पूर्वी छोट्यामोठ्या खरेदीसाठी किंवा घरातून बाहेर पडताना खिशात पैसे ठेवणे गरजेचे होते. आणि हे पैसे काढण्यासाठी बॅंकेत स्लिप भरून रांगेत उभे रहावे लागते होते. पण इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगचा शोध लागल्यापासून बॅंकिंग क्षेत्रात क्रांतीच घडून आली आहे. आता लोकांना बॅंकेत जाण्याची गरज नाही. हातात पैसे ठेवण्याची गरज नाही. उलट संपूर्ण बॅंकच लोकांच्या हातात आली असून सर्व व्यवहार एका क्लिकवर होत आहेत. मोबाइल बँकिंगने लोकांचे जगणे सुकर केले आहे. हे अधिकाधिक सोपे आणि फास्ट ठेवण्यासाठी बॅंका प्रयत्नशील आहेत. बॅंकिंग क्षेत्रातील अशाच काही नवीन गोष्टी आपण पाहणार आहोत.
बायोमेट्रिक सुरक्षा (Biometric Security)
कोरोना व्हायरसच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार घडले. त्या काळात क्रेडिट कार्ड फसवणुकीत 104 टक्क्यांनी वाढ झाली होती. यावर उपाय म्हणून बॅंकांनी बायोमेट्रिक सुरक्षा सुरू केली. यात संबंधित व्यक्तीचा चेहरा, आवाज, बोटांचे ठसे आणि इतर घटकांचा वापर करून बॅंकिंग सुविधा अधिक सुरक्षित केली. बायोमेट्रिक सुरक्षिततेमुळे स्किमिंग, फिशिंग यासारख्या फ्रॉड्सपासून खातेदारांचे आर्थिक संरक्षण होऊ लागले.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे चॅटबॉट्स (Artificial Intelligence)
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे एक सॉफ्टवेअर आहे. जे आपण सांगितलेल्या प्रोग्रॅमनुसार काम करते. यात व्हाईस तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक आणि बँकिंगमधील बरीच कामे सोपी आणि सुटसुटीत केली. यामुळे ग्राहकांना खूप वेळ वाट पाहावी लागत नाही. उदाहरणार्थ, एक कृत्रिम चॅटबॉट्समधून सतत विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे देता येतात. विचारलेल्या प्रश्नाची अधिक सखोल माहिती हवी असल्यास ती संबंधितांकडे पाठवता येते. तसेच आवश्यकता असेल तर संबंधितांशी बोलणे ही करून देता येते.
मोबाइल बँकिंग अॅप्स (Mobile Banking Apps)
मोबाइल बँकिंग अॅप्सची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या बॅंक ग्राहकांना मोबाइल बॅंकिंग अॅप्सचा चांगला फायदा झाला. मोबाइल बँकिंग अॅप्सचा वापर करून ग्राहक कर्जाची परतफेड करू शकतात, ईएमआय भरू शकतात. बॅंकेत न जाता पैसे काढू शकतात, भरू शकतात. पण त्याचवेळी तुमच्या बॅंकिंग अॅपची सुरक्षितता म्हणून बायोमेट्रिक प्रणाली सुरू करणे आवश्यक आहे.
मशीन लर्निंग (Machine Learning)
मशिन लर्निंग हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचाच एक भाग आहे. 2021 नंतरच्या अद्ययावत डिजिटल बँकिंगच्या ट्रेंडपैकी एक आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माहिती विश्लेषण करण्यासाठी केले जाते. याच्याआधारे बॅंका किंवा वित्तीय संस्था ग्राहकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे सेवा देत आहेत. मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करून प्रत्येक ग्राहकाचा स्वतंत्र प्रोफाईल तयार करते व त्याच्या प्रोफाईलनुसार त्यांना ती सेवा पुरवली जाते. मालवेअर, व्हायरस आणि हॅकरकडून होणाऱ्या सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी मशीन लर्निंगचा चांगला वापर होतो.
ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology)
ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सुद्धा डिजिटल मोबाइल बँकिंग ट्रेंडपैकी एक आहे. ब्लॉकचेनच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढत आहे. ब्लॉकचेनमुळे कुठल्याही मध्यस्थीशिवाय पैसे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया अधिक सक्षम व सुरक्षित होत आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे क्रिप्टोग्राफी अल्गोरिदमवर आधारित आहे. त्यामुळे बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांना डेटा सुरक्षित ठेवणे सोपे ठरत आहे.
व्हॉइस पेमेंट (Voice Payment)
व्हॉईस पेमेंट्स हा सुद्धा मोबाइल बँकिंग तंत्रज्ञानातील लेटेस्ट ट्रेंड मानला जातो. सिरी आणि अलेक्सा सारख्या डिजिटल उपकरणांचा वापर करून आवाजांद्वारे पर्सन टू पर्सन व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या टेक्नॉलॉजीमुळे ग्राहकांचा भाषेचा अडसर दूर झाला असून पैशांच्या व्यवहारांमध्ये खूपच सहजता आली आहे.
कार्डलेस एटीएम (Cardless ATM withdrawal)
निअर फिल्ड कम्युनिकेशन (NFC) आणि क्यूआर कोड स्कॅनिंग या तंत्रज्ञानामुळे ग्राहक बँकिंग एटीएमशी सहज संवाद साधू शकतात. त्यामुळे कार्डलेस एटीएममधून पैसे काढणे हा मोबाइल बॅंकिंगमधला लेटेस्ट ट्रेंड मानला जातो.
नवनवीन तंत्रज्ञानामुळे, वित्तीय संस्था आणि बँकिंग क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने बॅंका लोकांना सोयीसुविधांबरोबरच सुरक्षितता देण्यावर भर देत आहेत.