भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही भारतात 65% लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी हाच या देशाचा भाग्यविधाता आहे असं आपण म्हणतो. पण सध्या शेतकऱ्यांना मिळत असलेल्या पिकाच्या दराला घेऊन चिंता वर्तवली जात आहे. नुकतचं काही दिवसांपूर्वी कांद्याला मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळाले. ही घटना घडून काही दिवस होतात न होतात तोपर्यंत पुन्हा एकदा एका शेतकऱ्याच्या शेतमालाला मिळालेल्या दरासंदर्भातील घटना समोर आली आहे. नेमकी काय आहे ती घटना, चला जाणून घेऊयात.
नेमकी घटना काय?
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतोष बारकाळे (Santosh Barakale) त्यांच्या शेतात पालेभाजी पिकवतात आणि शहरातील बाजारात त्याची विक्री करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या शेतात कोथिंबीर आणि मेथीची (Coriander and Fenugreek) पालेभाजी शेती केली होती. गेल्या काही महिन्यांपासून अथक परिश्रम करून त्यांनी हे पीक घेतलं होतं. त्यासाठी त्यांना साधारण 20,000 रुपये खर्च आला होता. पिकाची काढणी करून त्यांनी 35 किलोमीटर प्रवास करून, 5,000 रुपये वाहतूक खर्च करून बाजारपेठ गाठली खरी, पण कोथिंबिरीच्या आणि मेथीच्या भाजीला व्यापाऱ्यांकडून मिळालेला दर पाहून त्यांचे डोळे पाणावले.
या विचाराने ग्राहकांना फुकटात दिली भाजी
तीन महिन्याच्या मेहनतीला बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी 1000 रुपये भाव दिला. मिळालेला भाव पाहून संतोष बारकाळे (Santosh Barakale)यांनी डोक्याला हाताचं लावला. तीन महिन्यांची मेहनत आणि 25,000 रुपये खर्च करून बाजारात आणलेल्या पिकाला मिळालेला दर पाहून, व्यापाऱ्यांच्या हाती पीक देण्यापेक्षा त्यांनी स्वतःच उभारून ग्राहकांना फुकटात भाजी विकली. 1000 रुपयांच्या मिळकतीतून शेतीचा खर्च कसा भागवायचा असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला विचारत हजारो शेतकऱ्याची व्यथा सर्वांसमोर मांडली. व्यापाऱ्याकडून 1000 रुपये घेण्यापेक्षा ग्राहकांना फुकटात भाजी दिली, तर त्यांचे आशीर्वाद मिळतील असे संतोष बारकाळे म्हणाले.