गिल्ट फंड (Gilt Fund) हे असे म्युच्युअल फंड असतात जे फक्त सरकारी रोखे आणि बाँडमध्ये गुंतवणूक करतात. राज्य आणि केंद्र सरकारने जाही केलेल्या रोखे आणि बाँडमध्येच फंड मॅनेजर गुंतवणूक करतो. यामध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेची जोखीम खूपच कमी असते. मात्र, व्याजदराच्या बाबतीच चढ उतार होऊ शकतात. व्याजदराची जोखीम गुंतवणूकदाराला घ्यावी लागते. सरकारला लागणाऱ्या पैशाची गरज भागवण्यासाठी हे रोखे बाजारात आणले जातात.
गिल्ट फंड कसे काम करतात?
जेव्हा सरकारला पैशांची गरज असेत तेव्हा सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जाते. मध्यवर्ती बँक केंद्र सरकारला पैस पुरवण्याचे देखील काम करते. विमा कंपन्या किंवा बँकांकडून कर्ज घेऊन आरबीआय केंद्र सरकारला पैसे पुरवते. या कर्जाच्या बदल्यात आरबीआय सरकारी रोखे जारी करते. या रोख्यांमध्ये फंड मॅनेजर गुंतवणूक करतो. मॅच्युरिटीनंतर गिल्ट फंड सिक्युरिटीज सरकारला माघारी करते आणि त्याच्या बदल्यात दिलेले पैसे घेते, यावर व्याजही मिळते. सरकार जेव्हा व्याजदर कमी करत असते तेव्हा गिल्ट फंडातील गुंतवणूक योग्य समजली जाते.
दीर्घकाळ गुंतवणूकीतून परतावा
गिल्ट फंड फक्त सराकरी रोख्यांमध्ये मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करतो. दीर्घ काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. गिल्ट फंड कमी जोखीम असलेल्या सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवते त्यामुळे पैसे सुरक्षित राहतात. मात्र, व्याजदर अस्थिर असतात. ज्यांना कमी जोखीम घ्यायची आहे आणि सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे. मात्र, या फंडातून व्याज कमी जास्त मिळू शकते. रिझर्व्ह बँक जेव्हा व्याजदर वाढवते तेव्हा या फंडाची नेट अॅसेट व्हॅल्यू कमी होते. या फंडातून 12 टक्क्यांपर्यंतही परतावा मिळू शकतो. मात्र, निश्चित परतावा मिळेलच याची शाश्वती नसते.
गिल्ट फंडमध्ये तुम्ही तीन ते पाच वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. गिल्ट फंडमधून मिळणाऱ्या लाभावर कर लागू होतो. तीन वर्षांपेक्षा कमी काळ गुंतवणूक शार्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये मोडते. तर तीन वर्षांपेक्षा जास्त गुंतवणूक लाँग टर्म कॅपिटल गेन मध्ये मोडते. तसेच बाजारात सरकारने जास्त व्याजदराने नवीन बाँड इश्यू केल्यानंतर आधीच्या कमी व्याजदराने विकत घेतलेल्या बाँडचा बाजारभाव कमी होतो. या बाँडला बाजारात मागणी राहणार नाही. कारण, जास्त व्याजदर देणारे फंडाकडे गुंतवणूकदार आकर्षित होतील.