Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BNPL : ‘बाय नाऊ पे लेटर’ सुविधा काय आहे?

online shopping

कोरोना काळानंतर बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later - BNPL) या पर्यायाला ग्राहक अधिकाधिक पसंती देऊ लागले आहेत.

पूर्वी बऱ्याच दुकानांवर ‘आज रोख उद्या उधार’, अशी पाटी लागलेली असायची. पण आता ऑनलाईनच्या जमान्यात काही वित्तीय संस्थांनी ‘आज वस्तू घ्या आणि उद्या पैसे द्या’, अशी ग्राहकांच्या हिताची सोय केली आहे. याला आजच्या ट्रेंडिंगच्या भाषेत ‘बाय नाऊ पे लेटर’ (Buy now pay Later - BNPL ) असे नाव देण्यात आलं आहे. मध्यंतरी लोन किंवा कर्ज घेऊन म्हणजे काही अंशी डाऊन पेमेंट करून ईएमआयवर (EMI) वस्तू घेण्याचे प्रमाण वाढलं होतं. यावरही ग्राहकाला पर्याय म्हणून एकही रुपया लगेच न भरता वस्तू घरी आणल्यावर काही दिवसांनी त्या वस्तूचा मोबदला देण्याची सोय वित्तीय संस्थांनी दिली आहे.

‘बाय नाऊ पे लेटर’ (BNPL) म्हणजे काय?

कोणत्याही खरेदी व्यवहारात  आपण पैसे देतो आणि वस्तू खरेदी करतो. ती वस्तू आपल्या मालकीची होते व आपण ती आपल्या घरी नेतो. मात्र, ‘बाय नाऊ पे लेटर’  (Buy Now Pay Later) मध्ये ‘खरेदी आता आणि पैसे काही नंतर’ दिले जातात. यात ठराविक विक्रेत्याकडून ग्राहक तात्काळ वस्तू खरेदी करू शकतो; त्याला पैसे मात्र नंतर देता येतात. ठराविक मुदतीत हप्त्याने पैसे भरून ‘बाय नाऊ पे लेटर’ने व्याजमुक्त खरेदी करू शकतो.

दुकानदार आणि ग्राहक दोघांनाही फायदा!

लहानसहान दुकानदार किंवा ऑनलाइन विक्रेते यांना बीएनपीएल सुविधेमुळे ग्राहक मिळतात. पूर्वी छोट्या दुकानदारांना उधारीवर वस्तू देणे परवडायचे नाही. अशा विक्रेत्यांना व दुकानदारांना या सुविधेचा फायदा होत आहे. यामुळे विक्रेत्यांच्या विक्रीत वाढ झाली असून ग्राहकांची संख्या ही वाढली आहे. काही ग्राहकांकडे क्रेडिट कार्ड नसल्यामुळे किंवा ते एकरकमी पैसे देऊ शकत नसल्यामुळे ते खरेदी करू शकत नव्हते. त्यांच्यासाठी ही सुविधा फायद्याची ठरत आहे. एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी ही अनेकांच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम करायची. त्यांच्यासाठी सुद्धा या उपाय समाधानकारक ठरत आहे.

‘बाय नाऊ पे लेटर’ (BNPL)चे फायदे

  • वस्तू खरेदीवर लगेच क्रेडिट लिमिट मिळते
  • पैसे लगेच द्यावे लागत नसल्यामुळे सुरक्षित व्यवहार
  • व्याजमुक्त ईएमआयने खरेदी करता येते
  • मूळ रक्कम परतफेड करण्याचा कालावधी निवडू शकतो

‘बाय नाऊ पे लेटर’(BNPL)ची वैशिष्ट्ये

  • खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे नंतर देण्याचे स्वातंत्र्य
  • अर्ज करण्याची पद्धत सोपी, लगेच मंजुरी
  • संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असावा आणि 18 वर्षे पूर्ण असावी.
  • अर्जदार व्यक्ती पगारदार किंवा इतर नियमित इन्कम मिळवणारी असावी.
  • अर्जदाराचे बॅंक खाते आणि केवायसीशी संबंधित सर्व दस्तऐवज असणे आवश्यक.

