बाजार घसरला, की सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आणखी घसरण होणार नाही. तर दुसरीकडे बाजार जेव्हा उंचीवर असतो, तेव्हा विक्रीची भीती गुंतवणूकदारांना सतावत असते. अशाच परिस्थितीत बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड (BAF) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरतो.
Table of contents [Show]
काय आहे बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड?
बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड हा म्युच्युअल फंडाचं एक प्रॉडक्ट आहे. इक्विटी आणि डेब्ट या दोन्हींचं ते मिश्रण आहे. बाजारातली परिस्थिती, व्याजदर आणि स्थूल आर्थिक परिस्थिती यानुसार इक्विटी आणि डेब्ट यांच्यात बदल होत राहतात. गुंतवणूकदारांना हे बाजारातल्या परिस्थितीपासून संरक्षित करतात. बाजार खाली असो किंवा नव्या उच्चांकावर, हे फंड नवीन समतोल साधून गुंतवणूकदारांसाठी जोखीम कमी करतात.
आजच्या वातावरणात उपयुक्त
जेव्हा बाजारावर परिणाम करणारे घटक झपाट्यानं बदलत असतात, तेव्हा सामान्य गुंतवणूकदाराला त्याचा पोर्टफोलिओ त्यानुसार अॅडजस्ट करणं कठीण होतं. जर सध्याची परिस्थिती पाहिली, तर जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट आहे. महागाईचा दबाव आहे आणि त्यामुळे व्याजदरही वाढत आहेत. अशा वातावरणात आयसीआयसीआय प्रुडेंशियल बॅलन्स्ड अॅडव्हांटेज सारख्या फंडांनी गेल्या दशकात इक्विटी किंवा डेब्टमध्ये एंट्री-एक्झिटला चांगलंच मॅनेज केलं आहे.
इन हाऊस मूल्यांकन मॉडेलचं पालन
हा फंड इक्विटीसाठी कडक अशा इन हाऊस मूल्यांकन मॉडेलचं पालन करतो. स्टॉक महाग आहेत की स्वस्त हे ठरवता येतं. मार्च 2020मध्ये जेव्हा महामारीनंतर लगेचच सेन्सेक्स झपाट्यानं घसरला आणि 29000च्या खाली आला तेव्हा फंडानं इक्विटींवरील निव्वळ गुंतवणूक 73.7 टक्क्यांपर्यंत वाढवली. नोव्हेंबर 2021पर्यंत जेव्हा बाजारानं 60,000 पेक्षा जास्त पॉइंट्सची पातळी गाठली, तेव्हा बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडानं त्याची निव्वळ इक्विटी 30 टक्क्यांपेक्षा कमी केली.
धोरण काय?
बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडाची रणनीती म्हणजे बाजार खाली असताना शेअर्स स्वस्तात विकत घेणे आणि जेव्हा बाजार चढतो तेव्हा त्यातून बाहेर पडणे. यामुळे बाजार उच्च पातळीवर असताना गुंतवणूकदारांना नफा मिळविण्यास मदत करतं. या फंडांचं निव्वळ इक्विटी एक्सपोजर 30 टक्क्यांपर्यंत कमी असू शकतं. मात्र साधारणपणे इक्विटीचं एक्सपोजर 65 टक्के आणि त्याहून अधिक राखलं जातं.
मागच्या 10 वर्षांतला परतावा
आकडेवारीनुसार, आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडानं गेल्या 10 वर्षांत 13.5 टक्के परतावा दिला आहे. बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडात गुंतवणूक करताना, लोकांची अपेक्षा असते, की त्याचा परतावा महागाईला पुरून उरेल आणि डेब्ट परताव्याच्या तुलनेत चांगलं असेल. त्या अपेक्षा पूर्ण करण्यात हा फंड यशस्वी होतो, असं दिसून आलं आहे.