भारतात गुंतवणुकीचा पर्याय म्हणून जमीनीमधील गुंतवणूक ही नेहमीच लोकप्रिय राहिलेली आहे. म्युच्युअल फंड, इक्विटी शेअर्स यांसारख्या यासारखे वैविध्यपूर्ण वेगवेगळे पर्याय उपलब्ध असूनही जमिनीतील गुंतवणुकीची लोकप्रियता कमी झालेली नाही. जमिनीचे भाव हे सर्वत्रच वाढत आहेत. मोक्याच्या ठिकाणची जमीन विकत घेऊन त्यात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. काही वर्षांनी या जमिनीवर निवासी किवा व्यापारी संकुलाची निर्मिती करून भरपूर पैसा कमवण्याची संधी उपलब्ध होते.
जमिनीच्या गुंतवणुकीचे फायदे
जमिन मर्यादित संख्येने उपलब्ध असल्याने तिला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तिच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या किमतीत ही मोठ्या प्रमाणात वाढ होते.
इतर कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेपेक्षा जमीनीचे मूल्य सर्वाधिक आहे.
जमीन खरेदी केल्यावर तिचा लगेच ताबा मिळतो. घर किंवा फ्लॅटसारखे त्याचा ताबा मिळण्यास विलंब होत नाही.
जमिनीच्या देखभालीचा विशेष खर्च नसतो.
जमिनीच्या गुंतवणुकीचे तोटे
जमिनीच्या खरेदीमुळे मोठी रक्कम एकाच ठिकाणी वापरली जाते. तिच्या विक्रीतून लगेच रोख रक्कम उभी राहू शकत नाही.
जमीन विकत घेणे ही एक प्रकारची जोखीम सुद्धा ठरू शकते. कारण या जमिनीवर अतिक्रमण झाले किंवा सरकारने सक्तीने जमीन अधिग्रहित केली तर मोठे नुकसान होऊ शकते.
विकत घेतलेल्या जमिनीवर बांधकाम करायचे असेल तरच बँका कर्ज देतात.
जमीन खरेदीतून कोणत्याही प्रकारची कर सवलत मिळत नाही.
गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या
जमिनीत गुंतवणुकीसाठी भरपूर वित्तपुरवठा आवश्यक असल्याने या गुंतवणुकीचा उद्देश काय आहे, याची स्पष्टता असणे आवश्यक आहे. एखादी जमीन निवासी विकासासाठी खरेदी करत असाल तर जमिनीला सर्व आवश्यक परवानग्या आहेत याची खात्री करा. तसेच व्यावसायिक विकासासाठी जमीन विकत घेत असाल त्याचे हस्तांतरण नियम तपासून घ्या. पशुधन वाढवण्यासाठी किंवा शेतीसाठी किंवा मनोरंजनाच्या हेतूसाठी जमीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होते का ते पाहणे गरजेचे आहे. जमीन खरेदी करण्यापूर्वी वीज किंवा पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेचा विचार केला पाहिजे.