Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hybrid Mutual Funds : हायब्रिड म्युच्युअल फंड काय आहे? त्याचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या

Hybrid Mutual Funds : हायब्रिड म्युच्युअल फंड काय आहे? त्याचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून त्यातून चांगला पैसा मिळवता येतो. हे खरं असलं तरी, नेमकं कोणत्या फंडात गुंतवणूक करायची हे माहिती असणं ही गरजेच आहे. कारण, म्युच्युअल फंड्सचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण हायब्रिड फंड त्याचे प्रकार व फायदे जाणून घेणार आहोत.

हायब्रिड म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंडचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त असेट्समध्ये गुंतवणूक केल्या जाते. मुख्यता हायब्रिड फंडच्या गुंतवणुकीसाठी इक्विटी आणि डेब्ट हा पर्याय निवडला जातो. तर कधी गोल्ड आणि रिअल इस्टेटचाही यामध्ये समावेश असतो. यामुळे या फंडात गुंतवणूक केल्यास रिस्क कमी असते आणि रिटर्नही चांगला मिळू शकतो. म्हणूनच बऱ्यापैकी गुंतवणुकदार हायब्रिड फंड गुंतवणुकीसाठी निवडतात. त्यामुळे त्यांचे प्रकार किती आहेत? त्यात गुंतवणूक केल्यास कसा फायदा मिळू शकतो? हे जाणून घेवूया.

म्युच्युअल हायब्रिड फंडचे प्रकार व फायदे

  •  मल्टी असेट अलोकेशन फंड

या योजनेंतर्गत कमीतकमी तीन असेट्समध्ये किमान प्रत्येकी 10 टक्के गुंतवणूक करणं आवश्यक असतं. यामुळे गुंतवणुकदारांना अनेक असेट्समध्ये गुंतवणुकीची संधी मिळते. तसेच, फंड मॅनेजरच्या व्युव्हनुसार असेट्स वाटप करण्याचं ठरवलं जाते. त्यामुळे अशा फंडमध्ये रिस्क पूर्णपणे कमी होऊन जाते. याचबरोबर रिटर्न जास्त मिळण्याची शक्यता निर्माण होते.  

  • अ‍ॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड

या योजनेंतर्गत इक्विटी असेट्समध्ये कमीतकमी 65 टक्के आणि जास्तीतजास्त 80 टक्के गुंतवणूक करावी लागते. तसेच, डेब्ट असेट्समध्ये 20 ते 35 टक्के गुंतवणूक करावी लागते. विशेष म्हणजे, या दोन्ही ठिकाणी ठरवून दिलेली गुंतवणूक करणे या फंडला बंधनकारक आहे. दोन्ही ठिकाणी गुंतवणूक ठरवून दिलेली असल्यामुळे या फंडमध्ये गुंतवणूक केल्यास रिटर्न जास्त मिळू शकतो.

  • डायनॅमिक असेट अलोकेशन फंड

हा फंड त्याच्या नावासारखाच डायनॅमिक आहे . कारण, या फंडमध्ये 100 टक्के इक्विटी किंवा डेब्टमध्ये गुंतवणूक केली जाते. विशेष म्हणजे ती कधीही बदलवता येते. फंडद्वारे ठरवलेल्या फायनान्शिअल माॅडेलच्या शिफारशीनुसार फंडचे वाटप करण्यात येतात. ज्या गुंतवणुकदारांना त्यांचे असेट्स आॅटोमॅटिकली अलोकेट करायचे आहेत, त्याच्यांसाठी हा फंड चांगला आहे.

  • कन्झर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड

या फंडमध्ये एकूण असेट्सच्या 10 ते 25 टक्के रक्कम इक्विटी आणि तिच्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवावी लागते. जी रक्कम शिल्लक राहते ती डेब्ट साधनांमध्ये गुंतवावी लागते. फंडचे उद्दिष्ट पोर्टफोलिओच्या डेब्टमधून उत्पन्न मिळवणे आणि एकूण रिटर्नला चालना देण्यासाठी छोट्या इक्विटी घटकाचा वापर करणे आहे. डेब्टमार्फत रिटर्न शोधणारे आणि थोडी रिस्क घ्यायला तयार असणारे गुंतवणुकदार यात गुंतवणूक करू शकतात.

  • इक्विटी सेव्हिंग्ज फंड

या फंडची एक विशेषता आहे, ती म्हणजे  हा फंड रिस्क आणि रिटर्नमध्ये बॅलन्स साधन्याचा प्रयत्न करते.  या फंडची गुंतवणूक इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि डेब्टमध्ये असते. तसेच, या फंडमार्फत इक्विटी असेट्समध्ये 65 ते 100 टक्के आणि डेब्ट असेट्समध्ये 0 ते 35 टक्के गुंतवणूक करण्यात येते. त्यामुळे रिटर्नच्या वाढीसाठी इक्विटीची चांगली मदत होते.

  • आर्बिट्राज फंड

कमी रिस्क घेणाऱ्यांसाठी हा फंड चांगला आहे. कारण, याची गुंतवणूक जास्तीतजास्त म्हणजेच 65 ते 100 टक्के इक्विटीमध्ये असते. तर, 0 ते 35 टक्के डेब्टमध्ये असते. इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक अधिक केली जाते. तसेच, खरेदी विक्री एकदाच होत असल्याने दोन्ही मार्केटमधून या फंडमध्ये रिटर्न येतो. म्हणजेच कॅश मार्केटमध्ये खरेदी करायची आणि लगेच ती वायदे बाजारात विकायची. हे धोरण असल्यामुळे रिस्क कमी असते. त्यामुळे बरेच गुंतवणुकदार हा पर्याय निवडतात.

फायदा काय?

या फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा म्हणजे वेगवेगळ्या असेट्समध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा एकाच ठिकाणी गुंतवणुकदारांना सर्व असेट्समध्ये गुंतवणूक करायला  मिळते. तसेच, इक्विटी आणि डेब्टची योग्यरित्या सांगड घातल्याने रिस्क कमी होते आणि गुंतवणुकदारांना चांगले रिटर्न मिळू शकतात. त्यामुळे हायब्रिड फंडची हीच विशेषता आहे की योग्य अभ्यास करून गुंतवणूक केल्यास रिटर्न चांगलाच मिळणार आणि फायदाही होणार.

फंड निवडायच्यापूर्वी या गोष्टी पाहाच!

फंडचा मागील काही वर्षाचा रिटर्न पाहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फंड रिस्कची माहिती काढावी लागेल, त्याचा कालावधी पाहून, फंडचा काही चार्ज आहे का? तेही पाहावे लागेल. फंडचे धोरण काय आहे? अशा बारीक गोष्टी फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्हाला पाहाव्या लागतील. नाहीतर आर्थिक फटका बसू शकतो.

खाली काही फंडची यादी दिली आहे त्यांच्या 3 ते 5 वर्षाच्या रिटर्नसह. ही आकडेवारी 31 जुलै 2023 पर्यंतची आहे.  

FUNDS

 (डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)