Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI: भारतात ‘डिजिटल आर्थिक क्रांती’ घडवणारी पेमेंट सिस्टम

UPI

Image Source : https://www.freepik.com/

UPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला असून, डेबिट, क्रेडिट कार्डच्या तुलनेत UPI चा वापर प्रचंड वाढला आहे.

भारतात गेल्याकाही वर्षात डिजिटल क्रांतीचे वारे वाहू लागले आहे. हा बदल केवळ स्वस्त इंटरनेट आणि प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन एवढ्या पुरताच मर्यादित राहिलेला नाही. आर्थिक व्यवहारात देखील डिजिटल क्रांती घडली आहे. खासकरून, UPI अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतेच, UPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला आहे. इतर देशांमध्ये देखील भारताची ही पेमेंट सिस्टम उपलब्ध झाली आहे.

UPI ने डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये मोठा बदल घडवला आहे. मात्र, एकीकडे UPI चा वाढता वापर हा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरताना दिसत आहे. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना मास्टरकार्ड कंपनीचे सीएफओ सचिन मेहरा यांनी UPI हे प्रभावी माध्यम असल्याचे मान्य केले. परंतु, यामुळे या क्षेत्रातील इतरांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली. व्हिसा, मास्टरकार्ड पेमेंट नेटवर्कच्या तुलनेत UPI पूर्णपणे मोफत असल्याने त्यांनी हे मत व्यक्त केले.

UPI ची सुरुवात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे एप्रिल 2016 मध्ये Unified Payments Interface (UPI) सिस्टम लाँच करण्यात आली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (NPCI) ही सिस्टम तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात एनपीसीआयद्वारे 21 बँकांसोबत मिळून ही रिअल-टाइम पेमेंट सिस्टम सेवा सुरू करण्यात आली होती.

सुरुवातीच्या यशानंतर मोठ्या स्तरावर ही सेवा सुरू करण्यात आली व दिवसेंदिवस याचा वापर वाढतच चालला आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत UPI शी 492 बँका जोडल्या गेल्या आहेत.  

UPI ने भारतात घडवली डिजिटल आर्थिक क्रांती 

भारतात आज बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन पाहायला मिळतो. याशिवाय, स्वस्तात इंटरनेट उपलब्ध असल्याने फोनच्या एका क्लिकवर जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला सहज पैसे पाठवणे देखील शक्य झाले आहे. विशेष म्हणजे नोटबंदीनंतर UPI चा वापर प्रचंड वाढल्याचे दिसून येते. UPI लाँच झाल्यानंतर वर्ष 2017 मध्ये 0.02 अब्ज आर्थिक व्यवहार झाले. तर डिसेंबर 2022 मध्ये हाच आकडा 60 अब्जवर पोहचला. फक्त 7 वर्षांमध्ये UPI ने एवढा मोठा उच्चांक गाठला आहे.

UPI च्या माध्यमातून होणारे व्यवहार

महिना

UPI शी जोडलेल्या बँका

व्यवहारांचीसंख्या (दक्षलक्ष)

व्यवहारांचीमूल्य (कोटी रुपये)

जुलै 2016

25

0.09

32.64

जुलै 2017

57

30.98

5,325.81

जुलै 2018

122

405.87

59,835.36

जुलै 2019

141

955.02

161,456.56

जुलै 2020

174

1,800.14

3,29,027.66

जुलै 2021

259

3,654.30

6,54,351.81

जुलै 2022

358

6,780.80

11,16,438.10

जुलै 2023

492

10,555.69

15,79,133.18

सोर्स - NPCI   

केवळ देशातील प्रमुख शहरांमध्येच नाही तर टायर-2 आणि टायर-3 शहरांमध्ये देखील UPI चा वापर प्रचंड वाढला आहे. ग्रामीण भागामध्ये देखील या पेमेंट सिस्टमने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये डिजिटल पेमेंटचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरटीजीएस, आयएमपीएस, एनईएफटी सारख्या पेमेंट सेवा उपलब्ध असतानाही UPI इतरांपेक्षा वेगळे ठरते. वापरण्यास सोपे व मोफत असल्याने भारतात डिजिटल आर्थिक क्रांती घडवण्यात UPI चा वाटा मोठा आहे. 

