मासे (Fish) तसंच चिकन (Chicken), मटन (Mutton) यांच्या किमती वाढल्याची ओरड दरवर्षी होते. सर्वसामान्यांना या गोष्टी परवडेनाशा झाल्यात असं ऐकायला मिळतं. पण, म्हणून एका माशाची किंमत जास्तीत जास्त किती असावी? 2,70,000 अमेरिकन डॉलर इतकी नक्कीच नसावी. पण, जपानच्या (Japan) टोकयोमध्ये (Tokyo) दरवर्षाच्या पहिल्या आठवड्यात भरणाऱ्या पारंपरिक लिलावात एका माशाला ही किंमत मिळाली आहे.
कुठल्या माशावर लागली 2,70,000 डॉलरची बोली? Fish That Fetched 2,70,000 USD
जपानमध्ये सुशी (Sushi) हा माशाचा एक खाद्यपदार्थ लोकप्रिय आहे. ते तिथलं राष्ट्रीय खाद्य आहे असंच म्हणावं लागेल. तर सुशीसाठी ट्युना (Tuna) जातीचा मासा खासकरून वापरला जातो. खाऱ्या पाण्यात आढळणारा हा मासा आपल्याकडे कोकणात मिळणाऱ्या कुपा माशाच्या जवळ जाणारा आहे.
ट्युना माशातल्या ब्लुफिन प्रजातीचा 212 किलो वजनाचा मासा टोकयोतल्या मासा लिलावातला हीरो ठरला. या माशासाठीच जपानमधली आघाडीची सुशी चेन ओनोडेरा ग्रुपने 36.04 दशलक्ष येन एवढे पैसे मोजले. अमेरिकन डॉलरमध्ये ही किंमत आहे 2,70,000 इतकी तर भारतीय रुपयांमध्ये साधारण 21 कोटी रुपये. ओनोडेरा ग्रुपचे मालक आहेत यामायुकी. आणि ते माशांचा घाऊक व्यापारही करतात.
विशेष म्हणजे माशासाठी मिळालेली ही रक्कम कमीच मानली जातेय. मागची दोन वर्षं कोरोना उद्रेकामुळे जपानच्या टोकयोमध्ये टोयोसू मच्छिबाजारात भरणाऱ्या या लिलावाची रया गेली होती. तीन वर्षांनंतर पहिल्यांदा हा लिलाव पूर्ण क्षमतेनं भरवला गेला. पण, लागणाऱ्या बोली ते लावणारे हात यंदा कमीच होते, असं बोललं जातंय.
जपानच्या या पारंपरिक मासे लिलावात कियोशी किमुरा हे ट्युना किंग म्हणून ओळखले जातात. कारण, 2019 मध्ये कोरोना पूर्वी त्यांनी ट्युना माशावर तब्बल तीन कोटींची बोली लावली होती.
जपानच्या या लिलावावर जगाचं लक्ष असतं.