Twitter Verification : आज ट्विटरवर मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. ज्या यूजर्सनी ट्विटरचे सबस्क्रिप्शन घेतलं नाहीये अशा सर्व यूजर्सच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आलं आहे. यामध्ये अनेक राजकिय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. याच विषयावर सकाळपासून ट्विटरवर आणि एकुणच सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये चर्चा पाहायला मिळतेय.
या सगळ्या घडामोडींमध्ये पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांच्या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधुन घेतलं आहे. तर पाहुयात विजय शर्मा हे नेमकं आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले आहेत.
विजय शर्मा यांचं ट्विट
पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी आज दिल्ली विमानतळाच्या टर्मिनस 3 वरून प्रवास करताना डिजीयात्रा या ॲपचा अनुभव घेतला. हा अनुभव ते आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असताना म्हणाले आहेत की, डिजीयात्रा या ॲपचा अनुभव खुप चांगला आणि सुखद होता. या ॲपसाठी दर महिन्याला पैसे मोजण्यासाठी सुद्धा मी तयार आहे. पुढे ते म्हणतात की, डिजीयात्रा हे ट्विटर ब्लु टिक पेक्षा जास्त किफायतशीर आहे.
DigiYatra is so good that, I don’t mind paying monthly subscription for it !
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) April 21, 2023
Feels truly privileged to use it on T3.
IMO, DigiYatra perk is way more valuable than #TwitterBlue in India ?
काय आहे डिजीयात्रा ॲप
डिजीयात्रा हे असं ॲप आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच तुमची सेक्युरिटी चेक इन, बोर्डिंग पास असे सगळे सोपस्कार पूर्ण करता येतात. केंद्रीय हवाई वाहतुक खाते व डिजीयात्रा या संस्थेने संयुक्तरित्या हे ॲप तयार केलं आहे. या ॲपमध्ये प्रवासी आपली माहिती व आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन विमानतळावरील सुरक्षित संबंधित कार्यवाही पूर्ण करू शकतात. यामुळे प्रवाशांचा बऱ्यापैकी वेळ वाचत असतो. मात्र ही सुविधा दिल्ली, वाराणसी व बँगलोर येथीव विमानतळावरच सध्या उपलब्ध आहे. एअर इंडिया, विस्तारा आणि इंडिगो या कंपनीकडून ही सुविधा दिली जाते.
येत्या काही दिवसात पुणे, हैदराबाद, कोलकत्ता आणि विजयवाडा येथील विमानतळावरसुद्धा अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ट्विटर व्हेरिफिकेशन चार्जेस
ट्विटरवर एखाद्या खोट्या खात्याच्या माध्यमातून चुकीची गोष्ट घडू नये, आपले खाते सुरक्षित राहावे तसेच मोठ्या व्यक्तींच्या नावे काही अनुचित प्रकार घडु नयेत अशा व्यापक उद्देशाने ट्विटरवर आपल्याला आपले खाते सुरक्षित करण्यासाठी ब्लू टिक दिलं जात असे. यासाठी केवळ एक फॉर्म भरून देण्याची छोटीशी प्रक्रिया होती. मात्र आता आपलं खातं अप्रुव्ह करण्यासाठी म्हणजेच ब्लू टिक मिळवण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत.
यामध्ये प्रति महिना 656 रूपये भरावे लागणार आहेत तर वार्षिक 6,896 रूपये भरावे लागणार आहेत. या सबस्क्रिप्शन अंतर्गत यूजर्सना काही एक्सक्लुझिव्ह फायदे सुद्धा मिळणार आहेत. जसे की, एडिट ट्विट, 10 हजार शब्दमर्यादेचं ट्विट करण्याची परवानगी, 60 मिनीटचे व्हिडीओ पोस्ट, ट्विट अनडू करण्याचा पर्याय, खात्यावर जाहिरातीचं कमी प्रमाण, काही महत्त्वाचे शब्द बोल्ड वा विशेष ट्रिटमेंट मध्ये मांडण्याची सोय या नविन सबस्क्रिप्शन करणाऱ्या यूजर्सनां ट्विटरकडून देण्यात आली आहे.