मुच्युअल फंडामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असते. फंड मॅनेजर वेगवेगळ्या प्रकारे निधीचा गुंतवणूक करत असतात. यात कॉन्ट्रा म्युच्युअल फंडाला देखील पसंती मिळत असते. हे कॉन्ट्रा म्युच्युअल फंड नेमके काय असते आणि त्याचा फायदा काय आहेत ते जाणून घेऊया.
कॉन्ट्रा म्युच्युअल फंड म्हणजे काय ? (What Is Contra Mutual Fund)
म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून पैसे गुंतवले जातात. यातील गुंतवणूक मार्केटमधील ट्रेंडच्या विरुद्ध थोडक्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या शेअरमध्ये केली जाते. contrarian पद्धतीचा अवलंब फंड मॅनेजर्सकडून केला जातो, तेव्हा त्याला म्युच्युअल फंड असे म्हणतात. यामध्ये मार्केट ट्रेंडच्या विरोधात गुंतवणूक केली जाते. सध्या चांगली कामगिरी करत नसलेले स्टॉक खरेदी केले जातात. यावेळी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये गुंतवणूकदारांकडून अशा स्टॉकची खरेदी टाळली जाते. त्याच्या विरुद्ध भूमिका या फंडमध्ये घेतली जाते. कामगिरी खालावलेले स्टॉक दीर्घ कालावधीत कामगिरी सुधारून उत्तम परतावा देऊ शकतात, ही स्ट्रॅटेजी या फंडामध्ये फॉलो केली जाते.
कॉन्ट्रा म्युच्युअल फंडाचा फंड मॅनेजर एखादा स्टॉक त्याला अपेक्षित असलेल्या दीर्घकालीन मूल्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करतो. मागणी वाढेपर्यंत होल्ड करून ठेवतो आणि यातून आपल्या गुंतवणूकदारांना अधिक परतावा देण्याचा प्रयत्न करतो. असे फंड दीर्घ मुदतीसाठी चांगली कामगिरी करतात आणि अल्पावधीसाठी योग्य मानले जात नाहीत.
कॉन्ट्रा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा फायदा (Advantages of Investing in Contra Fund)
कॉन्ट्रा म्युच्युअल फंडात परतावा जास्त मिळू शकतो, यामुळे या प्रकारच्या फंडाचे आकर्षण असते. जोखीम जास्त असली तरी गुंतवणूकदार याचा विचार करतात. सध्या खराब कामगिरी करत असलेले स्टॉक जर दर्जेदार असतील तर तत्कालिन परिस्थितीवर मात करून लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकतात. यामुळे अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनाही चांगला परतावा मिळू शकतो.
कॉन्ट्रा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे तोटे (Disadvantages of Investing in Contra Fund)
कॉन्ट्रा म्युच्युअल फंडामध्ये जोखीम जास्त मानली जाते. कारण मार्केट ट्रेंडच्या विरुद्ध जाऊन चांगली कामगिरी न करणाऱ्या स्टॉकमध्ये या पद्धतीत गुंतवणूक केली जाते. यात गुंतवणूक करताना संयम महत्वाचा ठरतो. कमीत कमी पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधी गुंतवणूक दाराच्या हातात असणे यामध्ये गुंतवणूक करताना महत्वाचे आहे. फंडाची , मॅनेजरची मागील काही वर्षातील कामगिरी बघणे देखील महत्वाचे असते.