केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला. सरकारने या योजनेतील अनुदानाची रक्कम 100 रुपयांनी वाढवली आहे. यामुळे आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान मिळणार असून घरगुती गॅस सिलिंडर 603 रुपयांत उपलब्ध होणार आहे.
सध्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दिल्लीमध्ये 14.2 किलो ग्रॅमचा घरगुती गॅस सिलिंडरचा दर 703 रुपये इतके आहे. त्याचे बाजार मूल्य 903 रुपये इतके आहे. मात्र रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली होती. त्यातच आज सरकारने उज्ज्वला योजनेत गॅस सिलिंडरवरील अनुदानात 100 रुपयांची वाढ केली आहे.
कॅबिनेटच्या निर्णयाने आता उज्ज्वला योजनेत सिलिंडराचा दर 603 रुपये इतका खाली आला आहे. सरकार महिला आणि गरिबांच्या कल्याणासाठी काम करत असून त्याचाच भाग म्हणून आज उज्ज्वला योजनेतील गॅसवरील अनुदानात वाढ केली असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.