Arbitrage Fund: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्याचे अनेक प्रकारही आहेत. म्युच्युअल फंड्समध्ये हायब्रिड फंड नावाचा एक प्रकार आहे. त्याच्या अंतर्गत आर्बिट्राज फंडचा समावेश होतो. जेव्हा मार्केट स्थिर राहत नाही आणि तेथे मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू असते. तेव्हा या फंडद्वारे गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवता येतो. तसेच, या फंडमध्ये रिस्क बिलकूल कमी आहे. त्यामुळे मार्केटमधील बरेच गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करायला पुढेच राहतात.
या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे. कारण, याचा 65 टक्के हिस्सा शेअरमध्ये गुंतवल्या जातो. तर बाकीचा डेब्टमध्ये लावला जातो. या फंडची विशेषता ही आहे की कॅश मार्केट आणि फ्युचर मार्केटच्या शेअरच्या भावातील फरकाचा फायदा घेण्यासाठी या फंडचा वापर केला जातो. त्याचमुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली की या फंडद्वारे चांगला रिटर्न मिळवता येतो. हा फंड त्या गुंतवणुकदारांसाठी चांगला आहे, ज्यांना रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे 2 ते 3 वर्षासाठी या फंडमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो. तसेच, एकाचवेळी दोन्ही मार्केटमध्ये खरेदी व विक्री होत असल्याने रिस्क कमी असते.
Table of contents [Show]
फरकावर मिळतो रिटर्न
या फंडची पद्धत समजून घेणे अवघड नाही आहे. वर सांगितल्याप्रमाणे एका मार्केटमधून शेअर खरेदी करायचा आणि दुसऱ्या मार्केटमध्ये जादा किमतीवर विकायचा. म्हणजेच एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत कॅश मार्केटमध्ये 100 रुपये आहे आणि फ्युचर मार्केटमध्ये 150 रुपये आहे. समजा एखाद्या गुंतवणुकदाराने कॅश मार्केटमधून हा शेअर खरेदी केला आणि फ्युचर मार्केटमध्ये विकला. तर त्याला 50 रुपयांचा फायदा होणार आहे. याच फरकाचा फायदा गुंतवणुकदार घेतात आणि या फंडमध्ये गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवतात.
मॅनेजरची भूमिका महत्वाची
यासाठीच हा फंड गुंतवणुकीसाठी चांगला मानल्या जातो. फंड मॅनेजर इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर फ्युचर मार्केटमध्ये हा व्यवहार हेज करतो. त्यामुळे कॅश मार्केटमध्ये खरेदी केलेल्या शेअरवरिल रिस्क बऱ्यापैकी कमी होते. कारण, व्यवहार हेज केलेला असल्यामुळे शेअर मार्केट घसरला तरी पोर्टफोलीओवर त्याचा पाहिजे तसा परिणाम होत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये चढ-उतार असल्यावर हा फंड चांगला परफॉर्म करतो. त्यामुळे हा फंड हाताळायची महत्वाची जबाबदारी फंड मॅनेजरकडेच असते.
टॅक्सवरही होईल बचत
टॅक्सला धरून फंडचा विचार करायचा असल्यास हा फंड जबरदस्त आहे. हा फंड इक्विटी फंडच्या कॅटेगरीत येतो. 1 वर्षापेक्षा जास्त वेळपर्यंत पैसे ठेवल्यास, त्यावर मिळणाऱ्या रिटर्नला टॅक्स भरावा लागत नाही. एका वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी पैसे ठेवत असल्यास, तुम्हाला 15 टक्के शाॅर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये हा फंड जास्त लोकप्रिय आहे. कारण, रिस्कही नाहीच्या बरोबर आहे आणि टॅक्समध्येही फायदाच आहे. या गोष्टींसाठी या फंडमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.
फंडची मागील कामगिरी पाहा
शेअर मार्केटमध्ये अनेक आर्बिट्राज फंड आहेत. ते निवडायच्या आधी मॅनेजरच्या मागील वर्षाच्या परफाॅर्मन्सची तपासणी करणं गरजेचे आहे. कारण, फंडचा पैसा कधी आणि कुठे गुंतवायचा हा निर्णय त्यांचाच असतो. त्यामुळे परफाॅर्मन्स पाहणे आवश्यक आहे. तसेच, फंडमध्ये रिस्क कमी असल्याने, पैसे ही सरासरीच मिळतात. त्यामुळे जास्त रिटर्नची अपेक्षा करणं ही चुकीचे आहे. पण, मार्केटमध्ये इतर ठिकाणी पैसे गुंतवण्यापेक्षा या फंडमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचा फायदाच होणार आहे. हे काही आर्बिट्राज फंड आहे त्यामध्ये अॅक्सिस आर्बिट्राज फंड, कोटक इक्विटी आर्बिट्राज फंड, टाटा आर्बिट्राज फंड यांचा समावेश आहे. तसेच, अजूनही बरेच आर्बिट्राज फंड आहेत. त्यामुळे गुंतवणुकीआधी त्यांचा परफाॅर्मन्स अवश्य तपासा.