कोविड संक्रमणामुळे 2019, 2020, 2021 आणि 2022 हे वर्ष कमालीचे आव्हानात्मक होते. कोरोनाचा सामना संपूर्ण जगाला करावा लागला होता. 2021-22 मध्ये कोरोनाचा जोर ओसरला होता आणि सगळ काही पूर्वपदावर यायला सुरुवात झाली होती. लॉकडाऊनचे नियम देखील सैल करण्यात आले होते आणि बाजारपेठा देखील खुल्या झाल्या होत्या. गेली 2 वर्षे लॉकडाऊनमुळे घरात बसून असलेल्या भारतीयांनी जेव्हा बाजारपेठांमध्ये जायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी सर्वात जास्त पैसा कुठल्या गोष्टीवर खर्च केला असेल तर ते म्हणजे कपडे!
भारताच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या Private final consumption expenditure या अहवालानुसार भारतीयांच्या कपड्यांवरील खर्चात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर दारूवरील खर्चात 14.3 टक्क्यांनी आणि पादत्राणांवरचा खर्च 12.8 टक्क्यांनी वाढला आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. त्याचबरोबर भारतीयांचा खाद्यपदार्थांवरील खर्च केवळ 7 टक्के दराने वाढला आहे, असं निरीक्षण देखील या अहवालात नोंदवलं गेलं आहे.
#DidYouKnow
— Anand Rathi Wealth Limited (@ARWealth) April 5, 2023
India's Private Final Consumption Expenditure (consumer spending) peaked in FY23 H1 and reached its highest level since FY15 as consumer confidence among Indians has increased in the last few years.
Know more: https://t.co/8joeyiGoZp#mathematicalrevolution… pic.twitter.com/VXkpb34x1B
प्राइवेट फाइनल कंजप्शन एक्सपेंडिचर (PFCE) म्हणजे काय?
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांचा खर्च लक्षात घेऊन अर्थ मंत्रालय सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) किती आहे याचा अंदाज लावत असते. यामध्ये खासगी स्तरावर भारतीय सामान्य नागरिक कुठल्या गोष्टी खरेदी करतात, त्यासाठी किती पैसे खर्च करतात याचा अभ्यास केला जातो. यातून नागरिकांच्या राहणीमानात होत असलेल्या सुधारणांचा देखील अंदाज येतो. तसेच कुठल्या क्षेत्रात किती आर्थिक उलाढाल सुरु आहे हे देखील सरकारला समजते. अहवालानुसार GDP मध्ये PFCE चा वाटा 55-56% इतका प्रचंड आहे.
कपड्यांवर सर्वाधिक खर्च
बाजारभावाचा विचार केला तर भारतात कपड्यांवरील खर्च 35 टक्क्यांनी तर पादत्राणांवरचा खर्च 19.76 टक्क्यांनी वाढला आहे असे अहवालात नमूद केले आहे. तसेच दारूवर भारतीय नागरिक 19.16 टक्क्यांनी अधिक खर्च करू लागले आहेत. तर खाद्यपदार्थांवरील खर्च देखील मागील वर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढला आहे.
जाणकारांच्या मते कोविडमधून देश बाहेर पडत असताना लोकांच्या खर्च करण्याच्या सवयीत हे बदल झाले आहेत. 2021-22 मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होत गेला आणि लोकांचे उत्पन्न वाढू लागले, त्याचा परिणाम म्हणून लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढत चालली आहे. कपडे, दारू, पादत्राणे यांच्या तुलनेत खाद्यपदार्थांवरील खर्चाच्या वाढीचा दर कमी आहे कारण कोरोना संक्रमण काळात बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे अनेकांनी टाळले होते.