लोकसभेत सर्वाधिक 80 खासदार हे उत्तर प्रदेशातून येतात. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आज बुधवारी 22 फेब्रुवारी 2023 रोजी 6 लाख 90 हजार 242 कोटींचे बजेट सादर केले. विशेष म्हणजे कोणतीही कर वाढ नसताना मागील वर्षभरात योगी सरकारच्या कर महसुलात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. (UP Govt Present 7 lakh crore Budget Today)
उत्तर प्रदेशचे सरकारचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी आज सकाळी 11 वाजता विधीमंडळात वर्ष 2023-24 साठीचा 690242.43 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात 32721.96 कोटींच्या नव्या योजनांचा समावेश आहे. सरकारला 683292.74 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. पुढील वर्षात वित्तीय तूट 84883.16 कोटी इतकी असून जीडीपीच्या तुलनेत 3.48% इतकी असेल.
योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले हे पहिले बजेट आहे. मार्च 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा सत्ता काबीज केली होती. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले होते. हे बजेट उत्तर प्रदेशात विकासाची गंगा आणेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ते म्हणाले की अमृतकाळातील हे पहिले बजेट आहे. गरिबांचे कल्याण आणि प्रदेशच्या सर्वसमावेश प्राधान्य देण्यात आल्याचे योगी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पायाभूत सेवा सुविधा, आरोग्य याशिवाय उद्योग, स्टार्टअप्स, महिला आणि बाल विकास, शिक्षण यांना बजेटमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा मिशन 2024 च्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी केंद्रातील सत्तधारी भाजप प्रयत्नशील आहे. 2014मध्ये उत्तर प्रदेशातून 71 जागांवर भाजप उमेदवार निवडून आले होते. 2019 मध्ये मात्र ही संख्या 62 पर्यंत मर्यादित राहिली होती. त्यामुळे प्रदेशच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज तब्बल 7 लाख कोटींचे बजेट सादर केल्याचे बोलले जाते.
विरोधकांची बजेटवर टीका
बजेटवर समाजवादी पार्टीने मात्र टीका केली आहे. उत्तर प्रदेशात तरुणांना नोकऱ्या नाहीत. लखनऊ, आगरा, कानपूर मेट्रोची कामे समाजवादी पार्टी सत्तेत असताना जाहीर करण्यात आली होती. सध्याच्या सरकारने राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचे प्रचंड नुकसान केल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी केला.
उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक घोषणा
- राज्य सरकारकडून 690242.43 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
- शालेय विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि स्मार्टफोन देणार, बजेटमध्ये 3600 कोटींची तरतूद
- वाराणसी गोरखपूर मेट्रोची घोषणा, 100 कोटींची तरतूद
- झाशी-चित्रकूट लिंक एक्सप्रेस वेसाठी 235 कोटींची घोषणा
- आरोग्य व्यवस्थेसाठी 12650 कोटींची तरतूद
- उत्तर प्रदेशात फार्मा पार्क उभारणीसाठी 25 कोटींची मदत
- प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज या उद्देशाने 14 नवीन मेडिकल कॉलेजची घोषणा
- लखनऊ विकास क्षेत्र आणि दळणवळण यंत्रणेसाठी 150 कोटींची तरतूद
- कानपूर मेट्रो प्रोजेक्टसाठी 585 कोटी
- आगरा मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 465 कोटी
- मुख्यमंत्री शहरी विस्तारीकरणासाठी 3000 कोटींची तरतूद
- मुलाचा जन्म झाल्यास पोषण आहारासाठी एकरकमी 20000 रुपये तर मुलीसाठी 25000 रुपये मदत कर
- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 9000 कोटींची तरतूद
- वर्षभरात 5 आंतरराष्ट्रीय आणि 16 देशांतर्गत एअरपोर्ट कार्यरत होणार
- महाकुंभ मेळ्यासाठी 2500 कोटींची तरतूद
- रस्ते आणि महामार्गांसाठी 21159.62 कोटी
- राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ मिशनसाठी 12631 कोटी
- ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी पेन्शन योजनेसाठी 7248 कोटी
- मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेसाठी 1050 कोटी
- पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पुढील पाच वर्षात 10 लाख कोटींची गुंतवणूक आणि 20 हजार रोजगार
- मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेसाठी 600 कोटी