पैशांची अडचण सर्वानाच असते. भविष्यात उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांसाठी आपण तयार आहोत का? असा विचार कोणी करत नाही. परिणामी COVID-19 मुळे काहींना आर्थिक दृष्ट्या अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागले. अनेक महिने घरात बसून अनेक संकटांचा सामना करत असताना आपली गरज काय व किती हे आपण सर्वानीच पहिले अशातच घरी राहून अधिकचा खर्च न करता भविष्यासाठी तरतूद केली तर अनेक आर्थिक ताण सहज कमी होऊ शकतात. अशा काही सकारात्मक गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
1. आर्थिक साक्षरतेत सुधारणा
कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक ते अगदी नोकरी करणारे कर्मचारी, कामगारांना बराच वेळ मिळाला. यामुळे त्यांनी गुंतवणूक, आर्थिक बाजार इत्यादींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वेळ दिला. ज्यामुळे त्यांची आर्थिक साक्षरता वाढली. गुंतवणूक कुठे व कशी करावी याची माहिती मिळाली.
2. आपत्कालीन निधीचे महत्त्व
कोविड-19 संसर्गामुळे सर्वसामान्यांना आपत्कालीन निधीचे महत्त्व पटले. लॉकडॉऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. वाढत्या महागाईमुळे आणि स्वत:कडे पुरेशी बचत नसल्यामुळे अनेकांचे घराचे बजेट बिघडले. महागाईमुळे सेव्हिंगही अपुरी पडू लागली. पण या परिस्थितीमुळे आपल्या कमाईतील काही भाग हा आपत्कालीन घडणाऱ्या घटना/ परिस्थितींसाठी बाजूला ठेवला पाहिजे, याची शिकवण मिळाली. आपत्कालीन निधीचे महत्त्व पटले. एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीकडे किमान काही महिन्यांचे ईएमआय (EMI) आणि भाड्याचे पैसे भरता येतील एवढा आपत्कालीन निधी असायलाच पाहिजे.
3. वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचे महत्त्व
कोविड-19 महामारीच्या काळात, शेअर बाजार खाली घसरत होता, तर सोने आणि इतर सुरक्षितता रोखे वरच्या दिशेने होते. त्यामुळे फक्त सुरक्षित गुंतवणूक करून फायदा नाही. तर गुंतवणूक ही वेगवेगळ्या ठिकाणी केली पाहिजे. मालमत्ता वाटप हे एक गुंतवणूक धोरण आहे. ज्याचा उद्देश आपली गुंतवणूक विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये, जसे की इक्विटी, निश्चित उत्पन्न, रोख आणि रोख समतुल्य, रिअल इस्टेटमध्ये विभागून त्याची जोखीम संतुलित करून आपला पोर्टफोलिओ सुरक्षित करणे.
4. मासिक खर्च समजून घेणे
लॉकडाऊनमुळे, वर्क फ्रॉर्म होम या नवीन पद्धतीने काम करण्याची कला विकसित झाली. यामुळे बऱ्याच जणांचा प्रवासातील वेळ वाचला. ऑफिसला जाणे बंद झाल्याने बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यावर आपोआप बंधन आले. परिणामी एखाद्या व्यक्तीला त्याच्या गरजा किती कमी आहेत, याची जाणीव झाली. त्यातून त्याला स्वत:चा किमान मासिक खर्च समजून घेता आला. वायफळ खर्च कसा कमी करू शकतो सोबतच गरज किती आणि कशाची असावी याची शिकवण सुद्धा मिळाली. महिन्याला कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त बचत कशी करायची हे कोविड मधील काही महिन्यांमध्ये आपल्याला कळले.
5. विम्याचे महत्त्व
कोविड-19 या महामारीच्या काळात आपल्याला विमा असणे किती गरजेचे आहे, हे प्रत्येकला कळले. विमा हे एक असे साधन आहे. जे आरोग्य खर्च आणि लाईफ कव्हर करण्यात मदत करते. कोविड-19 महामारीने व्यक्तीला विमा असण्याचे महत्त्व शिकवले. कोविडमुळे जॉब गेलेल्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अशातच कोविड पॉसिटीव्ह आल्यावर उपचारासाठी लागणारा खर्च नक्कीच खिशाला कात्री देणारा होता. अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विशेषत: मुदत विमा आणि आरोग्य विमा असणे किती आवश्यक आहे, हे कळाले.
एकूणच कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकता आल्या. विशेष म्हणजे या काळात पैशांची बचत कशी करायची, स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, तसेच स्वत:साठी आणि कुटुंबासाठी आरोग्य विमा किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव झाली. या गोष्टींचे महत्त्व पूर्वीपासूनच होते. फक्त कोविडच्या निमित्ताने लोकांना त्याचा प्रत्यय आला.