Corporate Bonds: कॉर्पोरेट कंपन्या पैसे उभारण्यासाठी बाँड जारी करतात. हे एक प्रकारचे कर्ज रोखे असतात. जे गुंतवणुकदार बाँड खरेदी करतात त्यावर कंपनी व्याज देते. बाँडचा कालावधी पूर्ण झाल्यास परताव्यासह रक्कम गुंतवणूकदाराला माघारी द्यावी लागते. भारतात सरकारी आणि खासगी कंपन्या बाँड्स जारी करतात. या लेखामध्ये कॉर्पोरेट बाँड्सबद्दल माहिती घेऊया.
इक्विटी आणि बाँड्समध्ये फरक काय?
इक्विटी गुंतवणूक म्हणजेच गुंतवणुकादाराला कंपनीमध्ये हिस्सा मिळतो. तो एका अर्थाने कंपनीचा मालक असतो. मात्र, बाँडधारक कंपनीचा मालक नसतो. तो बाँडच्या बदल्यात कंपनीला कर्जाने पैसे देतो. त्यावर कंपनी व्याज देते. हे व्याज मासिक, सहामाई किंवा वार्षिकही असू शकते. बाँडचा कालावधी संपल्यास हा व्यवहार पूर्ण होतो. कंपनी परताव्यासह सर्व रक्कम गुंतवणुकदाराला माघारी करते.
कॉर्पोरेट कंपन्यांची व्यवसाय वाढ, खर्च भागवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी पैशांची गरज याद्वारे पूर्ण होते. (Corporate Bond Risk) कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणेच सरकारी कंपन्यांही बाँड जारी करतात. मात्र, सरकारी कंपन्यांपेक्षा खासगी कंपन्यांच्या बाँडचे व्याजदर सहसा जास्त असतात.
कॉर्पोरेट बाँडचे प्रकार किती (Type of Corporate Bonds)
फिक्स्ड रेट बाँड
फिक्स्ड रेड बाँड म्हणजेच हे बाँड खरेदी करण्यापूर्वीच व्याजाचा दर निश्चित केला जातो. त्यास कूपन रेट असेही म्हणतात. उदाहरणार्थ, पाच वर्षांच्या टाटा मोटर्स कंपनीच्या कॉर्पोरेट बाँडवर 9% वार्षिक व्याजदर असेल तर या दराने गुंतवणुकीवर कंपनीला ठराविक कालावधीने परतावा द्यावा लागले.
झिरो कूपन बाँड्स
झिरो कूपन बाँड्सवर कोणताही परतावा मिळत नाही. मात्र, असे बाँड डिस्काउंटमध्ये खरेदी करता येतात आणि मॅच्युरिटिनंतर त्यांच्या मूळ किंमतीनुसार कंपनी तुम्हाला पैसे देते. उदा. टाटा कंपनीच्या 5 वर्षांच्या झिरो कूपन बाँडचे मूल्य 50 हजार रुपये आहे. मात्र, डिस्काउंटमध्ये हा बाँड तुम्हाला फक्त 10 हजार रुपयांना मिळतो. मात्र, जेव्हा मॅच्युरिटी पूर्ण होते तेव्हा तुम्हाला 50 हजार रुपये मिळतील.
टॅक्स फ्री बाँड्स
टॅक्स फ्री बाँड्स नावाप्रमाणेच करमुक्त असतात. हे बाँड सहसा सरकारी कंपन्यांद्वारे जारी केले जातात. या बाँडवरील परतावा करमुक्त असतो.
कनव्हर्टिबल बाँड
कनव्हर्टिबल बाँड्सचे रुपांतर इक्विटी स्टॉक्स मध्ये होऊ शकते. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या कंपनीचे 1 लाख रुपयांचे बाँड्स खरेदी केले असतील तर ते तुम्हाला इक्विटी शेअर्समध्ये रुपांतरित करून घेता येतील.
कॉर्पोरेट बाँड्समध्ये कोणी गुंतवणूक करावी?
ज्या गुंतवणुकदारांना आपल्या गुंतवणुकीत विविधा आणायची आहे त्यांच्यासाठी कॉर्पोरेट बाँड हा एक पर्याय आहे. जर तुम्ही आधीच शेअर्स, एफडी, पोस्ट, सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर कॉर्पोरेट बाँड हा एक आणखी पर्याय आहे.
कॉर्पोरेट बाँडमधून निश्चित परतावा मिळेल. तसेच गुंतवणुकीला स्थिरताही मिळेल. जी इक्विटीमध्ये मिळत नाही. बाजार वरखाली गेल्यास गुंतवणुकीचे मुल्य कमी जास्त होते.
पारंपरिक निश्चित परतावा देणाऱ्या मुदत ठेवींना कॉर्पोरेट बाँड चांगला पर्याय आहे. सरकारी बाँडपेक्षा कॉर्पोरेट बाँडमध्ये जास्त परतावाही मिळेल. तसेच इक्विटी गुंतवणुकीपेक्षा यात जोखीम कमी आहे.
ज्यांना इक्विटी मार्केटमधील जोखीम नको आहे, त्यांच्यासाठी फिक्स्ड इनकम कमावण्यासाठी बाँड एक पर्याय आहे.
कॉर्पोरेट बाँडमधील गुंतवणुकीचे फायदे काय?
बँक FD किंवा सरकारी बाँडपेक्षा कॉर्पोरेट बाँडचा व्याजदर जास्त असतो.
हाय क्रेडिट असलेल्या AAA किंवा AAA+ रेटिंग असलेल्या कंपन्यांच्या बाँड्समध्ये जोखीम कमी असते. (Benefit of Corporate Bond Investment) कमी जोखीम असताही चांगला परतावा मिळेल.
कॉर्पोरेट बाँड खरेदी केल्यावर सेकंडरी मार्केटमध्ये सहज खरेदी विक्री करता येतात. किंमतीतील चढउतारानुसार तुम्ही खरेदी-विक्री करू शकता.
सरकारी बाँड्च्या तुलनेत कॉर्पोरेट बाँडचा कालवधी कमी असतो. 5 ते 10 वर्षांचा कालावधी असतो. सरकारी बाँड 20 वर्षांचे देखील असतात.
सरकारी बाँडवर सुमारे 6% च्या आसपास व्याजदर मिळतो. मात्र, कॉर्पोरेट बाँड्सवर 7-12% पर्यंत व्याजदर मिळू शकतो.
कोणतेही बाँड खरेदी करण्यापूर्वी कंपनीचे रेटिंग, व्याजदर, कालावधी, नियम अटी नीट पाहून घ्या. कमी रेटिंग असलेल्या बाँड्समध्ये जोखीम जास्त असते. तुमचे व्याज आणि मुद्दल बुडण्याची शक्यताही असते.