Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fidelity report on Twitter : ट्विटरचं मूल्य आता केवळ 33 टक्के, 7 महिन्यात 29 बिलियन डॉलरची घसरण

Fidelity report on Twitter : ट्विटरचं मूल्य आता केवळ 33 टक्के, 7 महिन्यात 29 बिलियन डॉलरची घसरण

Fidelity report on Twitter : एलन मस्क यांच्या ट्विटरचं मूल्य दिवसेंदिवस घसरत चाललंय. आता ते मूल्य केवळ 33 टक्क्यांवर आलंय. फिडेलिटीनं यासंदर्भात एक रिपोर्ट दिलाय. या रिपोर्टमध्ये एलन मस्क यांनी कंपनी घेतल्यापासून होत असलेल्या घसरणीबद्दल सविस्तर विवेचन करण्यात आलंय.

टेस्लाचे एलन मस्क (Elon Musk) यांनी साधारण 7 महिन्यांपूर्वी ट्विटर कंपनी विकत घेतली. त्यासाठी 44 बिलियन डॉलर मोजले. मात्र विविध प्रयोग आणि चुकीच्या रणनीतीमुळे ट्विटरचं (Twitter) मूल्य वेगानं कमी होत चाललंय. आकडेवारीवरूनही हेच सिद्ध होतंय. नवीन वर्ष सुरू झालं आणि ट्विटरचं मूल्य जवळपास 50 टक्क्यांनी खाली आल्याच्या बातम्या समोर आल्या. आता मे महिन्यात समोर येणारी आकडेवारीदेखील धक्कादायकच आहे. ट्विटरचं मूल्य 29 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त कमी झाल्याचं समोर आलंय. कंपनीसाठी ही चिंतेची बाब आहे. याचाच अर्थ या 7 महिन्यांत कंपनीचं मूल्य 33 टक्के इतकंच राहिलंय.

जास्त पैसे मोजल्याचं केलं कबुल

ट्विटर खरेदीसाठी आपण जास्त पैसे दिल्याचं एलन मस्क यांनी कबूल केलंय. 44 बिलियन डॉलरला ते विकत घेतलं. ट्विटरसाठी जे पैसे दिले ते त्याच्या मूल्याच्या निम्म्याहूनही कमी आहे, असं मस्क यांनी स्वत:च सांगितलं होतं. दरम्यान, फिडेलिटीनं ही मूल्यांकनाची आकडेवारी कोणत्या आधारावर दिली, हे स्पष्ट झालेलं नाही. तसंच कंपनीकडून काही डेटा मिळवला का, हेही समजू शकलेलं नाही.

चुकीच्या निर्णयांचा फटका

फिडेलिटीनं सर्वात आधी नोव्हेंबरमध्ये आपल्या ट्विटर शेअर्सची किंमत खरेदी मूल्याच्या 44 टक्क्यांपर्यंत कमी केली. यानंतर डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये आणखी मार्कडाऊन करण्यात आलं. ट्विटरचा ताबा मस्क यांच्याकडे आल्यापासून कंपनी आर्थिकदृष्ट्या संघर्ष करताना दिसत आहे. 13 अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा डोंगर उभा आहे. या पार्श्वभूमीवर मस्क यांच्याकडून काही निर्णय घेण्यात आले. कंटेंट मॉडरेशन, ब्लू टिक सबस्क्रिप्शन यासह असे काही निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे कंपनी अधिकच खोलात चाललीय. असल्या निर्णयांमुळे ट्विटरचा महसूल 50 टक्क्यांनी कमी झालाय.

ब्लू टिक सबस्क्रिप्शनचा निर्णय सपशेल अपयशी

ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शनचा निर्णय तर थेट तोट्याकडे घेऊन जाणारा आहे. कारण मार्चच्या अखेरीस जी आकडेवारी आहे, त्यावरून हा निर्णय किती चुकीच्या पद्धतीनं घेतला, हेच दिसतं. ट्विटरच्या मासिक यूझर्सपैकी 1 टक्क्यांहूनही कमी लोकांनी साइन अप केलं होतं. याबाबत ट्विटरकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.

वैयक्तिक संपत्तीत वाढ

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, एलन मस्क यांची ट्विटरमधली गुंतवणूक आता 8.8 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांनी कंपनीतलं अंदाजे 79 टक्के भागभांडवल मिळविण्यासाठी मागच्या वर्षी 25 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिकचा खर्च केला. या निर्देशांकानुसार, सध्या एलन मस्क यांची एकूण संपत्ती 190 अब्ज डॉलर आहे. तर आज त्यांची एकूण संपत्ती सुमारे 5 बिलियन डॉलरनं वाढलीय. या वर्षाचा विचार केल्यास त्यांच्या एकूण संपत्तीत 53 अब्ज डॉलरची वाढ झाल्याचं दिसतंय. अर्थात ही वाढ टेस्लाशी संबंधित आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत वाढ झालीय. मागच्या काही वर्षात श्रीमंतांच्या ते जगात क्रमांक एकवर होते. मात्र ट्विटरच्या खरेदीनंतर त्यांचं हे स्थान धोक्यात आलं. दुसरीकडे टेस्लातून त्यांना मोठा फायदा होत असल्यानं त्यांची संपत्ती वाढत असल्याचं दिसतं.