महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना महाराष्ट्रातील गोरगरीब, मागास, भटक्या आणि आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी राबविल्या जातात. महाराष्ट्राच्या शिष्यवृत्ती योजनाअंतर्गत काही योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी, काही योजना महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तर काही योजना विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जातात. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविली जाणारी एकलव्य शिष्यवृत्ती योजना त्यापैकीच एक आहे. ही योजना राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते.
Table of contents [Show]
मागासवर्गीय घटकांना मदत करणारी योजना
एकलव्य शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र शासनाने 1995-96 मध्ये सुरु केली होती. तेव्हा पासून आजपर्यंत ही योजना राबवली जात आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यातील आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते. या योजनेकरीता महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे अर्थसहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक साहाय्य केले जाते. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाने सुरु केलेली आहे.
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यास होते मदत
एकलव्य शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आदिवासी आणि मागास वर्गीय घटकातील विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. ही योजना मुख्यत: पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते. कला, विज्ञान, वाणिज्य क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ठराविक गुणांच्या आधारावर या योजनेचा लाभ दिला जातो.
राज्यातील विद्यार्थ्यांना लाभ
राज्यातील आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांना देखील संधी उपलब्ध व्हाव्यात, आर्थिक मदत मिळावी, याकरीता महाराष्ट्र शासनाने ही एकलव्य शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना वेळोवेळी या योजनेचा लाभ मिळाला आहे.
काय आहेत अटी?
प्रत्येक वर्षाला राज्य सरकारकडून एक तारीख निश्चित केली जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांना एकलव्य शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा लागतो. महाराष्ट्र एकलव्य शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी कला, वाणिज्य आणि लॉ च्या विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण, तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना 70 टक्के गुण आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या कुटुंबाच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 75 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. अर्जदार हा अर्धवेळ किंवा पूर्णवेळ कुठेही काम करीत नसावा. तसेच, महाराष्ट्राबाहेर शिकणारे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
आवश्यक कागदपत्रे
एकलव्य शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मूळ ओळखपत्र, मागील वर्षाच्या वर्गाची मार्कशीट, मागील वर्षाच्या उत्रन्नाचा दाखला, उपस्थिती प्रमाणपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची प्रत, ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट, अधिवास प्रमाणपत्र यासारखी महत्वाची कागदपत्रे जोडावी लागतात.