गुंतवणूक (Investment) करण्यासाठी सध्या विविध सरकारी तसंच खासगी संस्था, बँकांचे गुंतवणुकीचे प्लॅन्स, योजना आहेत. आर्थिक परिस्थितीनुसार त्यात बदल पाहायला मिळतात. नोकरी सुरू असताना उत्पन्नाचा नियमित स्त्रोत असतो. मात्र नोकरीनंतर म्हणजेच सेवानिवृत्तीनंतर कायमस्वरुपी उत्पन्नाचा स्त्रोत नसतो. अशावेळी नोकरी सुरू असतानाच निवृत्तीनंतरचं नियोजन केलं तर पैशांची समस्या येणार नाही. अॅन्युइटी स्कीम (Annuity plan) हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर असतो. सध्या यात दोन मोठ्या संस्था आहेत. दोन्हीही सरकारी आहेत.
एकरकमी गुंतवणुकीतून प्रतिमहिना उत्पन्न
अॅन्युइटी स्कीम म्हणजेच वार्षिकी योजना देणाऱ्या या दोन संस्था म्हणजे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. अॅन्युइटी स्कीमच्या माध्यमातून तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून नंतर प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळवू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे, एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन्हींच्या अॅन्युइटी स्कीम सरकारी संस्थांच्या मार्फत ऑफर केल्या जात आहेत. या दोन्ही संस्थांपैकी कोणत्याही एका योजनेत तुम्हाला गुंतवणूक तर करायची आहे, मात्र त्याबद्दल संभ्रम असेल, पुरेशी माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला या दोन्ही संस्थांच्या अॅन्युइटी योजनेविषयी महत्त्वाची तसंच तुम्हाला फायदा होईल, या अर्थानं पुरेपूर माहिती देणार आहोत.
काय आहे एसबीआयची अॅन्युइटी स्कीम?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अॅन्युइटी स्कीममध्ये तुम्हाला एकरकमी पैसे गुंतवावे लागतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला तुम्हाला एक निश्चित अशी रक्कम मिळत जाईल. या स्कीममध्ये तुम्ही 3 ते 10 वर्षांपर्यंत पैसे गुंतवू शकता. किमान 25,000 रुपयांपासून तुम्हाला हवी तेवढी रक्कम गुंतवू शकता. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला 75 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकतं. ही योजना सुरू केल्यानंतर तुम्हाला एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरित करायची असेल तर ती करण्याची सुविधादेखील यात मिळते.
काय आहे एलआयसीची अॅन्युइटी स्कीम?
एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फेदेखील वार्षिकी योजना उपलब्ध करून दिली जाते. यामार्फत विविध स्कीम्स ऑफर केल्या जातात. काय आहेत या योजना?
जीवन शांती योजना - एलआयसीची जीवन शांती योजना (LIC जीवन शांती योजना) ही एक अॅन्युइटी स्कीम आहे. ही योजना सुरू केल्यानंतर लगेचच तुम्हाला वार्षिकीचा लाभ मिळणं सुरू होतं. या योजनेमध्ये तुम्हाला एकूण 10 पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी एकाची निवड तुम्हाला करावी लागते. त्याचबरोबर या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पेआउट योजनादेखील निवडण्याचा पर्याय देण्यात येतो.
एलआयसी न्यू जीवन निधी योजना - न्यू जीवन निधी योजनेमध्ये (LIC New Jeevan Nidhi Plan) तुम्हाला मासिक किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरावा लागतो. यानंतर निश्चित कालावधीनंतर तुम्हाला दर महिन्याला वार्षिकीचा लाभ मिळतो.
एलआयसी जीवन अक्षय VII - एलआयसीची ही योजनादेखील एक वार्षिक योजना आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना एकूण 10 पर्याय दिले जातात. विशेष म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मृत्यूपर्यंत पेन्शनचा लाभ मिळू शकतो. तुम्ही कोणता पर्याय निवडता त्यावर या बाबी अवलंबून आहेत. तुम्ही योजना सुरू करून तत्काळ अॅन्युइटीसाठी गुंतवणूक करू शकता.