केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 7 सप्टेंबर 2019 रोजी, भारतातील पहिले औद्योगिक ग्रीनफील्ड स्मार्ट शहर म्हणून औरंगाबाद औद्योगिक शहराचे उद्घाटन करण्यात आले होते. हा प्रकल्प दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉरचा (DMIC) एक भाग आहे, जो राजधानी दिल्ली आणि मुंबई दरम्यान सहा राज्यांमध्ये पसरलेले औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.
काय आहे AURIC City?
"AURIC" अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी असा होतो. हे भारतातील पहिले ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट शहरांपैकी एक होणार आहे, जे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहराच्या बाहेरील 10,000 एकर क्षेत्रामध्ये तयार होणार आहे. या प्रोजेक्टच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने 7947 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे.
या नवीन औद्योगिक शहरामध्ये टाऊनशिप कार्यालयासाठी जागा, निवासस्थान, हॉटेल्स, लहान-मोठ्या स्वरूपातील रुग्णालये, शाळा, उद्याने, मनोरंजन केंद्रे आणि बरेच काही असेल. या प्रकल्पाची 60% एकूण जमीन उद्योगांसाठी वापरली जाणार आहे. तर उर्वरित 40% निवासी, व्यावसायिक, संस्था, मोकळ्या जागा आणि सामाजिक-सांस्कृतिक सुविधांसाठी वापरली जाईल. यामुळे महाराष्ट्राला प्रचंड आर्थिक चालना मिळेल.
ऑरिक सिटीला रेल्वे आणि महामार्गांच्या जाळ्यांद्वारे भारतातील प्रमुख शहरांशी जोडले जाईल, ऑरिक सिटी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरापासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे व ऑरिक सिटी पासून संभाजीनगर विमानतळ ही जवळ आहे.
जालनामध्ये तयार होत असलेले जवाहरलाल नेहरू बंदर ट्रस्टचे (जेएनपीटी) "ड्राय पोर्ट" आणि कंटेनर टर्मिनल फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे ऑरिक सिटी मधील छोट्या उद्योगांना भारतातील सर्वात मोठ्या उद्योगांसोबत सहज कनेक्ट करता येईल. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) ऑरिक सिटी मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पायाभूत सुविधांची निर्मिती करणार आहे.
‘या’ प्रकल्पातून साडेपाच लाख रोजगार
या प्रोजेक्ट मध्ये एकूण 5.5 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. मात्र आजवरच्या 5,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून फक्त 5,909 रोजगार निर्माण होऊ शकले आहे. म्हणजेच सरासरी 93.07 लाखांच्या गुंतवणुकीमागे केवळ एकच रोजगार निर्माण होऊ शकला. राज्याचा 2021-2022 आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती दिली आहे.
प्रमुख कंपन्या ऑरिक सिटीमध्ये येणार
- Toshiba India
- ACG Group
- Hyosung India Pvt Ltd
- NLMK Group
- Endurance Technology Pvt Ltd
- Inox Air Products
- Fuji Silvertech From Japan
- Coatall Films India
- Caterpillar Group
- VARAD Alloy Casting