भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) प्रारंभिक समभाग विक्रीला आयपीओमधील अँकर गुंतवणूकदार (Anchor Investor) म्हणजेच पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (Qualified Institutional Buyer) चांगला प्रतिसाद देत 5,627 कोटींचे योगदान दिले आहे. या एकूण योगदानापैकी सुमारे 4 हजार कोटींचे योगदान म्युच्युअल फंडकडून आले आहे. यानिमित्ताने आपण अँकर गुंतवणूकदार किंवा संस्थात्मक खरेदीदार म्हणजे काय? आणि त्यांची आयपीओमध्ये गुंतवणुकीमधील भूमिका काय असते हे समजून घेणार आहोत.
अँकर गुंतवणूकदार कोण असतात? Who are the anchor investor?
आयपीओमधील अँकर गुंतवणूकदार हा पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer) असतो. पात्र संस्थात्मक खरेदीदारांमध्ये देश-विदेशातील विविध म्युच्युअल फंड हाऊस, विविध गुंतवणूक कंपन्या, विमा कंपन्या, व्यावसायिक बॅंका यांचा समावेश असतो. या गुंतवणूकदारांना इतरांच्या तुलनेत एक दिवस अगोदर गुंतवणूक करण्याची संधी मिळते. या गुंतवणूकदारांना किमान 10 कोटी रूपये गुंतवावे लागतात. तसेच संबंधित कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध (Listing) झाल्यानंतर किमान 30 दिवस ही गुंतवणूक विकता येत नाही. या गुंतवणूकदारांवर सेबीचे (SEBI) नियंत्रण असते.
अँकर गुंतवणूकदारांची भूमिका
पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) राखीव असलेल्या हिश्श्यातून अँकर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी मिळते. साधारणत: आयपीओ आणणाऱ्या कंपनीच्या समभागांना चांगली मागणी आहे, हे अँकर गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीतून दिसते. अँकर गुंतवणूकदारांचा प्रतिसाद चांगला असेल सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून आणि एकूणच कंपनीच्या शेअर्स विक्रीला प्रोत्साहन मिळते. तसेच अँकर गुंतवणूकदारांनी एखाद्या आयपीओमध्ये कमी गुंतवणूक केली किंवा त्याला विशेष महत्त्व दिले नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसू शकतो. म्हणून आयपीओमध्ये अँकर गुंतवणूकदारांची भूमिका म्हत्त्वाची मानली जाते.
आयपीओमधील गुंतवणूकदारांचे प्रकार? Types of investors in an IPO?
आयपीओमध्ये 3 प्रकारचे गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. पहिले किरकोळ गुंतवणूकदार (Retail Individual Investor - RII), दुसरे पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer) यात बॅंका, म्युच्युअल फंड आणि वित्तीय संस्था यांचा समावेश होतो. तिसरे मोठे गुंतवणूकदार (High Net-worth Individual - HNI) या प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आयपीओमध्ये आरक्षण असते.
सेबीने खालील गुंतवणूकदारांना पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) म्हणून मान्यता दिली.
• सर्व व्यावसायिक बँका (Commercial Banks)
• म्युच्युअल फंड, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड, व्हेंचर कॅपिटल फंड
• SEBI नोंदणीकृत विदेशी उपक्रम भांडवलदार (Foreign venture capital)
• SEBI नोंदणीकृत विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors)
• IRDAI नोंदणीकृत कोणतीही विमा कंपनी
• बहुपक्षीय आणि द्विपक्षीय विकास वित्तीय संस्था
• कोणत्याही राज्याचा औद्योगिक विकास महामंडळाचा विभाग
• 25 कोटी रुपयांच्या किमान निधीसह भविष्य निर्वाह निधी
• 25 कोटी रुपयांच्या किमान कॉर्पससह पेन्शन फंड
• पोस्ट विभागाद्वारे चालवला जाणारा विमा निधी
• राष्ट्रीय गुंतवणूक निधी
आयपीओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. साधारणत: सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आयपीओ ओपन होण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदार या आयपीओला कशाप्रकारे प्रतिसाद देतात, यावर संबंधित आयपीओला बाजारातून प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. म्हणून गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांचा प्रतिसाद समजून घेणे आवश्यक आहे.