Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Capital Gains Account Scheme नक्की काय आहे? संपत्ती विकून मिळालेल्या पैशांवर भरावा लागणार नाही कर, वाचा

Capital Gains Account Scheme नक्की काय आहे? संपत्ती विकून मिळालेल्या पैशांवर भरावा लागणार नाही कर, वाचा

Image Source : https://www.freepik.com/

मालमत्ता विकून मिळालेल्या पैशांवरील कर वाचवण्यासाठी तुम्ही Capital Gains Account Scheme चा फायदा घेऊ शकता. कोणत्याही प्रमुख बँकांमध्ये हे खाते उघडता येईल.

कोणत्याही मालमत्तेची विक्री केल्यानंतर मिळालेल्या रक्कमेवर कर भरावा लागतो. तसेच, बऱ्याचवेळा या रक्कमेचा वापर अनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी देखील होतो. मात्र, तुम्ही एका योजनेद्वारे मालमत्ता विकून मिळालेल्या भांडवलावर भरावा लागणारा कर वाचवू शकता. यासाठी तुम्हाला Capital Gains Account Scheme चा फायदा घ्यावा लागेल. कॅपिटेल गेन्स अकाउंट स्कीम अर्थात भांडवली नफा खाते योजना नक्की काय आहे? या अंतर्गत खाते कसे उघडू शकता? या सर्व गोष्टींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सरकारने वर्ष 1988 मध्ये कॅपिटल गेन्स अकाउंट स्कीम सुरू केली होती. या योजनेचा मूळ उद्देश मालमत्ता विक्री करून मिळालेल्या भांडवलाचा वापर पुन्हा मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्हावा हा आहे. पुनर्गंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारने करात सवलत देखील दिले आहे. 

घर, सोने, शेअर्स, बाँड, म्युच्युअल फंड सारखी मालमत्ता विकून भांडवल उभे करण्याचा विक्रेत्याचा विचार असतो. ठराविक  कालावधीतच या भांडवलाचा उपयोग पुन्हा मालमत्ता खरेदी करण्यासाठी करावा लागतो. मात्र, त्या कालावधीत गुंतवणूक करणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये तुम्ही Capital Gains Account मध्ये भांडवल जमा करून कर वाचवू शकता. जमा केलेल्या भांडवलावर व्याज देखील मिळते. 

समजा, तुम्हाला घराची विक्री केल्यावर 25 लाख रुपये मिळाले आहेत. तुम्ही जर विशिष्ट कालावधीत या रक्कमेचा वापर इतर मालमत्ता खरेदी करण्यासाठी न केल्यास यावर कर द्यावा लागेल. मात्र, तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याआधी या रक्कमेला Capital Gains Account मध्ये जमा करू शकता. यामुळे तुम्हाला कर भरावा लागणार नाही व नंतर या रक्कमेचा वापर मालमत्ता खरेदीसाठी करू शकता.

या योजनेंतर्गत खाते कसे उघडाल?

तुम्ही कोणत्याही प्रमुख बँकेच्या शाखेमध्ये जाऊन हे खाते उघडू शकता. मात्र, ग्रामीण भागातील बँकेमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.  आयकर कायदा, 1961 अधिनियमच्या कलम 54 ते 54F अंतर्गत तुम्ही या खात्यात रक्कम जमा करू शकता.

या अंतर्गत तुम्ही टाइप-ए आणि टाइप-बी खाते उघडू शकता. यातील टाइप-ए हे एकप्रकारे बचत खातेच असते. या अंतर्गत तुम्हाला पासबुक मिळते. तसेच, तुम्ही बचत खात्याप्रमाणेच यातून पैसे काढू शकता. यावर मिळणारे व्याज देखील बचत खात्याप्रमाणेच असते. तर टाइप-बी हे एकप्रकारे फिक्स्ड डिपॉजिट खात्यासारखे असते. तुम्ही 3 वर्षांच्या मुदतीपर्यंत यात रक्कम जमा करू शकता. मात्र, लक्षात घ्या की या ठेवींवर मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागतो.

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – 

  • फॉर्म – ए (डुप्लिकेट)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • पॅन कार्ड

कॅपिटल गेन्स खात्यात पैसे कसे जमा कराल?

तुम्ही कॅपिटल गेन्स खात्यात चेक, रोख रक्कम, डिमांड ड्राफ्टच्या मदतीने पैसे जमा करू शकता. तसेच, एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने रक्कम देखील जमा करता येईल. 

कॅपिटल गेन्स खात्यातून पैसे कसे काढाल?

टाइप-ए खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतीही अट नाही. परंतु, टाइप-बी खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला आधी रक्कम टाइप-ए खात्यात ट्रान्सफर करावा लागेल. तसेच, पहिल्यांदा रक्कम काढण्यासाठी फॉर्म-सी आणि पुन्हा रक्कम काढण्यासाठी फॉर्म-डी भरावा लागेल. लक्षात ठेवा की, काढलेली रक्कम 60 दिवसांच्या आत विशिष्ट मालमत्तेत गुंतवावी लागेल. खातेदारला कोणतेही चेकबुक अथवा डेबिट कार्ड दिले जात नाही. 

  • कॅपिटल गेन्स अकाउंटवर कोणत्याही प्रकारची कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध नाही.
  • तुम्ही टाइप-ए मधून टाइप-बी मध्ये किंवा टाइप-बी मधून टाइप-ए मध्ये खाते ट्रान्सफर करू शकता.
  • खाते बंद करण्याची प्रक्रिया किचकट आहे. यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीसह फॉर्म-जी जमा करावा लागेल. 
  • या खात्याचा वापर करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे भांडवल कोणत्याही स्थितीत सुरक्षित राहते. करात देखील सूट मिळते. तसेच, तुम्हाला हवे तेव्हा खात्यातून पैसे काढून मालमत्ता खरेदी करू शकता.