• 02 Oct, 2022 09:16

बॅंक खात्यांसाठी वारसदार किती महत्त्वाचा आहे?

Bank Nomination

बँकेमध्येही खाते उघडताना ‘नॉमिनेशन’ (Nomination) अर्थात वारसदाराविषयीची माहिती द्यावी लागते. मुख्य खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खात्यातील रक्कम कुणाला द्यावी हे निर्धारित करण्यासाठी वारसदार खूप महत्त्वाचा असतो.

आयुर्विमा (Insurance) उतरवताना, मुदतठेवी (Fixed Deposits) ठेवताना वा इतर अनेक ठिकाणी आपल्याला वारसदाराची (Nominee) नोंद करणे सक्तीचे असते. बँकेमध्येही खाते उघडताना ‘नॉमिनेशन’ अर्थात वारसदाराविषयीची माहिती द्यावी लागते. त्यावरून खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खात्यातील रक्कम कुणाला द्यावी हे निर्धारित केले जाते.  खातेदाराने ज्या व्यक्तीचे नाव वारसदार म्हणून दिले असेल त्याच व्यक्तीला खातेदाराच्या पश्चात बँक खात्यातील रक्कम, लॉकरमधील वस्तू व पैसे दिले जातात. यासाठी वारस प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा कोणताही आदेश मागितला जात नाही.


नॉमिनेशन देण्यासाठी फॉर्म डीए-1 

बँकेमध्ये जर खातेधारकाने नॉमिनेशन म्हणून नाव दिलेले नसेल किंवा सध्याचे नॉमिनेशन रद्द केले असेल तर खातेदार ‘डीए-1’ हा फॉर्म भरून नॉमिनेशन सादर करू शकतो. हा फॉर्म बँकेच्या वेबसाईटवरून डाऊनलोड केला जाऊ शकतो. यामध्ये खातेधारक आणि ठेवींचे विवरण आणि वारसदाराविषयीची सूचना दिलेली असते. संयुक्त खाते (Joint Account) असेल तर फॉर्मवर सर्व खातेधारकांची सही आवश्यक असते.

जुने नॉमिनेशन काढून टाकण्यासाठी फॉर्म डीए-2

डीए-2 या फॉर्मद्वारे सध्या असणार्‍या वारसदाराचे नाव काढून टाकता येते. या फॉर्मवर खातेधारकाची माहिती भरावी लागते. तसेच ज्या वारसदाराचे नाव काढून टाकायचे आहे; त्याचे नाव आणि पत्ता द्यावा लागतो. संयुक्त खाते (Joint Account) असेल तर, फॉर्मवर सर्व खातेधारकांची सही असणे आवश्यक असते.

वारसदार अल्पवयीन असल्यास...

अल्पवयीन व्यक्तीचे नाव वारसदार म्हणून दिल्यास नॉमिनेशन फॉर्ममध्ये त्याच्या पालकांची माहिती देणं गरजेचं असते. अल्वपयीन व्यक्ती सज्ञान होईपर्यंत खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यावरील रक्कम संबंधित पालकांना काढण्याचा अधिकार मिळतो. एका बँक खात्यासाठी एकच नॉमिनी असू शकतो; मात्र वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेगवेगळे नॉमिनी देता येतात. यासाठी वेगवेगळे नॉमिनेशन फॉर्म भरण्याची गरज असते.

‘अंगठा’ असल्यास साक्षीदारांची गरज

कायदेशीर वारसदाराच्या फायद्यासाठी मृत खातेधारकाचा नॉमिनी रक्कम आपल्याकडे ठेवू शकतो. खातेधारकाची सही साक्षीदारांकडून तपासण्याची गरज नसते; मात्र अंगठ्याची निशाणी असेल, तर दोन साक्षीदारांची गरज असते.