‘बाय नाऊ पे लेटर’(BNPL) ऑफर देणाऱ्या काही कंपन्या

अ‍ॅमेझॉन पे लेटर (Amazon pay later)

एकदा ‘अ‍ॅमेझॉन पे लेटर’चं ऑनलाईन खातं उघडले की, त्यांनी दिलेल्या ईएमआय (EMI) पर्यायांचा वापर करून खरेदी करू शकता. यात क्रेडिट कार्ड (Credit Card)ची गरज लागत नाही. यात सध्या हे ऑप्शन फक्त मोबाईल अ‍ॅप्समध्ये उपलब्ध असून, खरेदी मात्र कॉम्प्युटर व अ‍ॅप्सद्वारे करू शकतो. ही सुविधा खूप फायदेशीर आहे; यातून घरगुती वीज बिल सुद्धा भरता येते. पण दिलेल्या मर्यादेत रिपेमेंट नाही केलं तर मात्र आर्थिक दंड भरावा लागतो.

एचडीएफसी  फ्लेक्सी पे (HDFC Flexi Pay)

एचडीएफसी  फ्लेक्सी पे (HDFC Flexi Pay) या प्लॅटफॉर्मद्वारे बीएनपीएल (BNPL) अंतर्गत खरेदी करता येते. पण यासाठी डेबिट कार्ड (Debit Card) असणे आवश्यक आहे. डेबिट कार्डमधून खरेदी रक्कम वजा होते. इथे  रिपेमेंट करता 15 ते 90 दिवसांचा वेळ मिळतो. 15 दिवसांकरीता कोणतेही व्याज लागत नाही. पण त्यानंतर ही पैसे भरले नाही तर दंड भरावा लागतो.

आयसीआयसीआय बँक पे लेटर (ICICI Bank Pay Later)

आयसीआयसीआय (ICICI) बँक सुद्धा ही सुविधा देते. यामार्फत कोणत्याही वस्तूची खरेदी केल्यास 45 दिवसांचा कालावधी मिळतो. त्यानंतर आयसीआयसीआय बँक खात्यातून रक्कम परस्पर वजा होते. वेळेवर पैसे न भरल्यास दंड भरावा लागतो.

सिंपल पे लेटर (Simpl Pay Later)

2015 मध्ये स्थापन झालेल्या सिंपल (Simpl) ने आज रिटेल क्षेत्रात एक विश्वसानीय प्लॅटफॉर्म म्हणून नाव कमावले आहे. या प्लॅटफॉर्मवर अगदी काही क्षणात ऑनलाईन खाते मंजूर होते आणि लगेच खरेदी ही करता येते. याच्या सिस्टिमवर खरेदी केलेल्या सर्व व्यवहारांची माहिती पाहू शकतो. सिंपल पे लेटर द्वार खरेदी केलेल्या वस्तुंचं बिल 15 दिवसांत भरावे लागते.

झेस्ट मनी (Zest Money)

झेस्ट मनी (Zest Money) हे आणखी एक जोमाने वाढणारे प्लॅटफॉर्म आहे; 2016 मध्ये याची स्थापना झाली. यात ऑनलाईन खरेदी करून नंतर परवडतील अशा ईएमआय (EMI) पद्धतीने पैसे परतफेड करता येतात. काही ठराविक योजनेत 6 महिन्यापर्यंत परतफेडीची मुदत दिली जाते. टाटा कॅपिटल (Tata Capital), पिरामल फायन्सन (Piramal Finance), आदित्य बिर्ला कॅपिटल (Aaditya Birla Capital), एचएसबीसी (HSBC), मुथुट फायनान्स (Muthoot Finance) या मोठमोठ्या कंपन्या झेस्ट मनीच्या पार्टनर आहेत. झेस्ट मनीचं वैशिष्ट्यं म्हणजे, याची नावजलेल्या कंपन्यांसोबत पार्टनरशिप असल्याने यातून विमानाचं तिकीट सुद्धा खरेदी करता येते.

तुमच्याकडे पैसे नसतील किंवा कोणत्याही वस्तूची लगेच आवश्यकता असेल अशावेळी ‘बाय नाऊ पे लेटर’ (Buy Now Pay Later) हा पर्याय फायद्याचा ठरू शकतो.