शेअर बाजारात (Stock market) अनेक वेळा चढ-उतार येत असतात. काही गुंतवणूकदार कमी वेळात जास्त नफा मिळेल या हेतूने गुंतवणूक (Investment) करत असतात. तर बाजारात घसरण झाल्याने गुंतवणूकदार चिंतीत होतात. यामुळेच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर भावनिक निर्णय घेऊ नये व गुंतवणूकदारांना भविष्यात लाभ मिळावा यासाठी म्युच्युअल फंडांनी बॅलन्स ॲडव्हांटेज फंडाची (Balance Advantage Fund) सुरुवात केली. जाणून घेऊया बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड म्हणजे नक्की काय.
बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड म्हणजे काय ?
बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड (Balance Advantage Fund) ही म्युच्युअल फंडातील (Mutual funds) योजना आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रतिकूल परिस्थितीत चांगला फायदा घेण्यासाठी कशा प्रकारे इक्विटीमध्ये (Equity) गुंतवणूक करावी याचा अंदाज घेणे अवघड होते. यासाठी म्युच्युअल फंडांची बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड (Balance Advantage Fund) हि चांगली योजना आहे. या फंडामुळे शेअरच्या किमतीतील चढ उतारापासून गुंतवणुकीचे संरक्षण करता येते. तसेच डेट आणि इक्विटी (Debt and equity) अशा दोन्ही पर्यायात आपल्याला गुंतवणूक करता येते. जेव्हा बाजार उच्चांकावर असतो तेव्हा त्यातील गुंतवणूक कमी करून त्याबदली डेटमध्ये गुंतवणूक करता येते. तर जेव्हा बाजार स्वस्त असतो तेव्हा ही योजना इक्विटीमध्ये जादा गुंतवणूक करते. या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये (Balance Advantage Fund) असेट आलोकेशन फंड (Asset Allocation Fund) मूल्यांकन आणि वृध्दी (Evaluation and growth) बरोबरच व्याजदरावर लक्ष ठेवते.
बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडची कामगिरी
ज्या फंड कंपन्यांकडे ही बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड (Balance Advantage Fund) योजना आहे. त्यात एचडीएफसी(HDFC) सर्वात मोठी आहे जिचा एयूएम (Assets Under Management) मार्च 2022 मध्ये 43 हजार कोटीहून अधिक आहे. या योजनेच्या कामगिरीचा विचार केला तर एचडीएफसी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडाने एका वर्षात 27.23 टक्के परतावा दिला आहे. तीन वर्षात 13.81 टक्के फायदा करून दिला आहे. एक वर्षात कोटकच्या या योजनेने 9.3 टक्के, तीन वर्षात 11.4 टक्के परतावा दिला आहे. अँक्सिस म्युच्युअल फंडाने 10.8 टक्के आणि 8.6 टक्के रिटर्न दिला आहे. तर आयडीएफसीच्या या फंडाने याच कालावधीत 9.96 टक्के आणि 10.62 टक्के फायदा गुंतवणूकदारांना करून दिला आहे.
रोजच्या आयुष्यात समतोल साधण्याची आवश्यकता असते तर मग गुंतवणूक करतानाही समतोल गरजेचा आहे. यासाठी गुंतवणूकदारांनी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडाचा विचार करायला हरकत नाही.