 

सुरुवातीला असा काही प्रकार होतच नसल्याचे बँकेने म्हटले होते. मात्र, नंतर चूक मान्य केली. नवे ग्राहक अ‍ॅपवर नोंदणी करण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्पुरती बंदी घातली आहे. बाजार भांडवलानुसार बँक ऑफ बडोदा ही देशातील सातवी मोठी बँक आहे. बँकेने अ‍ॅप सुरू करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी सुधारण्याचे काम सुरू केले आहे. गैरप्रकार करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचेही समोर येत आहे.