UPI  च्या माध्यमातून सर्वाधिक व्यवहार केले जाणारे राज्य आणि शहर‌ 

महाराष्ट्र

मुंबई , पुणे

पंजाब

दिल्ली

नवी दिल्ली

उत्तर प्रदेश

गुजरात

पश्चिम बंगाल

तेलंगाना

हैदराबाद

कर्नाटक

बंगळुरू

तामिळ नाडू

चेन्नई, कोईम्बतूर

केरळ

तिरुवंतपुरम, एर्नाकुलम, त्रिशुर

सोर्स - Worldline Digital Payments Report   

UPI जागतिक बाजारात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सज्ज

केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्ये देखील UPI उपलब्ध आहे. भारत सरकारद्वारे सातत्याने इतर देशांमध्ये UPI सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यामुळे परदेशात राहणाऱ्या अथवा फिरायला गेलेल्या भारतीयांना UPIच्या माध्यमातून रुपयांमध्ये व्यवहार करणे सहज शक्य होते.

सर्वात प्रथम वर्ष 2021 मध्ये भूतानद्वारे ही सेवा स्विकारण्यात आली होती. सध्या ओमान, यूएई, मलेशिया, थायलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर, कंबोडिया, ब्रिटन, नेपाळ आणि फ्रान्ससह इतर काही देशांमध्ये UPI सुविधा उपलब्ध आहे. 

इतर देशांमध्ये  UPI  चा वापर         

जुलै 2021         

भूतान

ऑगस्ट 2021         

मलेशिया

सप्टेंबर 2021         

सिंगापूरमलेशियाथायलंडफिलिपाइन्सव्हिएतनामकंबोडियाहाँगकाँगतायवानदक्षिणकोरियाजपान

नोव्हेंबर 2021         

यूएई

फेब्रुवारी 2022         

नेपाळ

जुलै 2022         

फ्रान्स

ऑगस्ट 2022         

ब्रिटन

ऑक्टोबर 2022         

ओमाननेदरलँडबेल्जियमलक्झमबर्गस्विझर्लँड

जुलै 2023         

ऑस्ट्रेलियाकॅनडाकतारअमेरिकासौदी अरेबिया

सोर्स - livemint.com

UPI यशस्वी होण्यामागची कारणे

वापरण्यास खूपच सोपे – UPI यशस्वी होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे वापरण्यास खूपच सोपे आहे. स्मार्टफोन, तंत्रज्ञानाची जास्त माहिती नसलेली व्यक्ती देखील सहज याचा वापर करू शकते. यामुळे तुम्ही अगदी छोट्या छोट्या दुकानात देखील UPI ची सुविधा उपलब्ध असलेले पाहिले असेल.

याशिवाय, तुमचे बँक खाते अवघ्या काही मिनिटात UPI अ‍ॅपशी लिंक करता येते व तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय मिनिटात कोणालाही पैसे पाठवू शकता. 

व्यवहार पूर्णपणे मोफत – UPI च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच, काही ठराविक व्यवहारांवर लागू असलेले शुल्क हे देखील खूपच कमी आहे. UPI च्या माध्यमातून केलेले व्यवहार पूर्णपणे मोफत असल्यानेच ही सुविधा सर्वसामान्यांमध्ये सर्वात लोकप्रिय ठरत आहे. 

सुरक्षितता – UPI च्या माध्यमातून केलेले व्यवहार हे पूर्णपणे सुरक्षित मानले जातात. भारतात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. परंतु, बहुतांश घटनांमध्ये बँकेशी संबंधित खासगी माहिती इतरांशी शेअर केल्यामुळे फसवणूक झाल्याचे दिसून येते. मात्र, UPI हे टू फॅक्टर ऑथिंटिकेशनवर काम करते. तसेच, या माध्यमातून अवघ्या काही सेकंदात बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने त्वरित आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते.

