पैसे सर्वात सुरक्षित कुठे राहत असतील तर ते म्हणजे बँकेत. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. म्हणून पैसे जमा करण्यासाठी लोक बँकेचा वापर करतात. पण, ते पैसे ठेवण्यासाठी किती प्रकारचे सेव्हिंग्ज अकाउंट असू शकतात. हे तुम्हाला माहिती आहे का? कारण गरजेनुसार सेव्हिंग्ज अकाउंट उघडले जातात. त्यामुळे किती प्रकारचे सेव्हिंग्ज अकाउंट असू शकतात, हे आपण आज जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंट
सेव्हिंग्ज अकाउंटचा हा सर्वात सोपा आणि सामान्य प्रकार आहे. रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर बँक तुमच्याकडून चार्ज आकारू शकते. या अकाउंटचा वापर रेग्युलर व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच, या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याची किंवा काढण्याची कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे पैसा जमा करण्यासाठी या अकाउंटचा सर्वाधिक वापर केला जातो.
झीरो सेव्हिंग्ज अकाउंट
रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउट आणि झीरो सेव्हिंग्ज अकाउंट हे दोन्ही सारखेच आहेत. फक्त या दोघात एक फरक आहे. तो म्हणजे तुम्हाला या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. तसेच, हे अकाउंट उघडल्यास, तुम्हाला करंट आणि सेव्हिंगज या दोन्ही अकाउंटचा लाभ घेता येतो. तुम्हाला बँक व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्डसुद्धा या अकाउंटसह देते. त्यामुळे तुम्हाला यासाठी वेगळा अर्ज करायची गरज पडत नाही.
महिला सेव्हिंग्ज अकाउंट
महिला सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये काही गोष्टी रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंट सारख्याच आहेत. पण, हे खास महिलांसाठी तयार केलेले असल्यामुळे यात महिलांना काही सवलती दिल्या जातात. जसे की शाॅपिंग आणि अन्य व्यवहारावर महिलांना खूप फायदे मिळतात. त्यामुळे महिलांनी हे अकाउंट उघडल्यास शाॅपिंगवर त्यांना चांगला डिस्काउंट मिळवता येऊ शकतो.
किड्स सेव्हिंग्ज अकाउंट
ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी काही पैसे जमा करायचे आहेत. त्यांच्यासाठी किड्स सेव्हिंग्ज अकाउंट बनवण्यात आले आहे. याद्वारे डेबिट कार्ड देण्यात येते. पालकांच्या देखरेखी खाली हे अकाउंट सांभाळले जाते. हे अकाउंट उघडल्याने मुलांना बालवयातच सेव्हिंग्ज करण्याची सवय लागू शकते. त्यामुळे त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हे अकाउंट उघडणे योग्य ठरू शकते.
सीनिअर सिटीझन्स सेव्हिंग्ज अकाउंट
सीनिअर सिटीझन्स सेव्हिंग्ज अकाउंट खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहे. त्यामळे 60 वर्षांवरील नागरिक या खात्याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये आरोग्य आणि गुंतवणुकीसंबंधी लाभ ज्येष्ठांना मिळतो. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक केल्यास, ज्येष्ठांना त्यांच्या सेव्हिंग्जवर चांगला व्याजदर मिळू शकतो. त्यामुळे ज्येष्ठांनी हे खाते उघडल्यास त्यांना चांगला लाभ होऊ शकतो.
सॅलरी सेव्हिंग्ज अकाउंट
हे खाते मुख्यता मोठ्या काॅर्पोरेशन आणि कंपन्यांद्वारे कर्मचाऱ्यांची सॅलरी करण्यासाठी उघडले जाते. मात्र, कर्मचारी स्वत: त्यांचे अकाउंट सांभाळतात. हे खाते उघडल्यावर शक्यतो कर्मचाऱ्यांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे बंधन राहत नाही. पगाराच्या ठरलेल्या दिवशी बॅंक कंपनीच्या अकाउंटमधून पैसे काढून कर्मचाऱ्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर करते. तसेच, तीन महिन्यापर्यंत अकाउंटवर सॅलरी जमा न झाल्यास, अकाउंटला रेग्युलर खात्यात बदलण्यात येते.
फॅमिली सेव्हिंग्ज अकाउंट
रेग्युलर खात्याचा आणखी एक प्रकार म्हणजे फॅमिली सेव्हिंग्ज अकाउंट. या अकाउंटद्वारे पूर्ण फॅमिली या सेव्हिंग्ज अकाउंटचा लाभ घेऊ शकते. या खात्याद्वारे कुटुंबाला एक फॅमिली आयडी दिली जाते. त्याद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबीयांना पैसे डिपाॅझिट करता येतात.