क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इथून पुढे क्रेडिट कार्डवरील व्याज किंवा इतर छुप्या शुल्कामुळे (Hidden Charges) त्रास सहन करावा लागणार नाही. यासंदर्भात भारताच्या बँकिंग नियामक मंडळाने म्हणजेच आरबीआयने नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. आरबीआयच्या या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळू शकणार आहेत. क्रेडिट कार्डशी संबंधित आरबीआयचे नवे नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) देखील क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड जारी करू शकणार आहेत.
क्रेडिट कार्डच्या या नवीन नियमांमुळे ग्राहकांचा होणार फायदा
- क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ग्राहकांना विकण्यापूर्वी त्याच्या सर्व शुल्कांसह कार्डवरील व्याजाची माहिती देणं अनिवार्य असणार आहे.
- क्रेडिट कार्डची थकित रक्कम भरणाबाबत बॅंक ग्राहकांना ईमेल किंवा एसएमएस पाठवणार.
- थकित पेमेंट भरण्यासाठी ग्राहकांना 15 दिवसांचा अवधी मिळणार.
- नको असलेले क्रेडिट कार्ड 7 दिवसांत बंद होणार. अन्यथा बॅंक ग्राहकाला प्रतिदिन 500 रूपये दंड देणार.
- क्रेडिट कार्डशी संबंधित फोन फक्त सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 या वेळेतच करता येणार.
बॅंका ग्राहकांना क्रेडिट कार्ड विकताना त्याच्या आकर्षक गोष्टींवर ग्राहकाचे लक्ष केंद्रीत करतात. पण त्या क्रेडिट कार्डच्या पेमेंटवरील व्याज आणि इतर शुल्क ग्राहकांना सांगत नाहीत. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन क्रेडिट कार्ड नियमांनुसार, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ग्राहकांना विकण्यापूर्वी त्याच्या सर्व प्रकारच्या शुल्कांसह कार्डवरील व्याजाची माहिती देणं अनिवार्य असणार आहे. तसेच क्रेडिट कार्डची थकित रक्कम भरणाबाबत ग्राहकांना ईमेल किंवा एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. तसेच पेमेंटसाठी किमान 15 दिवसांचा अवधी दिला जाईल, त्यानंतरच ग्राहकाकडून दंड आकारला जाऊ शकतो.
जर एखाद्या ग्राहकाने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केला आणि ग्राहकाची कोणतीही थकबाकी नसेल, तर बँकेला 7 दिवसांत ते कार्ड बंद करावे लागेल. बॅंकेकडून ही जर यात दिरंगाई झाली तर बँकेला संबंधित ग्राहकाला प्रतिदिन 500 रूपयांचा दंड द्यावा लागेल. ग्राहकाला न विचारता बॅंकेने क्रेडिट कार्ड अपग्रेड केल्यास किंवा त्याची खरेदी मर्यादा वाढवल्यास बँकेला दंड होऊ शकतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमांनुसार, क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका टेलिकॉलर ठेवताना दूरसंचार नियमांचे पूर्णपणे पालन करतील. क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका ग्राहकांना फक्त सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 या वेळेतच फोन करू शकतात. कार्ड जारी करताना ग्राहकांची कोणतीही माहिती इतर कोणाशीही शेअर करण्यास आरबीआयने सक्त मनाई केली आहे.