अमेरिका (United States) हा एक विकसित देश आहे. तर चीनसारखा (China) देशदेखील विकासाच्या बाबतीत वेगानं पुढे जाणारा देश आहे. या देशांच्या अर्थव्यवस्था (Economy) भारताच्या कितीतरी पट अधिक आहेत. मात्र अशातही भारतीय शेअर बाजारानं (Indian Stock Market) सकारात्मक कामगिरी केली आहे. मागच्या अनेक वर्षांचा आढावा घेतल्यास गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला आहे. भारताच्या शेअर बाजारानं एकूण 6.6 टक्के परतावा दिला आहे. अमेरिका आणि चीनच्या बाजारातल्या परताव्यापेक्षा (Return) ही टक्केवारी जास्त आहे. जगातल्या अनेक देशांच्या शेअर बाजारापेक्षादेखील ही टक्केवारी अधिकच आहे. एबीपी लाइव्हनं हे वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
डीएसपी अॅसेट मॅनेजमेंटचा रिपोर्ट
डीएसपी अॅसेट मॅनेजमेंटनं यासंदर्भातला अहवाल दिला आहे. जून 2023च्या अहवालात, अर्ली सिग्नल्स थ्रू चार्ट्स (Early Signals Through Charts) असं नमूद करण्यात आलं आहे. या अहवालात भारतातल्या गुंतवणूकदारांची चक्रवाढ संपत्ती 6.6 टक्के सीएजीआर (Compound Annual Growth Rate) दरानं वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. त्या तुलनेत यूएस गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये मात्र 6.4 टक्के सीएजीआर दिसून आला आहे.
चीनचा गुंतवणूकदारांना परतावा किती?
चीनचा विचार केल्यास इथल्या गुंतवणूकदारांना 3.3 टक्के सीएजीआर दरानं परतावा मिळाला आहे. हा आकडा 1900 सालापासून आत्तापर्यंतचा आहे. म्हणजेच मागच्या 123 वर्षात भारतातल्या ज्या गुंतवणूकदारांनी इथल्या शेअर बाजारात पैसे गुंतवले आहेत, त्यांना अत्यंत चांगला परतावा मिळाला आहे, हेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
सीएजीआरचा संकेत
डीएसपी अॅसेट मॅनेजर्सच्या अहवालानुसार, चलनवाढ आणि रुपयाच्या घसरणीशी जुळवून घेतल्यानंतरदेखील देशातले गुंतवणूकदार चांगले पैसे कमवू शकले आहेत, हाच सीएजीआरचा संकेत आहे. अहवालात सविस्तर डेटा देण्यात आला आहे. जगभरातल्या बाजारपेठांनी दिलेला प्री-कॉस्ट आणि प्री-टॅक्स रिअल रिटर्न सीएजीआर आधारावर 5 टक्के आहे. निश्चितच भारतीय बाजारातला परतावा यापेक्षा खूप अधिक आणि पुढे आहे, असं हा डेटा सूचित करतो.
शतकातला सर्वोत्तम परतावा
भारतीय बाजारानं दिलेला परतावा शतकातला सर्वोत्तम परतावा आहे आणि चक्रवाढ प्रक्रियेत कोणीही अडथळा आणू नये, असं म्हणता येईल. डीएसपीच्या या अहवालात असंही नमूद करण्यात आलंय, की उदयोन्मुख बाजारपेठांनी 1900 सालापासून एकूण 3.8 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास
विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारपेठेवरचा विश्वास सातत्यानं वाढताना दिसत आहे. एफआयआय (FII) आणि एफपीआयच्या (FPI) गुंतवणुकीचे आकडे याचा पुरावा आहेत. जूनमध्ये आतापर्यंत 9800 कोटी रुपये एफपीआय भारतीय शेअर बाजारात टाकण्यात आले आहेत. 1 जून ते 9 जूनपर्यंतची ही आकडेवारी आहे.