दिल्लीमधील एका कारप्रेमीने आपली जप्त झालेली व्हिन्टेज कार पुन्हा मिळवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने सरकारच्या जुन्या गाड्यांच्या संदर्भातील End of Life Vehicles या पॉलिसीविरोधात आवाज उठवला आहे.
दिल्लीतील एका गॅरेजमधून दिल्ली वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक 75 वर्षे जुनी असलेली कार जप्त केली आहे. ही कार व्हिन्टेज कॅटेगरीमध्ये मोडणारी कार असून त्याचे मॉडेल 1948 मॉडेल हंबर व्हिन्टेज असे आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयाविरोधात सदर कारच्या मालकाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच त्याने जुन्या कार संदर्भात दिल्ली सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला आव्हान दिले. या याचिकेचा विचार करताना हायकोर्टाने दिल्ली सरकारकडून उत्तर मागितले आहे.
याचिकाकर्त्याने आपली बाजू मांडताना सांगितले की, 1948 मॉडेल हंबर व्हिन्टेज कार ही त्याच्या आजोबांची होती आणि सध्या ती वापरात नव्हती. त्यामुळे सदर कारचे व्हिन्टेज कारमध्ये नोंदणी करण्यासाठी ती दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये पाठवण्यात आली होती. पण तिथे तपासणीसाठी पोहोचलेल्या वाहन विभागातील अधिकाऱ्यांनी ही गाडी तिथून उचलून नेली. या प्रकारानंतर सदर व्यक्तीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
दिल्ली हायकोर्टाने या याचिकेची नोंद करून घेऊन दिल्ली सरकारला यावर उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सरकार आणि अधिकाऱ्यांना सदर कार स्क्रॅप करू नये असे आदेश देऊन, याची पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत.
व्हिन्टेज कारसाठी नोंदणी कशी होते?
मोटर वाहन कायदा, 1988 अंतर्गत जुन्या कारची व्हिन्टेज कार म्हणून पुनर्नोंदणी करण्याची सुविधा आहे. Vintage Car म्हणजे जुन्या, नामशेष झालेल्या कारच्या मॉडेलचे जतन करून ती सुरू ठेवण्याची प्रक्रिया आहे. केंद्र सरकारने अशा व्हिन्टेज कारसाठी एक वेगळी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणीनुसार सदर कारला व्हिन्टेज कारचा दर्जा दिला जातो.
व्हिन्टेज कार नोंदणीसाठी नियम काय आहेत?
- ज्या टू-व्हिलर आणि फोर-व्हिलर गाड्या 50 हून अधिक जुन्या आहेत. तसेच त्या सुस्थितीत आहेत. त्यात खूप दुरुस्ती करण्यात आलेली नाही, अशा गाड्यांना व्हिन्टेज म्हटले जाईल.
- नोंदणी/पुनर्नोंदणी करण्यासाठी फॉर्म 20 भरावा लागेल. त्यासोबत, इन्शुरन्स पॉलिसी, फी, गाडी परदेशातील असल्यास त्याची पावती आणि जुने नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागेल.
- राज्य नोंदणी प्राधिकरण फॉर्म क्रमांक 23A नुसार, 60 दिवसांच्या आत नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करेल.
- ज्या गाडींची नोंदणी यापूर्वीच झाली आहे. त्यांचा नंबर आहे तसाच ठेवला जाईल. पण नवीन गाड्यांची नोंदणी “XX VA YY*”अशी केली जाईल. यात VA चा अर्थ व्हिन्टेज, XX राज्याचा कोड आणि YY दोन अंकी वाहन मालिका आणि * हा क्रमांक 0001 ते 9999 यापैकी असेल.
- नवीन नोंदणी शुल्क 20,000 आणि पुनर्नोंदणी शुल्क 5,000 रुपये असेल.
- व्हिन्टेज कार या नियमित किंवा व्यावसायिक स्वरूपात रस्त्यावर चालवता येणार नाहीत.
Source: www.hindustantimes.com