मर्चेंट डिस्काउंट रेट (MDR) – यूपीआय लोकप्रिय होण्यामागे मर्चेंट डिस्काउंट रेट हे देखील एक कारण आहे. एमडीआर हे डिजिटल पेमेंट, डेबिट/क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर व्यापाऱ्याला द्यावे लागणारे शुल्क असते. सध्या भारतात व्यापाऱ्यांना एमडीआरमधून सूट देण्यात आली आहे. कार्डने पेमेंट केल्यावर त्यावर शुल्क आकारले जाते. मात्र, यूपीआयच्या माध्यमातून कोणतेही शुल्क न देता अगदी मोफत आर्थिक व्यवहार करता येतो.  

सरकारचे प्रोत्साहन – सरकारद्वारे डिजिटल इंडियाला सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. आर्थिक व्यवहारांवर देखील याचा परिणाम दिसून येतो. तसेच, UPI च्या मागे कोणतीही खासगी कंपनी नसून, याची निर्मिती एनपीसीआयने केली आहे. UPI च्या वापरासाठी सरकारकडून देखील पावले उचलली जात आहेत. 

UPI चे परिणाम

रोख रक्कमेचा वापर कमी – घराबाहेर पडताना नेहमी खिशात रोख पैसे बाळगावे लागत असे. मात्र, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमुळे (UPI) रोख रक्कमेचा वापर प्रचंड कमी झाला आहे. UPI ने पेमेंट सिस्टममध्ये प्रचंड मोठा बदल घडवून आणला आहे. विशेष म्हणजे नोटबंदी आणि कोरोना व्हायरस महामारीनंतर UPI चा वापर प्रचंड वाढल्याचे दिसून येते. 

स्मार्टफोनच्या एका क्लिकवर कोणालाही सहज पैसे पाठवणे शक्य झाल्यामुळे आता स्वतः जवळ रोख रक्कम बाळगण्याची गरज पडत नाही. अगदी कपडे खरेदी करण्यापासून ते टपरीवर चहाचे बिल द्यायचे असेल, UPI द्वारे सहज शक्य होते. थोडक्यात, UPI मुळे आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे.

छोट्या व्यवसायांना फायदा- UPI हे छोट्या व्यवसायांसाठी गेम चेंजर ठरले आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या पेमेंट सिस्टममुळे छोट्या व्यवसायांना अवघ्या काही सेकंदांमध्ये आर्थिक व्यवहार करणे शक्य झाले आहे. सोपी व जलद पेमेंट प्रक्रिया, मोफत ट्रांजॅक्शन, सर्व आर्थिक व्यवहारांची एकाच ठिकाणी माहिती व रोख रक्कमेवरील अवलंबित्व कमी, याचा फायदा छोट्या व्यवसायांना होतो. डिजिटल व्यवसायांच्या वाढीला देखील यामुळे चालना मिळाली आहे.

आर्थिक समावेशकता – UPI मुळे आर्थिक समावेशकता वाढल्याचे दिसून आहे. कोणतीही व्यक्ती अगदी सहज UPI चा वापर करू शकता. यासाठी केवळ तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. आरटीजीएस, आयएमपीएस, एनईएफटी सारख्या पेमेंट सेवा प्रत्येकाला वापरणे शक्य होत नाही. खासकरून, साक्षरता दर कमी असलेल्या भागांमध्ये अशा सेवा वापरण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे वापरण्यास अगदी सोपे असलेली UPI सुविधा खूपच फायद्याची ठरते. ग्रामीण भागातील नागरिकांना देखील याद्वारे विविध सेवांशी जोडण्यास मदत मिळते. 

फिनटेक क्षेत्र जोमात – UPI आल्यापासून फिनेटक क्षेत्राची देखील झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येते. UPIवर आधारित अनेक नवनवीन अ‍ॅप्स, उत्पादन आणि सेवा बाजारात पाहायला मिळत आहेत. एवढेच नाही तर पेटीएमच्या साउंडबॉक्सने मोबाइल पेमेंट सिस्टममध्ये क्रांती घडवली आहे. वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध असलेल्या साउंडबॉक्सचा पेटीएमच्या यशात मोठा वाटा आहे.

सर्वात लोकप्रिय  UPI  अ‍ॅप्स         

फोनपे

गुगल पे

पेटीएम

क्रेड

एक्सिसबँक अ‍ॅप

सोर्स - NPCI         

UPI चे भविष्य काय?

