गेल्या आठवड्याच फ्रान्ससोबत इतर 13 देशांनी भारताचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेत देखील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा वापर करता येणार आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात UPI च्या स्वीकृती संदर्भात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.
डॉलर प्रमाणे रुपयाचा वापर व्हावा
भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे म्हणाले होते की, श्रीलंकेला भारतीय रुपयाचा अमेरिकन डॉलरइतकाच वापर पाहायला आवडेल. रुपया सामान्य चलन म्हणून वापरला जात असेल तर आमची हरकत नसल्याचेही विक्रमसिंघे म्हणाले आहेत.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारताची मोबाइल-आधारित तत्काळ आणि सुलभ पेमेंट करण्याची एक लोकप्रिय प्रणाली आहे. यामाध्यमातून ग्राहकांना कोणताही बँक खात्यांचा तपशील न वापरता केवळ व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) वापरून जलद गतीने पैशांची देवाण घेवाण करता येते. श्रीलंकेने यूपीआय वापराची सुरुवात केल्यास भारतीय पर्यटकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
आयफेल टॉवरपासून फ्रान्समध्ये UPI चा वापर
फेब्रुवारी 2023 मध्ये, भारत आणि सिंगापूर यांनी आपापल्या पेमेंट सिस्टमला लिंक करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली होती.ज्यामुळे दोन्ही देशातील वापरकर्त्यांना क्रॉस-बॉर्डर व्यवहार करता येणार आहेत. यामुळे दोन्ही देशांतील नागरिक आता QR-कोड आधारित किंवा फक्त बँक खात्याशी जोडलेले मोबाइल क्रमांक टाकून रिअल-टाइम पैसे पाठवू शकणार आहेत. त्याच प्रमाणे जुलैच्या सुरुवातीलाच फ्रान्सने देखील UPI पेमेंट यंत्रणा वापरण्यास सहमती दर्शविली होती. त्याची सुरुवात आयकॉनिक आणि पर्यटनाचे प्रसिद्ध स्थळ आयफेल टॉवरपासून (Eiffel Tower) करण्यात येणार आहे. त्यानंतर आता श्रीलंकनेदेखील UPI वापरास सहमती दर्शवली आहे.