डिजिटल फायनान्स (Digital Finance) सध्याच्या काळातला परवलीचा शब्द बनला आहे. या डिजिटल फायनान्सने आर्थिक व्यवहाराची परिभाषाच बदलून टाकली आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आर्थिक व्यवहाराला एक आयाम मिळाले आहे. त्याचेच एका शब्दात वर्णन म्हणजे डिजिटल फायनान्स. आर्थिक सेवा उद्योगात केल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराचे वर्णन करण्यासाठी ‘डिजिटल फायनान्स’ हा भारदस्त असा शब्द वापरला जात आहे.
डिजिटल फायनान्समध्ये अनेकप्रकारची उत्पादने, प्रक्रिया, व्यावसायिक मॉडेल आणि पद्धतींचा समावेश असून त्यांनी पारंपरिक पद्धतीने दिल्या जाणाऱ्या बॅंकिंग आणि आर्थिक सेवांची भाषाच बदलून टाकली आहे. फायनान्स फिल्डमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा काही नवीन नाही. पण गेल्या काही वर्षात नवीन टेक्नॉलॉजीमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच या टेक्नॉलॉजीमुळे अनेक गोष्टींनी वेग घेतला आहे. सध्या भारतीय मार्केटमध्ये स्मार्ट मोबाईलचा वापर करून ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहार केले जात आहेत; त्याला तोड नाही. मोबाईलवरून बिले भरली जात आहेत. लोकांना काही मिनिटांत पैसे ट्रान्सफर होत आहेत. त्याच पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून काही मिनिटांत गुंतवणूक केली जात आहे. काही वर्षांपूर्वी या गोष्टींसाठी खूप वेळ लागायचा. त्यावर विचार केला जायचा. पण आता सर्व एका क्लिकवर होत आहे.
आर्टीफिशिअल इंटेलिजन्स, सोशल नेटवर्क, मशीन लर्निंग, मोबाईल अॅप्स, डेटा अॅनालिटिक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहारांना डिजिटल टच मिळाला आणि या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात क्रांतीच घडून आली आहे. याचा ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यासह कंपन्यांनाही फायदा होत आहे. टेक्नॉलॉजीमुळे कार्यक्षमतेतही वाढ होत आहे. तसेच तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने यामुळे कोणतेही काम थांबत नाही.
पण हे सर्व तंत्रज्ञान ज्या इंटरनेट आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहे. त्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. टेक्नॉलॉजी आणि फायनान्समधील टेक्नॉलॉजीचा योग्य पद्धतीने वापर म्हणजेच डिजिटल साक्षरता हा सुद्धा डिजिटल फायनान्समधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
डिजिटल आर्थिक साक्षरता
डिजिटल साक्षरता ही आता काळाची गरज मानली जाते. इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित उपकरणांचा योग्य व खुबीने वापर करण्यासाठी जी कौशल्ये गरजेची आहेत. ती शिकून घेणे आणि त्यात होणाऱ्या बदलांचा वेळोवेळी आढावा घेणे, म्हणजे डिजिटल आर्थिक साक्षरता. ज्याप्रमाणे दररोज सकाळी घरात येणारे वर्तमानपत्र आता मोबाईलमध्ये दिसते. तसेच प्रत्यक्ष पैशांचे पाकीट घेऊन खरेदीला जाण्याचे दिवस सरले. कारण मोबाईलवर एका क्लिकवर करता येणाऱ्या खरेदीमुळे डिजिटल व्यवहारांची गती वाढली आहे. त्यामुळे तेवढ्याच गतीने डिजिटल आर्थिक साक्षर असणे महत्त्वाचे ठरत आहे.
डिजिटल फायनान्स सेवेचे फायदे
- कोठेही वापर करता येतो
- जलद आणि कार्यक्षम सेवा
- वेळेची बचत
- रिअल टाईम अपडेट
- लगेच निर्णय घेण्यासाठी सोयिस्कर
- इको-फ्रेंडली
- विश्वासार्ह व्यवहार
- तंत्रज्ञानामुळे ग्राहकांच्या संख्येत वाढ
डिजिटल आर्थिक सेवांच्या या फायद्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहक दोघांनाही फायदा होत आहे. त्यामुळे भविष्यात डिजिटल फायनान्सचे आणखी वेगळे रूप असू शकेल. कारण तंत्रज्ञानामध्ये ज्या पद्धतीने बदल होत आहेत. त्यावरून या क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत राहतील. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स यामुळे बॅंका, वित्तीय संस्थांमध्ये खूप मोठा बदल होत आहे.