UPI ने अवघ्या 7 वर्षांमध्ये मोठी मजली मारली असून, भविष्यात देखील या पेमेंट सिस्टमची आगेकूच सुरूच राहण्याची शक्यता अधिक आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत UPIच्या माध्यमातून 100 कोटींपेक्षा अधिक वेळा आर्थिक व्यवहार करण्यात आले. रिपोर्टनुसार, मागील आर्थिक वर्षात रिटेल क्षेत्रात जवळपास 75 टक्के व्यवहार हे UPIच्या माध्यमातून झाले. पुढील 5 वर्षात हा आकडा 90 टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, 2026-27 पर्यंत UPIच्या माध्यमातून दररोज 100 कोटींपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार केले जातील. 

भारतात स्मार्टफोन व इंटरनेट वापरणाऱ्यांची वाढणाऱ्या संख्येचा देखील UPIच्या यशात हातभार आहे. सध्या भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या जवळपास 700 दक्षलक्ष आहे. तर डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांचा आकडा 350 दक्षलक्ष एवढा आहे. हा आकडा भविष्यात वाढतच जाणार आहे. याशिवाय, जगातील अनेक देशांमध्ये UPI उपलब्ध आहे. भारतीय जगभरात प्रवास करण्यासाठी वर्षाला सरासरी 10 बिलियन डॉलर्स खर्च करतात. इतर देशांमध्ये खर्चाची ही आकडेवारी प्रचंड मोठी आहे. UPI मुळे परदेशातील भारतीयांना रुपयामध्ये व्यवहार करणे शक्य होणार आहे. UPI च्या आंतरराष्ट्रीयकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच फायदा होईल. 

UPI च्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय व NPCI द्वारे अनेक पावले उचलली जात आहेत. आरबीआयने यूजर्सला UPI Lite X च्या माध्यमातून ऑफलाइन व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच, फीचर फोनच्या माध्यमातून देखील व्यवहार करणे शक्य आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. 

तसेच, UPIच्या माध्यमातून व्यवहार करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ब्लॉकचेन टेक्नोलॉजीचा वापर केल्यास UPI हे अधिक सुरक्षित होऊ शकते. सध्या आरबीआय व अनेक बँकांनी UPIच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर ठराविक रक्कमेची मर्यादा घातली आहे. परंतु, भविष्यात या रक्कमेत वाढ केल्यास अधिकाधिक लोक UPI शी जोडले जातील. 

UPI मुळे क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर कमी? 

अवघ्या 7 वर्षात UPI चा वापर अनेक पटींनी वाढला आहे. खासकरून, कमी रक्कमेच्या आर्थिक व्यवहारांसाठी UPI च्या तुलनेत क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर खूपच कमी आहे. कार्ड्सच्या माध्यमातून पेमेंटची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट आहे. UPI व्यापारी वर्गात जास्त लोकप्रिय असले तरीही मोठ्या रक्कमेच्या व्यवहारांसाठी क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर आजही केला जात आहे. क्रेडिट कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या देखील गेल्याकाही वर्षात प्रचंड वाढली आहे. 

डिजिटलपेमेंटमध्ये  UPI  ची मक्तेदारी

UPI P2P          

44%         

UPI P2M         

40%         

PPI M-WALLET         

7%         

DEBIT CARD         

4%         

CREDIT CARD         

3%         

PPI CARD         

2%         

सोर्स - livemint.com         

दुसरीकडे, जागतिक स्तरावर UPI ला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मास्टरकार्ड, व्हिसा सारख्या मोठ्या कंपन्यांची बाजारात मक्तेदारी आहे. जगभरात जवळपास 70 पेक्षा अधिक देशांमध्ये रिअल टाइम पेमेंट सिस्टम उपलब्ध आहे. यातील बहुतेक पेमेंट सिस्टम या सरकारद्वारे चालवल्या जातात. चीनची Alipay, अमेरिकेची PayPal आणि ब्राझीलची Pix ही रिअल-टाइम पेमेंट्स सिस्टम त्या त्या देशात प्रचंड लोकप्रिय आहे, अशा कंपन्यांना मागे टाकून जागतिक बाजारात स्वतःचे स्थान निर्माण करणे निश्चितच UPI साठी आव्हान असेल.